अभिनयाच्या सीमा भेदणारी अभिनेत्री… सीमा देव!
सीमाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच आठवते अलिकडची एक गोष्ट, आजच्या सोशल मिडियाच्या काळात एखाद्याने केलेली पोस्ट क्षणार्धात अनेकांपर्यंत पोहचते, तसेच अजिंक्य देवच्या १४ ऑक्टोबरच्या ट्वीटबाबत झाले. ‘माझ्या आईला अल्झायमर झाला आहे’ असे त्याने ट्वीट करताच मी ते पाहिले आणि मनात चर्र झाले. लगेचच अजिंक्यला फोन करताच तो सांगू लागला, तसे बरेच दिवस झाले. पण आता आईची ही गोष्ट अधिकच बळावली म्हणून विचार केला की लोकांना ती सांगून त्यांच्या सदिच्छा मिळवूयात’ अजिंक्यच्या बोलण्यात आपल्या आईबद्दलची काळजी जाणवणे अगदी स्वाभाविक होतेच. साधारण अर्ध्या तासात मला काही सिनेपत्रकारांचे ‘सीमाताईंची तब्येत कशी आहे?’ हे विचारणारे फोन येऊ लागले तेव्हा माझे मन खूप जुन्या आठवणीत गेले.
साठच्या दशकात गिरगावातील खोताची वाडीत लहानपणी आई आणि आजीसोबत मॅजेस्टिक थिएटरमध्ये मराठी चित्रपट पाहू लागलो तेव्हा ‘सीमा देव’ हे नाव पहिल्यांदा माहित झाले, पण तेव्हा अजिबात कधी वाटले नव्हते की, आपण कधी सिनेपत्रकार होऊ आणि त्यात या देव कुटुंबियांशी अतिशय जवळचे आणि विश्वासाचे नाते गुंफले जाईल. मिडियात आल्यावर माझ्या अनेक गोष्टीतील एक होती ती म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मागील पिढीतील निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार, संगीतकार यांच्या मुलाखती घेत घेत आपले ज्ञान आणि माहिती वाढवणे.
सीमा देव (Seema Deo) यांना याच हेतूने १९८३ साली मी देव कुटुंबियांच्या जुहू कोळीवाडा काॅर्नरवरच्या मेघदूतमध्ये भेटलो. त्यांच्या अनेक भूमिका पाहून माझ्या मनात मराठीतील परंपरा मूल्ये संस्कृती सभ्यता जपणारी अभिनेत्री अशी प्रतिमा ठसली होती आणि त्या प्रतिमेला अनुसरुनच मी त्यांची पहिली मुलाखत घेतली. मुलाखत संपल्यावर त्यांनी माझी अगदी अगत्याने चौकशी केली, मी मुंबईत कुठे राहतो (योगायोग असा की त्यांचे लहानपणही गिरगावातील बनाम लेन येथील होते), याच क्षेत्रात का आला, घरी कोण असते वगैरे वगैरे. अशी आपुलकी हे त्या काळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. त्यानंतर रमेश देव, सीमा देव, अजिंक्य आणि अभिनय यांची अगणित वेळा प्रत्यक्ष अथवा फोनवर भेट सुरु झाली.
त्या काळात हिंदी चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना कधी आमंत्रण असे अथवा कधी बोलावले जाई. असेच एकदा टी. रामाराव दिग्दर्शित ‘मजबूर’च्या मेहबूब स्टुडिओतील सेटवर गेलो असता सनी देओल आणि सीमाताई यांच्यावर काही दृश्ये चित्रीत होत होती. दरम्यान थोडा रिकामा वेळ मिळताच सीमाताईंशी संवाद साधताच त्या म्हणाल्या, सनीच्या आईची भूमिका साकारतेय. तेवढ्यात मी त्यांना म्हणालो, तुमचे एका वेगळ्या गोष्टीसाठी कौतुक करायला हवे. तुम्ही ‘गजब’मध्ये धर्मेंद्रच्या आईची भूमिका साकारल्यावर आता त्याच्या आईची भूमिका साकारत आहात, हे ऐकताच त्यांनी अचंबित होऊन छान हसून दाद दिली.
कधी देव कुटुंबियांची निर्मिती असलेल्या ‘सर्जा’, ‘चोर चोर’, ‘जीवा सखा’ या चित्रपटांच्या निमित्ताने त्यांची भेट होई, कधी रमेश देव यांच्या वाढदिवसाचा सोहळा असो, सुलोचनादीदींना पद्मश्री पुरस्काराने गौरवले म्हणून देव कुटुंबियांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचा योग असो, त्यांनी लिहिलेल्या ‘सुवासिनी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असतो, झी अथवा मटा सन्मानची पार्टी असो, इतकेच नव्हे तर पूर्वीच्या त्यांच्या जुहूच्या कोळीवाडा काॅर्नरवरच्या मेघदूतमधील चौथ्या मजल्यावरील घरी जाणे असो अथवा कालांतराने देव कुटुंबिय जुहू वर्सोवा लिंक रोडवर समुद्राच्या साक्षीने राह्यला गेले तेव्हा असो, सीमाताईंना मी कायमच वाकून नमस्कार करून भेटलो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदरच त्यातून व्यक्त केला. (सुलोचनादीदी आणि सीमाताई यांना मी कायमच वाकून नमस्कार करून भेटलो. तसे त्यांचे कर्तृत्व आहेच.) कधी फोनवरही गप्पा होत. काही विशेष गोष्टी सांगायला हव्यातच.
