‘सिनेमाच्या यशोगाथे’चा मापदंड… तिकिटांसाठीची लांबलचक रांग!
येत्या शुक्रवारी रिलीज होत असलेल्या रणवीर सिंग अथवा अक्षयकुमारच्या नवीन चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगसाठी सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून रांग लागायला सुरुवात झालीय, सात आठ वाजेपर्यंत रांग वाढलीय आणि नऊ वाजता तर अतिशय लठ्ठालठ्ठीत उभ्या असलेल्या रांगेवर पोलीसांचा लाठीमार सुरु आहे, तिकीट खिडकी उघडताच गर्दीत जल्लोष निर्माण होतो आणि रांग हळूहळू पुढे सरकत सरकत जातानाच रांगेत भरच पडतेय. एक वाजता खिडकी बंद होते आणि पुन्हा दुपारी चार वाजता ती उघडते तरी रांग कायमच आहे. रांग संपत नाही, पण सहा वाजेपर्यंत पहिल्या तीन दिवसांची रोजच्या तीनही शोची सगळी तिकीटे हाऊसफुल्ल झाल्याचे चार्टवर दिसते…
हे आज जरी स्वप्न वाटत असलं तरी सत्तरच्या दशकात हाच रिॲलिटी शो होता. हेच वास्तव होते आणि अशा पध्दतीने रांगेत उभे राहून सिनेमाचे तिकीट काढणे गरजेचेही होते.
येतील का हो असे थिएटरबाहेर लांबलचक रांग लावण्याचे / दिसण्याचे दिवस ? ती ब्रेकिंग न्यूज ठरेल हो.
कोरोनानंतरच्या काळात तर अशा हाऊसफुल्ल गर्दीची सिनेमाला गरज आहे. ऑनलाईन बुकिंगने शो गर्दीत सुरु होतीलच, पण ‘सिनेमाच्या यशोगाथे’तील अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे, अशी लांबलचक रांग ही आहे.
के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’च्या (रिलीज ५ ऑगस्ट १९६०) ॲडव्हान्स बुकिंगसाठी मराठा मंदिर थिएटरवर अशीच फिल्म दीवान्यांची अतिशय उत्साहात रांग लागल्याचे किस्से रसिकांची एक पिढी रंगवून खुलवून सांगे. मी गिरगावात राहिल्याने सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांसाठी अशीच रांग पाहिलीय, कधी मी देखिल ‘अमर अकबर ॲन्थनी’साठी ऑपेरा हाऊस थिएटरवर अशाच रांगेत उभं राहून तिकीटे मिळवलीत. त्यात एक वेगळेच थ्रील असे, धाकधूक असे, आपला नंबर येईपर्यंत आपल्याला हव्या असलेल्या शोची तिकीटे संपणार नाहीत ना, याची धाकधूक असे. तसे झाले तर मग मिळेल त्या शोची तिकीटे घेऊ अशी मनाची समजूत घालावी लागे. एका व्यक्तीला फक्त चार तिकीटे असा तेव्हा नियम असला तरी ब्लॅकमार्केटवाले मोठ्या प्रमाणावर तिकीटे कशी मिळवतात याच्या रंगतदार कथा / दंतकथा / किस्से त्या काळात चघळले जात.
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, कितीही आठवडे होऊ देत, ॲडव्हान्स बुकिंगसाठी रांग कायम असल्याचा विक्रम रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले“च्या (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) नावावर असून तो पुसला जाणे शक्यच नाही. त्या काळात कधीही मिनर्व्हावर जावे तर लांबलचक रांग ठरलेली. त्यात उभे राहून चार पाच दिवसांनंतरचे तिकीट काढले तरच तुम्हाला ‘शोले’ पाहता येईल असा जणू अलिखित नियम होता आणि रसिकांनी तो आवडीने पाळला. एकदा का रसिकांनी सिनेमा डोक्यावर घेतला रे घेतला की ॲडव्हान्स बुकिंगला तिकीट काढून ठेवणे ही तेव्हाची पब्लिक संस्कृती होती. काही आठवड्यानंतर गर्दी ओसरली की मग करंट बुकिंगची खिडकी उघडे. म्हणजे शोच्या वेळी जी तिकीटे मिळताहेत त्याला करंट बुकिंग म्हणत हे आजच्या ऑनलाईन पिढीला सांगायला हवे.
