‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आलिया : बॉलीवूडची चुलबुली गर्ल
“राजा का बेटाही राजा बनेगा”
वंशपरंपरागत चालत आलेली मक्तेदारी अधोरेखित करणारी ही म्हण. पूर्वजांच्या कमाईवर आपला चरितार्थ चालवणे हे चित्र जगभरात सर्रास पाहायला मिळतं. एखाद्या कंपनीत कितीही अनुभवी, मेहनती कामगार असले तरी कंपनीच्या संचालकपदावर मालकी हक्क मात्र कंपनीच्या मालकाच्या पिढ्यांचाच राहतो. अश्यात चित्रपट व्यवसाय तरी कसा मागे राहील? आपल्या मुलांनी या चंदेरी दुनियेत यावं, नाव कमवावं ही इच्छा चित्रपट व्यवसायात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असते. या बेभरवश्याच्या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर एकतर तुमच्याकडे उत्तुंग गुणवत्ता तरी हवी किंवा मग तगडे लागेबांधे तरी हवेत. गुणवत्तेच्या जोरावर कुण्या आऊटसायडरने या फिल्म इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण केल्याची उदाहरणं तशी कमीच पण जोरदार वशिलेबाजी करूनही डब्यात गेलेले कलाकार मात्र इथं ढिगाने आढळतात.
चित्रपटसृष्टीमध्ये पूर्वापार चालत आलेलं नेपोटीझम सध्या सर्वांच्याच टीकेचा विषय बनत आहे. पुरेसं टॅलेंट नसूनही निव्वळ ह्या नेपोटीझमचा आधार घेऊन चित्रपटांमध्ये नशीब अजमावू पाहणाऱ्यांमुळे कित्येक चांगले कलावंत संधीअभावी वाया चालल्याचं प्रमाण सध्या वाढत असून, प्रेक्षकांमध्ये नेपोटीझमबद्दलची नाराजी दिवसेंदिवस वाढत चाललीय. पण काहीजण या नेपोटीझममुळे आयत्या चालून आलेल्या संधीचं अक्षरशः सोनं करतात. म्हणतात ना, जसा एखाददुसरा ‘शाहरुख खान’ असतो तसा एखादा ‘सनी देओल’ही असतो! मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन पुढे आपल्या अभिनयाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्वतःचं नाव निर्माण करणारे अनेक कलाकार आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे आजची आघाडीची अभिनेत्री, आलिया भट! (Alia Bhatt)
चित्रपट व्यवसायातील प्रस्थापितांपैकी एक अश्या भट खानदानातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट आणि अभिनेत्री सोनी राझदान यांचं हे शेंडेफळ. लहानपणी गोलमटोल असलेल्या आलियाला जो तो ‘आलू’च म्हणायचा. सहा वर्षांची असतानाच बापाच्या ‘संघर्ष’मध्ये तिला छोट्या प्रिती झिंटाची भूमिका करायला मिळाली. ही गोलमटोल, गोंडस रीत ओबेरॉय पुढे जाऊन तिच्या किलर लुक्सने तरुणाईला वेड लावेल, अशी पुसटशी शंकाही कुणाला आली नसेल. पण आलियाने सुरेश ओबेरॉय होस्ट करत असलेल्या ‘जिना इसी का नाम है’मध्ये वयाच्या आठव्या वर्षीच जगजाहीर केलं होतं की तिला अभिनेत्रीच बनायचंय! अभ्यासात बऱ्यापैकी हुशार असलेल्या आलियाला बारावीत असतानाच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये झळकण्याची संधी मिळाली.
२०१२मध्ये रिलीज झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये आलिया एका मॉडर्न कॉलेजकुमारीच्या रुपात दिसली. शनाया सिंघानियाची ही व्यक्तिरेखा अतिशय ग्लॅमरस होती, जी आलियाला परफेक्टली साकारता आली. सिनेमात तिच्यामुळे येणारा लव्ह ट्रायँगल, त्यातून दोन्ही नायकांपैकी एकाला निवडताना तिची होणारी द्विधा मनस्थिती आलियाने अचूकपणे दर्शवली आहे. या फिल्ममधील ‘राधा’, ‘इश्क वाला लव्ह’ या गाण्यांमध्ये असलेला आलियाचा प्रेझेन्स प्रेक्षकांना सर्वाधिक भावला.
‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील आलियाने साकारलेल्या शनायाचं कौतुक होत असतानाच त्याला गालबोट लागेल अशी एक घटना घडली. प्रख्यात दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोवर वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया या ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या कास्टला आमंत्रित केलं होतं. शो संपण्याअगोदर जो प्रश्नोत्तरांचा राऊंड होता, त्यात आलियाने घाईगडबडीत एक चुकीचं उत्तर दिलं, ज्यावरून तिला बेसुमार ट्रोल करण्यात आलं. पहिल्या चित्रपटाच्या वेळी सौम्य असलेला नेपोटीझमचा वाद या शोनंतर अधिकच उफाळून वर आला.
संताबंताच्या जोक्सऐवजी आलियावर बनवलेले जोक्स व्हायरल होऊ लागले. फक्त एक चित्रपट आणि तोही सुपरहिट दिलेल्या आलियासारख्या नवख्या अभिनेत्रीसाठी हे ट्रोलिंग खूपच निराशाजनक होते, पण आलियाने त्यावेळी खचून न जाता या ट्रोल्सला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं आणि ‘AIB’ सारख्या प्रसिद्ध युट्यूब चॅनलसोबत ‘आलिया भट-जिनियस ऑफ द इयर’ हा व्हिडीओ बनवला. यापूर्वी कधीही, कुणालाच न जाणवलेला आलियाचा सेन्स ऑफ ह्युमर ‘AIB’ने प्रेक्षकांसमोर आणला. तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आणि ट्रोलर्सची तोंडं बंद झाली.
२०१२ नंतर आलियाने अनुराग कश्यपच्या ‘अग्ली’ (२०१३)मध्ये एक अगदीच छोटासा कॅमिओ केला होता. त्यानंतर ती थेट इम्तियाज अलीच्या ‘हायवे’मध्ये दिसली. फेब्रुवारी २०१४मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात आलियाने विरा त्रिपाठी या श्रीमंत बापाच्या लेकीची भूमिका साकारली होती, जिला कधीही आपल्या शहराबाहेर पडता आलेलं नव्हतं. श्रीमंत असणे आणि स्वतंत्र असणे यातील फरकाची जाणीव झालेली विरा ही भूमिका म्हणजे आलियातील अभिनेत्रीचा उदय होता. नेपोटीझमचं प्रोडक्ट असलेली आलिया ही फक्त शोभेची बाहुली नाही, हे एव्हाना तिच्या टीकाकारांना कळून चुकलं होतं. त्याच वर्षी आलियाने अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘2 स्टेट्स’ आणि शशांक खैतन दिग्दर्शित ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांतही प्रमुख भूमिका साकारली.
चेतन भगतच्या ‘2 स्टेट्स: द स्टोरी ऑफ माय मॅरेज’ या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘2 स्टेट्स’मध्ये आलियाने अनन्या या तामिळ युवतीची व्यक्तिरेखा साकारली होती. प्रियांका चोप्रा, असीन, अनुष्का शर्मा यांच्या हातून सुटलेली ही भूमिका आलियाने अप्रतिमरीत्या वठवली. शाहरूखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ला ट्रिब्युट म्हणून बनवलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये आलियाने साकारलेली काव्या सिंग वरुण धवनच्या हम्प्टीपेक्षा कैकपटीने सरस ठरली.
२०१५ला आलेला विकास बहल दिग्दर्शित ‘शानदार’ हा आलियाचा पहिलाच फ्लॉप चित्रपट ठरला. एक शाहीद-आलियाची केमिस्ट्री आणि फिल्मचे लोकेशन्स वगळता या चित्रपटात शानदार म्हणावं असं काहीच नव्हतं. त्या दृष्टीने २०१६ मात्र आलियासाठी एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरलं. ‘ऐ दिल है मुश्किल’मधील तिचा कॅमिओ तर गाजलाच पण ‘कपूर अँड सन्स’मध्ये तिने साकारलेल्या टिया मलिक या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांनी आणि जाणकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याहीपेक्षा जास्त कौतुक ‘डिअर जिंदगी’च्या कायरा आणि ‘उडता पंजाब’च्या पिंकी कुमारी या तिने साकारलेल्या व्यक्तिरेखांचं केलं गेलं.
या दोन्ही भूमिका चुलबुली आणि खट्याळ असलेल्या टिया मलिकपेक्षा वेगळ्या होत्या. पंजाबमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई लढणारी बिहारी मजूर पिंकी ही आलियाची आत्तापर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका असावी. तिने पिंकीच्या लूकसाठी जितकी मेहनत घेतली त्यापेक्षा जास्त त्यातील बोलीभाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा केला आणि त्याचाच परिणाम म्हणून तिची ही भूमिका त्यावर्षी बरीच गाजली. ‘डियर जिंदगी’ची कायरा ही पेशाने एक सिनेमॅटोग्राफर होती जी वैयक्तिक आयुष्यात कौटुंबिक ताणतणाव, निद्रानाश, रिलेशनशिप्स इत्यादी समस्यांशी झगडत असते. तिच्या रील आणि रिअल लाईफमधील प्रगल्भता या चित्रपटात जास्त खुलून दिसते.
