मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
रजनीकांतला दादासाहेब फाळके पुरस्कार: तळागाळातील प्रेक्षकांचा सन्मान
रजनीकांतला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि आठवले ते त्याची भूमिका असलेल्या ‘कबाली’, “रोबोट”, ‘2.O’, ‘काला’ अशा मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे आगमन. माटुंग्याचे अरोरा थिएटर असो अथवा सायन वा वडाळ्याचे मल्टीप्लेक्स. रजनीकांतच्या नवीन सिनेमाचा फस्ट डे फर्स्ट शो भल्या सकाळी सहा वाजता असतो आणि त्यासाठी पाच वाजल्यापासून त्याचे भक्त (होय भक्तच म्हणायला हवे. फॅन्स आणि फाॅलोअर्स अनेक स्टार्सना असतात. रजनीकांतला त्याहीपेक्षा मोठे मास अपिल आहे) वाजत गाजत नाचत ओरडत येतात. थिएटरवरील त्याच्या तब्बल ६८ अथवा ७२ फूटी भव्य कटआऊटला दूधाने आंघोळ घालणार. आणि पडद्यावरील त्याच्या एन्ट्रीला, एखाद्या डायलॉगला, जबरा ॲक्शनला, त्याच्या डान्स स्टाईलला टाळ्या शिट्ट्या वाजवत स्टाॅलपासून बाल्कनीपर्यंतचा पब्लिक थिएटर डोक्यावर घेणारच. हे जणू आपले कर्तव्य आहे अथवा हक्क/हट्ट आहे या थाटात ते करणार. मल्टीप्लेक्समध्येही हीच जबरा क्रेझ. हैद्राबाद, चेन्नईत म्हणजे त्याच्या होमपिचवर हे झाले तर समजू शकते. पण ते मुंबईतही होतेय हेच विशेष.
रजनीकांतला (Rajinikanth) मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) या वर्गाला प्रचंड आनंद देणारा, भावनिकदृष्ट्या जोडणारा असाच आहे. हा पुरस्कार यावेळी एका व्यक्तीला नव्हे तर तो जणू या गर्दीला आहे. या पुरस्काराचे वेगळेपण काय असेल तर ते हेच आहे. रजनीकांतने आपल्या स्टाईल आणि क्रेझने आपला असा हुकमी क्राऊड निर्माण केला आहे आणि त्याची ही मिळकत अगदी वेगळी आहे. कदाचित परंपरावादी चित्रपट रसिकांना ही निवड पटली नसेलही अथवा रजनीकांतच्या चित्रपटांची संस्कृती ती काय असाही त्यांचा प्रश्न असेल. पण आपल्या देशात कष्टकरी, स्वप्नाळू, मेहनती वर्गाने सिनेमा जगवला, वाढवला, रुजवला. हा वर्ग मागील काही दशके रजनीकांतशी जोडला गेला आहे हे त्याचा चित्रपट प्रदर्शित झालेल्या थिएटरवर सहज चक्कर मारली तरी लक्षात येते.
रजनीकांतच्या चित्रपटात अनेकदा तरी भरपूर अतिशयोक्ती असतेच (अपवाद “काला” या चित्रपटाचा आशय.) आता ‘2.O’ या चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्रच उदाहरण म्हणून बघा ना, एके दिवशी अचानक एका शहरातील सगळ्यांचेच मोबाईल हवेत उडतात आणि गायब होतात. हे कसे होते, का होते या प्रश्नाने पोलीस आणि मंत्री सगळेच हैराण होतात. हे प्रकरण ते एका शास्रज्ञाकडे (रजनीकांत) सोपवतात. तो आपली सेक्रेटरी नीला (ॲमी जॅक्शन) हिच्यासह या गोष्टीचा शोध घेऊ लागतो. नीला रोबोट आहे. याचा शोध घेताना लक्षात येते की पक्षीराजन (अक्षयकुमार) हा रोबोट हे सगळे एका सूडापोटी करतोय. त्याला राग कसला असतो? तर तो बालपणापासून पक्षीप्रेमी असतो. पण मोबाईल आणि मग त्याचे टाॅवर आल्यापासून त्याच्या रेडीएशनने पक्षी मृत पाऊ लागतात. हळूहळू पक्षी ही जमातच नष्ट होईल की काय अशी त्याला भीती वाटते. तो पक्षी वाचवण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करतो. अशी ही “२.O”ची गोष्ट आकार घेत जाते. आणि भरभरुन आधुनिक टेक्नाॅलाॅजीने हा चित्रपट पडदाभर आकार घेतो. ‘रोबोट’ या चित्रपटाची ही सिक्वेल आहे. या चित्रपटात भरपूर ॲक्शन आणि तांत्रिक करामती आहेत. तुम्ही रजनीकांतचे चाहते असाल तर हा तांत्रिकदृष्ट्या भरगच्च चित्रपट नक्कीच एन्जाॅय कराल. अथवा केला असेलही. खरं तर रजनीकांतवरील प्रेमाखातर त्याचे जुने नवे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहत असताच.
