दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बार्डोची संगीत जोडी- रोहन रोहन
१- बार्डोची संकल्पना सर्वप्रथम कोणच्या मनात आली आणि त्याची योजना कशाप्रकारे आखण्यात आली ?
सर्वप्रथम बार्डोची संकल्पना आमचा मित्र दिग्दर्शक भीमराव मोरे यांनी मांडली. यापूर्वी अशाप्रकारच्या सिनेमाचा आम्ही विचारदेखील केला नव्हता मात्र काहितरी नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा होतीच. सहसा आपल्याकडे नायक प्रधान संस्कृती अस्तित्वात आहे पण ‘बार्डो’ची कथा ही इतर सर्वसामान्य धाटणीच्या बाहेरची आहे. आणि हेच सर्वाधिक आकर्षक आहे.
२- बार्डोसाठी आपल्याला संगीत द्यायचय हे ठरल्यावर सर्वप्रथम मनातल्या भावना काय होत्या?
सुरवातीपासूनच आम्ही या वेगळ्या प्रयोगासाठी खूप उत्सुक होतो. स्वःताच्या कामाबद्दल संपूर्ण स्वातंत्र्य असलेल्या या प्रोजेक्टमुळे आम्ही खुश होतो. हा आमच्यासाठी एक ओपन कॅनवास होता ज्यावर आम्ही आमची कलाकृती साकारणार होतो. आणि त्याचमुळे या चित्रपटाची सगळी चारही गाणी एकमेकांपासून अतिशय वेगळी आणि सुंदर आहेत. प्रेक्षकांसाठी ही गाणी प्रयोगात्मक नसावीत कदाचीत पण आमच्यासाठी ही गाणी अतिशय प्रयोगात्मक होती, ज्याचं यश आपण पाहतोच आहोत. यामधीलच एका गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
३- सावनी सोबतचा काम करण्याचा अनुभव कसा होता? संगीतकार म्हणून तिच्यातलं काय वेगळेपण तुम्हाला जाणवतं ?
खरतर तीने आमच्यासाठी यापुर्वीदेखील गायलय. ते गाणंदेखील यशस्वी झालं होतं. खरं पाहता बार्डोचं हे गाणं मेल व्हर्जन होतं मात्र फिमेल व्हर्जन कसं जमतय हे पाहण्यासाठी फक्त एक प्रयोग म्हणून आम्ही सावनीला बोलावले होते. हे गाणं घरच्या सेटअप मध्ये गायले गेले आहे, कोणत्याही स्टुडिओमध्ये नाही आणि याहून सर्वात मोठं काय असू शकतं? एका गायकाने प्रयोगीक तत्वावर, घरच्या सेटअप वर गाणं गाउन त्य गाण्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळतो. हे सगळं भावनिक आहे. इतर संगीतकारांना देखील आमचं एवढच सांगण आहे की, तुमच्याकडे तांत्रिक बाबी किती पुऱ्या आणि अपुऱ्या आहेत यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या गाण्यात किती जीव ओतत आहात हे जास्त महत्वाच आहे.
५- बार्डोचं संगीत ठरवण्यापासून ते त्यावर काम करून तांत्रिक बाबी संपूर्ण होइपर्यंत साधारण किती कालावधी लागला?
मला वाटतं याला खूप वेळ गेला. कंपोजीशन लवकर झाले होते मात्र प्रत्येक गाणं आपापसाहून वेगळ्या धाटणीचे असल्याने वेळ लागला. साधारण पूर्णत्वासाठी २ वर्षे कालावधी गेला.
६- रान पेटलं गाण्याला पुरस्कार मिळाला आहे. या गाण्याबद्दल वाचकांना विषेश काय सांगाल?
रान पेटलं या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्टय हे आहे की, हे गाणं आम्ही ज्या वातावरणात कंपोज केलय आणि या गाण्याचा जो लहेजा आहे, एका वेगळ्या प्रकारात आहे ….एकंदरीत हे एक वेगळं समीकरण आहे. या सगळ्यांचे मिश्रण होउन जो पदार्थ बाहेर आलाय तोच परिक्षकांना फार भावला असं बोलणं वावगं ठरणार नाही.
७- या चित्रपटासाठी आपण संगीत दिले आहे त्याचबरोबर सहाय्यक दिग्दर्शन देखील केले आहे. या दोन्ही जबाबदारी पार पाडतानाचा तुमचा अनुभव काय सांगाल ? या दोन्हीचा मेळ कसा साधलात ?
खरतर हे आमच्यासाठी फार सोप्पं होतं. आमचे सहनिर्माते, पार्टनर, दिग्दर्शक या सर्वांनीच जबाबदारी घेतली होती. मला वैयक्तिक असे वाटते की ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं ते काम आपण छान करतोच.
८- तुम्ही यापुर्वी अनेक चित्रपटासाठी काम केले आहे, पण त्या सगळ्यामधून बार्डोचं काय वेगळेपण सांगाल?
फिल्ममेकिंगचे काही नियम असतात. एका ठरावीक वेळांत ज्या त्या ठरलेल्या गोष्टी होत असतात, मात्र बार्डो या सगळ्याच नियमांच्या पलीकडचा आहे. बार्डोचं हेच एक मोठं वैशिष्टय आहे.
९- बार्डो प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापुर्वीच चित्रपटाला यश मिळताना आपण पाहतोय. या अनुशंगाने पुढच्या वाटचालीबद्दल काही विषेश नियोजन केलय का ?
सध्या संकल्पना आहेत. आमच्या सहकाऱ्यांहस बोलून, विचारविणीमय करुन आम्ही लवकरच त्यावर काम सुरू करू.
शब्दांकन- शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: राष्ट्रीय पुरस्कार विजेती… सुरमयी सावनी!
=====