‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
रॉकेट्री- द नाम्बी इफेक्ट!
इस्रोच्या एका शास्त्रज्ञाला आपल्या देशातील तंत्रज्ञान दुस-या देशाला विकल्याचा आरोप ठेऊन अटक करण्यात येते. त्याची थेट तुरुंगात रवानगी होते. भारताला पीएसएलव्ही सॅटेलाईट लॉन्च करण्यासाठी इंजिन बनवून देणा-या या शास्त्रज्ञावर हेर म्हणून ठपका ठेवण्यात येतो. तुरुंगात त्याला प्रचंड मारहाण करण्यात येते. त्याच्या अवघ्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात येते. अनेक वर्ष ही मानहानी सहन केल्यावर अखेर कोर्टात त्याला निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र मिळतं. नंतर या थोर शास्त्रज्ञाला पद्मभूषण देऊन सन्मानितही करण्यात आलं आहे. या शास्त्रज्ञाचं नाव आहे, नाम्बी नारायण.
इस्त्रोच्या या जेष्ठ आणि देशभक्त शास्त्रज्ञाला आलेला हा अनुभव आता पडद्यावर येत आहे. आर. माधवन या अभिनेत्यानं ‘रॉकेट्री- द नाम्बी इफेक्ट’ या चित्रपटातून नाम्बी नारायण यांचा जीवनपट उलगडला आहे. नुकताच ‘रॉकेट्री – द नाम्बी इफेक्ट’चा ट्रेलर सोशल मिडीयावर रिलीज झाला. या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, कंगना राणावत यांनी आर. माधवन यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. शिवाय अशा विषयाला प्राधान्य दिल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चित्रपटाचा काही भाग दाखवण्यात आला. नाम्बी नारायण आणि आर. माधवन यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचा काही भाग बघितला आणि आर. माधवन यांचे कौतुक केले.
रॉकेट्री- द नाम्बी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect) हा चित्रपट म्हणजे रॉकेट सायंटीस्ट नाम्बी नारायणन (Nambi Narayanan) यांच्यावरचा बायोपिक चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा आर. माधवन (R. Madhavan) यांनी लिहीली असून दिग्दर्शनही माधवन यांचेच आहे. याशिवाय आर. माधवन यांनीच नारायण यांची भूमिका साकारली आहे. तरुण नारायण ते वयोवृद्ध नारायण असा टप्पा दाखवतांना माधवन यांनी केलेल्या गेटअपचंही कौतुक होत आहे. नाम्बी यांचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटासारखा आहे. विक्रम साराभाई यांनी नाम्बी यांना प्रोत्साहन दिलं. त्यांना इस्त्रोमध्ये सामील करुन घेतलं.
इस्त्रोत (ISTRO) काम करतांना नाम्बी यांनी विकास इंजिन विकसीत केलं. जे आजही पीएसएलव्ही सॅटेलाईट लॉंच करण्यासाठी वापरण्यात येतं. ऑक्टोबर १९९४, एका महिलेला अटक करण्यात आली. या महिलेच्या माध्यमातून आपली टेक्नॉलॉजी दुस-या देशाला विकत असल्याचा आरोप नाम्बी यांच्यावर करण्यात आला. नाम्बी यांना तब्बल पन्नास दिवसांची कैद झाली. त्यात त्यांना मारहाण करुन गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांचे कुटुंब वाळीत टाकण्यात आले. त्यांच्या पत्नीला मंदिरात गेल्यावर साधा प्रसादही देण्यात येत नव्हता. वृत्तपत्रात सदैव नाम्बी यांच्याविरुद्ध लेख येत असत. त्यामुळे त्यांची प्रतिमा व्हिलन म्हणून झाली. कोणी रिक्षावालाही त्यांना रिक्षात घेत नसे. अखरे सीबीआयनी ही सर्व केस बनावट असल्याचे जाहीर केले.
सुप्रिम कोर्टाने त्यांनी निर्दोष जाहीर केले. २०१९ मध्ये भारत सरकारने नाम्बी यांचा पद्मभूषण देऊन गौरव केला. मात्र या सर्वात भारताच्या आंतराळ मोहीमेचे मोठे नुकसान झाले. किंबहुना ही मोहीम मागे टाकण्यासाठीच हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचे बोलले जाते. नाम्बी यांच्या अटकेनंतर इस्त्रो तब्बल पंधरा वर्ष मागे गेले. अभिनेता आर. माधवन यांनी तीन वर्षापूर्वी नारायण यांच्याबाबतची बातमी वाचली. त्यानंतर त्यांनी माधवन यांची भेट घेतली. त्यातूनच नाम्बी नारायण यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे माधवन यांनी ठरवले. गेली दोन वर्ष माधवन रॉकेट्री : द नाम्बी इफेक्ट’ या चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत.
हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगु आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटातील मोजका भाग पंतप्रधान मोदी यांना दाखवण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या देशातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्याची महिती नव्या पिढीला होण्यासाठी हा चित्रपट एक उत्तम माध्यम असल्याचे सांगितले. सबकुछ आर. माधवन असलेल्या ‘रॉकेट्री- द नाम्बी इफेक्ट’मधील माधवनच्या लूकचेही कौतुक होत आहे. याशिवाय चित्रपटात सिमरन असून विशेष भूमिकेत शाहरुख खान आहे. ‘रॉकेट्री – द नाम्बी इफेक्ट’च्या ट्रेलरवर प्रेक्षक बेहद खूष आहेत. आता मोठ्या पडद्यावर रॉकेट्री कधी येतोय याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.