कधी एखादा चित्रपट रसिकांना आवडला नाही की दुसरा आठवड्याच्या ॲडव्हान्स बुकिंगला शुकशुकाट असे. राजेश खन्नाच्या “प्रेम कहानी” (मुंबईत मेन थिएटर ड्रीमलॅन्ड), ‘मेहबूबा’ (मेन थिएटर नाॅव्हेल्टी) या अतिशय महत्वाच्या चित्रपटांच्यावेळी तसेच घडले आणि राजेश खन्नाची क्रेझ ओसरली अशी मिडियात चर्चा रंगली. यावरुन तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंगसाठी त्या काळात लांबलचक रांगा लागत याचे महत्व लक्षात आले असेलच. सिनेमा फ्लाॅप म्हणजे रांग गायब अथवा पहिल्या आठवड्यानंतर रांग हटली म्हणजे सिनेमा फ्लाॅप हे एक प्रकारचे सिग्नल होते.
ही ‘रांग संस्कृती’ एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब‘ (१९८८), सुभाष घई दिग्दर्शित ‘राम लखन’पासून (१९८९) राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ (२०००), अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर एक प्रेमकथा’, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ (२००१) पर्यंत कायम होती. त्यानंतर अगदी आजपर्यंत अनेक चित्रपट सुपर हिट ठरले, पण अशा रांगा कमी कमी होत गेल्या. याचे कारण म्हणजे, मल्टीप्लेक्स कल्चर आले आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सची संस्कृती आणि संख्या मागे पडत गेली. आता तर ती सिंगल स्क्रीन थिएटर्स किती राहताहेत हा प्रश्न निर्माण झाला आहे. हे दुर्दैव आहे.
त्यात पुन्हा पूर्वी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सवर सकाळी नऊ ते एक आणि दुपारी चार ते सात अशी असलेली वेळ मल्टीप्लेक्स कल्चरमध्ये नाही. तेथे सकाळपासून शो सुरु होतात आणि रात्री उशिरापर्यंत (मिडनाईट मॅटीनी शो) सुरुच असतात. त्यात पुन्हा आजच्या ग्लोबल युगातील रसिक पूर्वीसारखे खूपच अगोदरपासून सिनेमा पाहण्याचा प्लॅन करीत नाहीत. आणि जेव्हा मनात सिनेमा पाह्यचे येते तेव्हा ऑनलाईन शोच्या वेळा पाहून बुकिंग होते. आता तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट पाह्यचे युग स्थिरावत असताना थिएटरमध्ये नक्की किती प्रमाणात रसिक येणार याचे उत्तर अजून मिळालेले नाही. ते यावेत आणि मल्टीप्लेक्समध्ये गर्दी व्हावी यासाठी शुभेच्छा आहेत.
मराठी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगसाठीही पूर्वी लांबलचक रांगा लागत. दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांचे स्वागत असेच झाले. चित्रपती व्ही शांताराम यांच्या ‘पिंजरा’च्या (१९७२) गिरगावातील सेन्ट्रल थिएटरवर अनेक आठवडे ॲडव्हान्स बुकिंगसाठी रांग हमखास असे. विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’साठी (१९९१) कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा, सांगली येथे एका शोला लागलेली रांग तो शो हाऊसफुल्ल झाला म्हणून पुढच्या शोला कायम राहत असे. काही थिएटरवर तर याच रांगेचे समाधान करण्यासाठी दिवसभरात राउंड शो करावे लागले. एक संपला की दुसरा सुरु. यश यश म्हणतात ते हेच तर असते. सिनेमा संपला तरी रांग कायम असावी. यावर त्या काळात बरेच काही लिहिले गेले.