=====
हे हि वाचा: चित्रपटातील रजनीकांत आणि राजकारण आता एकत्र होताना दिसणार
=====
कोणी म्हणते, रजनीकांत म्हणजे एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीतील महाचमत्कार आहे. तो पडद्यावर कोणतीही करामत करु शकतो. जादू करु शकतो. हवेतून काही गोष्टी काढू शकतो. कोणी म्हणते, रजनीकांत म्हणजे गल्ला पेटीवरील हुकमी क्राऊड पुलर हिरो आहे. व्यावहारिकदृष्ट्या तेच तर महत्वाचे आहे ना? कोणी म्हणते, दक्षिण भारतीय माणूस जगात जेथे जेथे गेला, तेथे तेथे त्याने कमल हसन व रजनीकांत यांचा दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटही नेला. तेथेही त्यांचे तमिळ, तेलुगू चित्रपट धो धो यशस्वी ठरले. अगदी जपानमध्येही रजनीकांत मॅनिया आहे. तेथेही त्याचे चित्रपट रेकाॅर्ड ब्रेक यश मिळवतात.
आता रजनीकांत मूळचा शिवाजीराव गायकवाड म्हणजे महाराष्ट्रीय. म्हणजे त्याच्या प्रगतीचा मराठी माणसाला आनंद होणे स्वाभाविक आहेच. तसा तो ‘आपला माणूस’. पण दक्षिणेवर राज्य केले. कोणी म्हणते, रजनीकांतचे चित्रपट म्हणजे, अतिरंजित, अतिशोयोक्तीपूर्ण महामनोरंजन असते. त्यात कसलाही सामाजिक आशय, गांभीर्य वगैरे नसते. तो कायमच महापराक्रमी नायक साकारतो. कोणी म्हणते रजनीकांतचे चित्रपट जनसामान्यांचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी त्याचा निर्मिती खर्च अबब म्हणावा असा व इतका प्रचंड का? ‘२.०’ ‘रोबोट’चे बजेट चक्क ५४० कोटी? तांत्रिक करामतीने बजेट वाढले की रजनीकांतच्या चित्रपटाला इतके भारी मार्केट आहे?
रजनीकांतला तेवढे आणि तसे भारी मार्केट आहे. फरक इतकाच की त्याचे काही चित्रपट कमी प्रमाणात यशस्वी ठरतात तर काही भारी प्रमाणात ठरतात. रजनीकांत आणि त्याचे चित्रपट हा कायमच विविध स्तरांवर चर्चेचा विषय असतोच, (त्याला लाभलेला दादासाहेब फाळके पुरस्कार हे नवीन निमित्त आहे) आणि हीच त्याची मोठी मिळकत आहे.
एस. शंकर दिग्दर्शित ‘२.O’ ‘रोबोट’ (अर्थात टू पाॅईंट ओ) हे त्याच्या स्वतंत्र चित्रपट संस्कृतीचे एक उदाहरण दिले. हा त्रीमिती (अर्थात थ्री डी) होता. हा चित्रपट सेटवर किती चित्रीत केला आणि त्यात तांत्रिक करामत किती असाही प्रश्न पडू शकतो. पण रजनीभक्तांना असा कोणताही प्रश्न पडत नाही. त्यांना फक्त आणि फक्त रुपेरी पडद्यावर रजनीकांतला “महाविजेता, महानायक” म्हणूनच पाह्यचे असते. तीच त्यांची मानसिक, भावनिक गरज आणि सवय आहे. असे चित्रपट समिक्षकांना फारसे कधी आपलेसे वाटत नाहीत. पण ते त्यांच्यासाठी अनेकदा तरी नसतातच.
रजनीकांतचा फॅन हा प्रामुख्याने कष्टकरी कामगार वर्ग आहे. घाम गाळणारा, स्वप्न पाहणारा, आजचे जगणे आजच एन्जाॅय करणारा (द्या जे काही होईल ते उद्या बघू अशाच वृत्तीचा) आहे. ते रजनीकांतच्या चित्रपटात आशयघनता शोधत नाही, ती त्यांची गरज नाहीये. याचा अर्थ रजनीकांतचा प्रत्येक मसालेदार मनोरंजक चित्रपट गर्दी खेचणारा ठरला असेही नाही. एखाद्या त्याच्या फसलेल्या चित्रपटाला रसिकांनी नाकारलेही. हे अपयश रजनीचे नसते, तर त्या चित्रपटाच्या पटकथा व दिग्दर्शक यांचे असते. रजनीकांतच्या ‘पडद्यापेक्षाही मोठा’ या वस्तूस्थितीला विचारात न घेताच त्यांनी ते चित्रपट साकारले असेच म्हणावे लागेल. रजनीकांतच्या चित्रपटाचा अभ्यास करताना अथवा त्यावर फोकस टाकताना त्या चित्रपटाची गुणवत्ता विचारत न घेता, त्या चित्रपटांच्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडींविषयी भाष्य करायला हवे. रजनीकांतसारखा अगदी साध्या रुपाचा माणूस सिनेमाचा आणि त्यातूनच जनसामान्यांचाही हिरो ठरला हे विशेषच कौतुकाचे आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, आपल्या आसपास असणारा माणूस रुपेरी पडद्यावरही आपलाच वाटू शकतो.