२०१७च्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ मध्ये तिने वैदेही नावाच्या एका हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलीची भूमिका साकारली होती. ही भूमिका आलियाचंच प्रतिबिंब आहे असं कायम वाटत राहतं. आपलं उद्दिष्ट ठरवून, वाटेतल्या अडथळ्यांना न जुमानता ते प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वैदेहीने प्रेक्षकांची मने जिंकली. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ हा आलियासाठी ‘वन वुमन शो’ ठरला. तिला मिळालेल्या सेहमतच्या भूमिकेला मुलगी, पत्नी, सून, वहिनी आणि एक गुप्तहेर असे विविधरंगी पदर होते आणि ही भूमिका आलियाने इतक्या सहजपणे साकारली की ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये बालिश वाटणारी शनाया हीच का, असा प्रेक्षकांना प्रश्न पडला.
भारताकडून ऑस्करला पाठवलेला ‘गली बॉय’ जितका रणवीरच्या मुरादचा आहे त्याहून अधिक तो आलियाच्या सफिनाचा आहे, असं म्हणायला हरकत नाही. गोड हसणारी सफिना प्रत्यक्षात एक वाघीणच होती, जी मुरादसाठी कुणाशीही पंगा घ्यायला तयार होती. कमालीचा निरागस चेहरा आणि ठासून भरलेला बॉसी अॅटिट्यूड, अशी सफिना प्रेक्षकांची फेवरेट बनली. बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने, ‘कलंक’ आणि ‘सडक 2’ जरी फ्लॉप गेले असले, तरी ‘कलंक’मधील आलियाने साकारलेली रूप ही तिच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक आहे, असं निश्चितच म्हणता येईल. माधुरी दीक्षित, संजय दत्तसारख्या दिग्गज कलाकारांसमोरही ती या फिल्ममध्ये उठून दिसली.
आलियाच्या बहुतांश भूमिका प्रेक्षकांना आवडतात कारण त्यातून आलियाच्या नेपोटीझमवाल्या छबीला सतत छेद जात राहतो. भलेही तिच्या वडिलांमुळे या क्षेत्रात येण्याचा तिचा मार्ग सोपा झाला असेल, पण आज तिने तिच्या अभिनयक्षमतेच्या जोरावर मिळवलेलं यश पाहून तिच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो. ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’ आणि ‘गली बॉय’साठी तिला फिल्मफेअर अॅवॉर्डस मिळालेले असून ‘फोर्ब्ज’, ‘IMDb’, ‘व्होग’सारख्या नामांकित ब्रँड्सच्या कित्येक लिस्ट्समध्ये तिने स्थान मिळवलेलं आहे. तिचं हे यश फक्त अभिनयापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीय. जितका सुंदर तिचा चेहरा आहे, तितकाच गोड तिचा आवाज आहे, हे तिने गायलेली ‘हमसफर’, ‘समझावाँ’ सारखी गाणी ऐकताना जाणवतं.
हे देखील वाचा: आलियाचा, गंगूबाई काठियावाडी…
आपण आपल्या खानदानापेक्षा स्वकर्तृत्वाने मोठं व्हावं, प्रसिद्ध व्हावं ही आलियाची महत्त्वाकांक्षा तिच्या प्रत्येक भूमिकेत साफ झळकते, अगदी तिच्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये सुद्धा! आजच्या घडीला, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय नायिकांमध्ये तिच्या नावाचा समावेश आहे आणि त्याचं खरं कारण हे की इतक्या कमी वयात तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आता लवकरच ती राजामौलीच्या ‘RRR’मध्येही सीतादेवीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर ‘ब्रम्हास्त्र’, ‘डार्लिंग्ज’, ‘तख्त’ आणि ‘बैजू बावरा’सारख्या तिच्या आगामी चित्रपटांचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशीही असली, तरी स्वकर्तृत्वानेही आपण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो, हा आत्मविश्वास प्रेक्षकांच्या मनात रुजवणाऱ्या आलियाचा आज वाढदिवस! वशिलेबाजीच्या कुबड्या झुगारून आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मल्टीटॅलेंटेड अभिनेत्रीला कलाकृती मिडीयाचा सलाम!!