मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
मनोज वाजपेयी: बॉलिवूडचा कोहिनूर हिरा
बॉलीवूड फिल्म्सचा नायक हा देखणा आणि स्टायलिश असावा, त्याला अभिनय येवो अथवा न येवो, डान्स स्टेप्सच्या नावाखाली वाकड्यातिकड्या माकडउड्या मात्र मारता यायला हव्यात, भूमिकेसाठी गरजेचं असलेलं बोलीभाषांचं वैविध्य जपलं नाही तरी चालेल मात्र एका हिंदी वाक्यात किमान चारपाच इंग्रजी शब्द घुसवता यायलाच हवेत, प्रभावशाली देहबोली नसली तरी चालेल मात्र पिळदार शरीरयष्टी हवीच, असे सगळे नियम झुगारणारे काही प्रतिभावान कलाकार बॉलीवूडमध्ये आले आणि बघताबघता त्यांनी स्वतःची अशी विशेष ओळख निर्माण केली. हिरोसारखी बाचकळ स्टाईल न मारता फक्त अभिनयाच्या जोरावर आपण एखादी फिल्म आपल्या नावावर करू शकतो, हे या अभिनेत्यांनी सिद्ध करून दाखवलं. अश्याच गुणवंत अभिनेत्यांमधील एक बहुचर्चित नाव – मनोज वाजपेयी! (Manoj Bajpayee)
मनोज मूळचा बिहारचा. शेतकरी कुटुंबातल्या या पोराचं नाव लोकप्रिय फिल्मस्टार मनोजकुमारवरून ठेवलं गेलं, एवढाच काय तो फिल्मी दुनियेचा मनोजच्या कुटुंबाशी असलेला संबंध. बारावीनंतर उच्चशिक्षणासाठी त्याने दिल्ली गाठलं आणि तिथेच त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) बद्दल कळालं. नसरुद्दिन शाह, ओम पुरी या मोठ्या नावांचा प्रभाव मनोजवर होताच, त्यात आपणही मनोजकुमारसारखा अभिनेता बनू शकतो, हा विश्वास त्याच्या मनात होता. पण दुर्दैवाने त्याला तीनवेळा प्रवेश नाकारण्यात आला. ‘चाचा चौधरी’ अर्थात रघुबीर यादवांनी त्याची घालमेल ओळखली आणि बॅरी जॉनच्या कार्यशाळेत त्याला प्रवेश मिळवून दिला. मनोजची झपाट्याने होणारी प्रगती पाहून जॉनने त्याला सहाय्यक शिक्षकाची ऑफर देऊ केली. त्यानंतर जेव्हा मनोजने चौथ्यांदा NSD साठी प्रवेश अर्ज भरला, त्यावेळी त्याची विद्यार्थी म्हणून निवड न होता थेट शिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली.
१९९४मध्ये शेखर कपूरच्या ‘बँडीट क्वीन’मधील डाकू मान सिंगची भूमिका वगळता त्याला ‘द्रोहकाल’, ‘दस्तक’, ‘तमन्ना’ अश्या चित्रपटांमध्ये लहानसहान रोल्सच मिळत गेले. त्यादरम्यान टीव्हीवर ‘कलाकार’, ‘इम्तिहान’ आणि ‘स्वाभिमान’सारख्या मालिकांमध्येही तो झळकत होता. ‘दौड’मध्ये काम करत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्माला या हिऱ्याची खरी चमक कळाली आणि त्याने मनोजला एक वेगळा आणि चांगला रोल देण्याचं मनाशी पक्कं ठरवलं. १९९८ला आलेला ‘सत्या’ भारतीय सिनेमाचा मानदंड ठरला. मनोजने साकारलेला भिकू म्हात्रे प्रेक्षकांना प्रचंड आवडला. मुंबईला आपल्या तालावर नाचवून घरात मात्र बायकोच्या इशाऱ्यावर डोलणाऱ्या डॉनची ही भूमिका मनोजने अजरामर केली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्याने त्यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.
निर्माता, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि अभिनेता मनोज वाजपेयी या जोडगोळीने पुढे ‘शूल’, ‘कौन’सारखे कल्ट क्लासिक्स दिले. ‘कौन’मधला बडबड्या समीर आणि ‘शूल’मधील इन्स्पेक्टर समरप्रताप सिंग या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा त्याने उत्तमरीत्या साकारली. एव्हाना मनोज हा काय ताकदीचा अभिनेता आहे, याची जाणीव बॉलीवूडला झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याला ऋतिक रोशनसोबत ‘फिजा’, तब्बूसोबत ‘दिल पे मत ले यार’, ‘घात’ आणि अमिताभसोबत ‘अक्स’मध्ये संधी मिळाली. ‘अक्स’मधील त्याने साकारलेला राघवन उत्कृष्ट खलनायकी भूमिकांपैकी एक मानला जातो तर ‘झुबेदा’मध्ये (२००१) त्याने साकारलेला चार्मिंग आणि तडफदार महाराजा विजयेंद्र सिंग हा त्याच्या देखणेपणाची झलक दाखवतो.
त्यानंतर २०१० उजाडेपर्यंत मनोजला अपेक्षित यशासाठी बरीच वाट पाहावी लागली. ‘पिंजर’, ‘LOC कारगिल’ आणि ‘वीर झारा’ वगळता इतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरू शकले नाही. फाळणीसारख्या संवेदनशील विषयावर आधारित असलेला ‘पिंजर’ आणि त्यामधील मनोजचा पुरोवर निस्वार्थ भावनेने प्रेम करणारा ‘रशीद’ प्रेक्षकांना विशेष आवडला. त्याला या काळात बऱ्याचश्या चांगल्या भूमिका मिळत होत्या पण प्रेक्षकांपर्यंत त्या पोहोचण्यात बरेच अडथळे येत गेले. सेमी हिट, स्लीपर हिट, फ्लॉप, सुपर फ्लॉप चित्रपटांची रांगच लागली होती.