ॲनिमेटेड टेक्नाॅलाॅजी हा आजच्या चित्रपटाचा महत्वाचा घटक झाला आहे. त्यातही रजनीकांत फिट्ट बसलाय. अशाच त्याच्या Kochadaityaan (२०१४) या तमिळ चित्रपटाने उत्तम यश प्राप्त केले. तर ‘चंद्रमुखी’ (२००५) हा काॅमेडी हाॅरर तमिळ चित्रपट चेन्नईतील शांती चित्रपटगृहात तब्बल १२६ आठवडे चालला. अलिकडच्या काळात एखादा लोकप्रिय चित्रपटही शंभर दिवस चालत नाही यावरुन रजनीकांतचा झपाटा लक्षात येईल. ‘शिवाजी’ (२००७), लिंगा (२०१४), कबाली (२०१६) हे रजनीकांतचे अलिकडचे काही महत्वपूर्ण चित्रपट आहेत. आता तर त्याचा मूळ तमिळ चित्रपट हिंदी, तेलुगू व मल्याळम भाषेतही डब होऊन जगभरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचतोय. हे जास्त महत्वाचे आहे बरं का? त्यासह तो मराठीतही डब करण्यात यावा अशी काही चित्रपट प्रेमींची सोशल मिडियात पोस्ट असतेच.
त्यांचेही बरोबरच आहे, डब वा सबटायटल्सने कोणत्याही भाषेतील चित्रपट अन्य भाषेतील प्रेक्षकांपर्यंत पोहचत असतो. एक प्रकारे हा कलेचा विस्तारवाद आहे. रजनीकांतचा अलिकडचा सर्वाधिक उत्तम चित्रपट म्हणजे, ‘काला’. मला व्यक्तीशः हा चित्रपट खूपच आवडला. धारावीच्या जमिनीवरील सामाजिक व राजकीय कडव्या संघर्षाची ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. या चित्रपटात रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाचा जबरदस्त सामना पाह्यला मिळाला. विशेष म्हणजे रजनीकांतच्या चित्रपटाची मूळ संस्कृती, रजनीकांतची प्रदर्शित, प्रतिमा हे सर्व उपयोगात आणून एक सामाजिक वास्तव त्यात मांडल्याचे पाह्यला मिळते.
रजनीकांतची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल एक स्वतंत्र गोष्ट आहे. जाॅन जाॅनी जनार्दन (यात तिहेरी भूमिका), त्यागी, असली नकली, उत्तर दक्षिण (या चित्रपटात तो जॅकी श्राॅफ आणि माधुरी दीक्षितसोबत आहे), अंधा कानून (यात अमिताभ विशेष भूमिकेत आहे), फूल बने अंगारे (रजनीकांतची नायिका रेखा आहे), इन्सानियत के देवता (या चित्रपटात रजनीकांत आणि वर्षा उसगावकर यांच्यावर कव्वाली गीत आहे) वगैरे अनेक हिंदी चित्रपटात तो चमकला. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’चा मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त आजही आठवतोय. एका भव्य स्टेजवर अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रजनीकांत या तिघांनी अतिशय नाट्यमय असे दृश्य साकारत आम्हा उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या जबरा एनर्जीला तेव्हा प्रत्यक्षात अनुभवले.
अशा रजनीकांतचा एकदा मराठी चित्रपटाशी संबंध आला. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘एक फूल चार हाफ’ (१९९१) या चित्रपटाचा फिल्मीस्तान स्टुडिओतील मुहूर्त रजनीकांतच्या शुभ हस्ते झाला आणि या मुहूर्त दृश्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांनी सहभाग घेतला होता. सगळेच रजनीकांतच्या उपस्थितीने विलक्षण भारावून गेले होते. बरेच दिवस आम्ही या मुहूर्ताच्या वेळचा रजनीकांत यावर बोलत असू. कारण तो अनुभवच तसा होता. त्या काळात तो हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत असायचा. रजनीकांतच्या नावाने विनोद, टवाळी, मिम्सही बरेच. यशस्वी माणसाबद्दलच ते होत असते. रजनीकांत येथेही स्टार.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा त्याच्या चौफेर वाटचालीतील माईलस्टोनच म्हणायचा. आपल्या माणसाचे अभिनंदन आपण करायलाच हवे.
=====