साठ सत्तरच्या दशकातील मराठी चित्रपटातील कौटुंबिक दृश्ये अगदी खरी वाटत. पडद्यावरच्या व्यक्तिरेखा अभिनय करताहेत असे वाटत नसे. तर त्यात एकमेकांविषयीचा जिव्हाळा दिसून येई, यामागचे उत्तर एकदा मला सीमाताईंच्या बोलण्यात दिसून आले. त्या म्हणाल्या, कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओ अथवा शांतकिरण स्टुडिओत मराठी चित्रपटाचे शूटिंग असताना जेवणाच्या वेळी आम्ही कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार असे सगळे मिळून एकत्र जेवायला बसत असू. इतकेच नव्हे तर तेथे एकाच वेळेस दोन मराठी चित्रपटांचे शूटिंग असेल तर दोन्ही चित्रपटांतील कलाकार एकत्र येऊन एकमेकांची खुशाली विचारत. एकमेकांच्या घरी जात असू. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असू. आणि हेच आपलेपण मग कॅमेऱ्यासमोर आपोआपच येई आणि पडद्यावर दिसे.
सीमाताईंनी कळत नकळतपणे एक खूप मोठी गोष्ट सांगितली. पूर्वी मराठी कलाकाराच्या घरी टेलिफोन असणेही दुर्मिळ होते आणि त्या काळात पुणे अथवा कोल्हापूरचे निर्माते मुंबईतील मराठी कलाकारांची शूटिंगसाठी तारीख कशी मिळवत असत हा मला कायमंच कुतूहल असलेला प्रश्न एकदा मी सीमाताईंना विचारला असता त्या म्हणाल्या, एक तर पत्रव्यवहारातून मार्ग काढला जाई आणि तारखा ठरत. साधारण वीस दिवसाचे सलग चित्रीकरण सत्र असे. थोडे इकडेतिकडे होऊन तारखा निश्चित होत. अथवा, त्या चित्रपटाच्या युनिटमधील कोणी मुंबईला आले की तारखांची बोलणी होत. मराठी चित्रपटसृष्टीत तेव्हा खेळीमेळीचे कौटुंबिक वातावरण असल्याने तारखांवरुन अडवणूक वगैरे होत नसे, सीमा देव म्हणाल्या.
रमेश देव आणि सीमाताई यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा खूप रंजक आहे. त्या गिरगावात राहत असतानाची गोष्ट. तेव्हाच्या त्या नलिनी सराफ. त्या आपल्या आईसोबत गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत जाण्यासाठी चर्नी रोड स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये चढल्या आणि पुढच्याच ग्रॅंट रोड स्टेशनवर रमेश देव नेमके याच डब्यात चढले आणि या दोघींसमोर येऊन बसले. खरं तर नलिनी सराफ यांच्या आईना ‘पडद्यावरचे’ रमेश देव अजिबात आवडत नसत. त्यात नेमके तेच समोर येऊन बसलेले. गोरेगाव स्टेशनवरच रमेश देव उतरले आणि त्यांना फिल्मीस्तान स्टुडिओत जायचे होते म्हणून ते चालत चालत निघाले, पण या दोघींना फिल्मीस्तान स्टुडिओ माहित नव्हता. त्यामुळे त्या दोघी रमेश देव यांच्या मागोमाग चालतच फिल्मीस्तान स्टुडिओत पोहचल्या. फिल्मीस्तान त्यावेळी मराठी चित्रपटाची निर्मिती करत होते. तेथे रमेश देव आणि नलिनी सराफ या दोघांचीही काही अंतराने स्क्रीन टेस्ट झाली. आणि तेव्हा ‘आलिया भोगासी’ या चित्रपटासाठी ते भाऊ बहिणीच्या भूमिकेसाठी निवडले गेले. कालांतराने गोविंद सरय्या दिग्दर्शित ‘सरस्वतीचंद्र’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी भाऊ बहिणीची भूमिका साकारली.
सीमाताईंनी अनेक वर्षे हिंदी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका साकारताना राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यापासून अनिल कपूर, गोविंदा, श्रीदेवीपर्यंत किमान दोन पिढ्यांतील स्टारसोबत भूमिका साकारली. आणि त्यासह त्यांच्याकडे तेवढे अनुभवही बरेच. ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ (१९७१) मध्ये रमेश देव आणि सीमाताई पती पत्नीच्या भूमिकेत होते. ‘मैने तेरे लिए ही साथ रंग के सपने चुने’ या गाण्यात राजेश खन्नासोबत देव दाम्पत्यही आहे. तेव्हा राजेश खन्ना कमालीचा बिझी असल्याने त्याच्या वेळेनुसार सगळे शूटिंग होई, पण तेवढेच तो सहकार्य देत रस घेई अशी आठवण त्या सांगत. कालांतराने, म्हणजे १९८८ साली राजेश खन्नाने निर्मिलेल्या ‘जय शिव शंकर’ या चित्रपटातही त्यांची भूमिका होती. तर राजेश खन्नाच्या निधनाच्या दिवशी (१८ जुलै २०१२) देव दाम्पत्य आणि मी एका मराठी उपग्रह वाहिनीवर राजेश खन्नाबाबतच्या आठवणी जाग्या करण्यासाठी एकत्र होतो, हाही अनुभव खूप सुखद ठरला.