पूर्वी अशा पध्दतीने लांबलचक रांगेत उभे राहून सिनेमाचे तिकीट मुठीत पकडणारा वर्ग हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, कामकरी, कष्टाळू, स्वप्नाळू होता. पडद्यावरच्या जगात स्वतःला गुंतवून घ्यायला त्याला आवडे. त्याला हे रांग लावायला आवडे. सिनेमा पाहण्यासाठीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे असाच तेव्हा समज अथवा दृष्टिकोन होता. अनेक थिएटरमध्ये स्टाॅलच्या म्हणजे पहिल्या तीन चार रांगांची तिकीटे शोच्या अर्धा तास अगोदर सुरु होत पण त्यासाठी रांग त्याच्या दीड तास अगोदर लावावी लागे. आज वयाची पन्नाशी आणि साठी ओलांडलेल्या रसिकांना हा सगळाच फ्लॅशबॅक हवाहवासा वाटत असेल.
कोणाला आपण राजेश खन्नावरच्या प्रेमाखातर आराधना, दो रास्ते, कटी पतंग, सच्चा झूठा, मर्यादा, द ट्रेन, अमर प्रेम, हाथी मेरे साथी, अपना देश, दुश्मन, दाग इत्यादी अनेक चित्रपटांची तिकीटे कशी रांगेत उभे राहून मिळवली आणि हुश्श वाटले हे आठवत असेलच. तर काहींना अमिताभ बच्चनचे सुपर हिट चित्रपट आठवत असतील. त्या काळात आपल्या आवडत्या हिरोचा प्रत्येक नवीन चित्रपट फस्ट डे फर्स्ट शोलाच पाहणाऱ्या सिनेमा व्यसनींना अशा रांगेचे काहीच गैर वाटत नव्हते. त्यांचे तर त्या स्टारपेक्षा नवीन फिल्मच्या रिलीजच्या तारखेकडे जास्त लक्ष असे. अशाच सिनेमा भक्तांनी आपल्या देशात सिनेमा रुजवला, जगवला, वाढवला. (त्यांना सिनेमातले काय कळते असा तुच्छतापूर्ण प्रश्न करणारे एक प्रकारे त्यांचा अपमानच करीत आहेत.)
थिएटरवरची रांग भलेही आज ओसरली असेल पण एकेकाळच्या त्या रांगेतील पब्लिकनेच माऊथ पब्लिसिटीने अनेक चित्रपट इतरांपर्यंत पोहचवले आणि ते पुन्हा एकदा असेच रांगेत उभे राहून आवडलेला चित्रपट पुन्हा पुन्हा पाह्यला आले. यालाच अस्सल रिपिट ऑडियन्स म्हणतात. या मास अपीलने फक्त आणि फक्त रांगच लावली नाही तर एक प्रकारे सिनेमाचा प्रसारही केला. सिनेमाचा थिएटरमधला मुक्काम पंचवीस अथवा पन्नास आठवड्यांचा केला. रौप्यमहोत्सवी अथवा सुवर्ण महोत्सवी यश संपादले. याची पाळेमुळे याच रांगात होती, म्हणूनच तर तेव्हाचे फोटो आज दुर्मिळ झाले आहेत आणि आज एखाद्या यशराज फिल्मच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे‘ला (१९९५) मराठा मंदिर थिएटरवर अशीच रांग दिसते तेव्हा तो फोटोचा विषय ठरतो. रजनीकांतच्या मसालेदार मनोरंजक चित्रपटासाठी अनेक वर्षे अगदी अशी हुकमी रांग लागतेच याचाच अर्थ तो खराखुरा स्टार आहे. (बाकीचे बरेच जण मिडियात स्टार आहेत तो विषयच वेगळा).
‘गेले ते दिन गेले’ अशी आजची अवस्था असली तरी आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला ऑनलाईनवर सिनेमा तिकीटासाठी एक प्रकारच्या रांगेत थांबावे लागावे (मोबाईल अथवा कॅम्ट्युटर जॅम होऊ देत) अशीच सकारात्मक इच्छा. खरं तर जगभरातील कोणताही चित्रपट रसिकांच्या इच्छेवर चालतो अथवा पडतो, पण त्यांना तिकिटासाठी रांग लावण्यास प्रेरित करणे हे फिल्मवाल्यांच्या कल्पकतेवर आहे. आणि तेथेच जुने फिल्मवाले सरस ठरतात. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगसाठी रांग लागणे, ती वाढत वाढत जाणे याचाच अर्थ तो चित्रपट पूर्वप्रसिध्दीतून प्रेक्षकांपर्यंत पोहचल्याचा भक्कम पुरावा आहे. आज तोच हरवला आहे का?