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत केलेला ‘हॅप्पी’देखील फारशी कमाल दाखवू शकली नाही. पण प्रकाश झा दिग्दर्शित ‘राजनीती’ने (२०१०) मनोजच्या करिअरमधला हा मोठा दुष्काळ संपवला आणि विरेंद्रप्रतापच्या भूमिकेतून मनोजने दमदार पुरागमन केलं. दुर्योधनाच्या शेडमध्ये रंगवलेलं हे पात्र मनोजने आपल्या अभिनयाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि सर्व टीकाकारांना ‘करारा जवाब’ दिला. इकडे तेलुगूमध्ये ‘वेदम’ आणि ‘पुली’सारखे मल्टीस्टारर सिनेमेही हिट ठरले आणि मनोजचा आत्मविश्वास द्विगुणित झाला.
‘राजनीती’च्या यशानंतर मनोजने पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ने तर त्याच्या बेलगाम घोडदौडीला हिरवा कंदीलच दाखवला. त्याने सरदार खानच्या भूमिकेसाठी चक्क टक्कल केलं. हा मग्रूर, हिंसक, शिवराळ सरदार खान प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरला. प्रकाश झाने त्याला कधी प्रोफेसर मिथिलेश बनवलं (आरक्षण) तर कधी नक्षली नेता राजनची (चक्रव्यूह) भूमिका दिली. बेदब्रत पाईन दिग्दर्शित ‘चिट्टगाँग’मध्ये त्याने क्रांतिकारक सूर्या सेनची भूमिका साकारली. कोणत्याही बोलीभाषेचा लहेजा अचूक पकडून ते पात्र उभं करण्याचं कसब मनोजला चांगलंच अवगत होतं त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचं भाग्य त्याला लाभलं.
कर्नल अभय सिंग (ऐय्यारी), सीबीआय ऑफिसर वसीम खान (स्पेशल छब्बीस), इंटेलिजन्स ऑफिसर श्रीकांत तिवारी (द फॅमिली मॅन), DIG अजय शेरगिल (बाघी 2), सिक्रेट एजंट रणवीर सिंग (नाम शबाना), DCP शिवांश राठोड (सत्यमेव जयते), ACP अविनाश वर्मा (सायलेन्स), निवृत्त हवालदार गणपत भोसले (भोसले) ही सगळी पात्रं मनोजने तितक्याच ताकदीने उभी केली, जितकी मेहनत त्याने डॉन झुबेर हसकर (शूटआउट अॅट वडाला), बाहुबली गजेंदर सिंग (तेवर), विरोधी पक्षनेता गोविंद देशपांडे (सरकार 3), कोठामालक फैझल (लव्ह सोनिया), सरदार मान सिंग (सोनचिरीया) या पात्रांसाठी घेतली होती. ‘अलीगढ’मधील प्रोफेसर रामचंद्र सिरस या समलैंगिक शिक्षकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. ‘सात उचक्के’मधला पप्पी असो वा ‘सुरज पे मंगल भारी’ मधला मधू मंगल राणे हा गुप्तहेर, मनोजने या विनोदी व्यक्तिरेखाही उत्तम साकारल्या आहेत. ‘गली गुलियाँ’मधला खुद्दूस आणि ‘बुधिया सिंग’मधील बिरांची दास या मनोजने साकारलेल्या व्यक्तिरेखांनीही प्रेक्षक आणि जाणकारांकडून कौतुकाची थाप मिळवली.
भारतीय मेथड ॲक्टर्सच्या पंगतीत मानाचं पान मिळवलेला मनोज त्याच्या इम्प्रोव्हायझेशन्ससाठी जास्त ओळखला जातो. ‘कौन’मधील त्याची डोक्याला तिडीक जावी अशी अविरत बडबड असो, सरदार खानच्या भूमिकेसाठी टक्कल करणं असो किंवा ‘भोसले’मधील संवादांपेक्षा संथ हालचालींमधून गणपतची एकाकी, निरस दिनचर्या अधोरेखित करणं असो, मनोज त्याच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय मिळवून देण्यात कायमच यशस्वी ठरतो. ‘आऊच’, ‘क्रिती’, ‘जय हिंद’सारख्या शॉर्ट फिल्म्समधील त्याचं काम निश्चितच वाखाणण्याजोगं आहे.
एक व्हॉईस आर्टिस्ट म्हणून त्याने ‘रामायणा: द एपिक’मध्ये श्रीराम आणि ‘महाभारत’ या ॲनिमेशन फिल्ममध्ये युधिष्ठिरासाठी आवाज दिलेला आहे, रील लाईफमध्ये हिरोला नकोनकोश्या वाटणाऱ्या खलनायकी भूमिका करणारा मनोज रिअल लाईफमध्ये मात्र एक सुस्वभावी, मितभाषी आणि विनम्र हिरो आहे. त्याच्या अस्सल बिहारी अंदाजातल्या खेळकर स्वभावाने तो सेट जिवंत ठेवतो. बिहारच्या ‘लिट्टी चोखा’सारख्याच ह्या लोकप्रिय कलावंताचा आज वाढदिवस.
कलाकृती मीडियातर्फे जनमदिन की ढेर सारी शुभकामनाए, मनोजवा!!
जिया हो बिहार के लाला! जिया तू हजार साला!!
=====
हे देखील वाचा: ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रेक्षकांना मनोजच्या या भूमिकेने मिळणार दिलासा…
=====