हे देखील वाचा: गुणवत्ता, दूरदृष्टी, माणुसकी आणि व्यावसायिकता यांची उत्तम केमिस्ट्री म्हणजेच रमेश देव
रमेश देव आणि सीमा यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (१ जुलै २०१५) या दाम्पत्याच्या खास मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. दिवसाला एक याप्रमाणे या मुलाखती होत्या. या निमित्ताने माझी भेट अगदी विशेष ठरली. खूप गप्पा रंगल्या. त्यांचे लग्न कोल्हापूरला झाले. त्या काळात लग्नात एक फोटोग्राफर म्हणजे बरीच मोठी गोष्ट होती. रमेश देव यांनी मराठी चित्रपटाच्या सेटवरील स्टील फोटोग्राफर लोके याला आपल्या लग्नात फोटोसाठी बोलावले. पण काही कारणास्तव तो येऊ शकला नाही. त्याची बराच काळ वाट पाहिली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग धावपळ करत जेमतेम एक फोटोग्राफर मिळाला तेव्हा कुठे फोटो निघाला. लग्नाचा पन्नासावा वाढदिवस मात्र अतिशय छान साजरा झाला. जुहूच्या इस्काॅनच्या प्रशस्त हाॅलमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अगणित मान्यवरांनी येऊन देव दाम्पत्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तेव्हा सीमा देव यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. आनंदी कुटुंबासाठीचे आदर्श दाम्पत्य म्हणून याच दाम्पत्याचे नाव घ्यायला हवे. आणखीन एक विशेष म्हणजे एकूणच चित्रपटसृष्टीतील हा एक वेगळा इव्हेन्ट ठरला.
अधूनमधून एखाद्या विषयानिमीत्ताने सीमाताईंशी फोनवर बोलणे होत असताना स्वाभाविकपणे ‘आजच्या आणि कालच्या चित्रपटसृष्टीचे विषय निघत’. संपूर्ण करियरमध्ये त्यांना मुस्लिम स्त्रीची भूमिका साकारायला मिळाली नव्हती. तो योग महेश कोठारे दिग्दर्शित ‘दुभंग’ या चित्रपटात आला. तर एकदा मी त्यांची लता मंगेशकर यांचा त्यांना लाभलेला प्लेबॅक या विषयावर मुलाखत घेतली. तेव्हा त्या खूपच भारावून गेल्या. या विषयावर त्या पहिल्यांदाच बोलत होत्या. ‘आम्ही गिरगांवकर’ या कॅलेंडरसाठी रमेश देव आणि सीमा यांच्या मुलाखती अर्थात आवश्यक होत्याच. एकेकाळचे दोघेही गिरगांवकरच. त्या बनाम लेनमध्ये राह्यच्या. जुने गिरगाव आठवून त्या भारावून गेल्या. १९९८ च्या जानेवारीत श्रीगणेश जयंतीनिमित्त देव दाम्पत्य गिरगावातील आमच्या खोताची वाडीत मुलाखतीसाठी आले असता त्यांना मी गिरगावातील जुन्या आठवणीबाबत बोलते करणे अगदी स्वाभाविक होतेच.
अशा अगणित छोट्या मोठ्या भेटीतून एकूणच देव कुटुंबाशी मी जोडलेला राहिलो. अजिंक्य देव अभिनयाच्या क्षेत्रात नवीन असताना त्याच्या मुलाखतीसाठी मेघदूतमध्ये मुख्य खोलीत आम्ही दोघे बसलो असताना आमची प्रश्नोत्तरे रंगली असतानाच माझ्या लक्षात आले की, सीमाताईं थोड्या आडोशाला बसून आपला मुलगा कशी मुलाखत देत आहे हे जाणून घेत आहेत. यात त्यांचे मुलावरचे प्रेमच दिसत होते. एका आईची मायाच त्यात दिसली. तर अभिनय देव दिग्दर्शित ‘दिल्ली बेल्ली’ या चित्रपटावरची त्यांची प्रतिक्रिया आजही आठवतेय. ‘हा नवीन पिढीची भाषा आणि जीवनशैली असलेला चित्रपट आहे’ असे इतकेच त्या म्हणाल्या. काळ बदललाय, सिनेमा बदललाय, प्रेक्षक बदललाय हे सीमाताईंनी कळत नकळतपणे अतिशय चांगल्या प्रकारे स्वीकारलेय हे जाणवलं. सीमाताईना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.