दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
संगीतसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर!
मराठी संगीत रंगभूमी अनेक थोर गायकांनी आपल्या दमदार गायकीने समृद्ध केली आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील संगीतसूर्य म्हणून ओळखले जाणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर त्यापैकीच एक. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. गणेशभट्ट आणि येसुबाई अभिषेकी यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar). दीनानाथांच्या लहानपणीच त्यांच्या आईने त्यांच्यातील गायन गुण हेरले होते. त्यांना गाण्यासोबत सारंगी आणि तबलावादनाचे धडेही त्यांच्या आईने दिले होते. अतिशय कमी वयात दीनानाथांच्या गायकीचा बोलबाला झाला. अशावेळी दीनानाथांनी आपले आडनाव बदलून आपल्या कुलदैवताच्या नावाचा स्वीकार करत मंगेशकर हे आडनाव धारण केले.
सुरुवातीचा काळ शिकण्याचा अनुभव घेण्याचा होता. किर्लोस्कर नाटक मंडळीत राहून दीनानाथांनी कोलकाता ते दिल्ली हिंदी उर्दू नाटकांतही कामं केली. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी स्वतःची बलवंत नाटक मंडळी स्थापन केली. ‘शाकुंतल’ या नाटकाने या कंपनीची सुरुवात झाली. दीनानाथांची गायनकला स्वयंस्फुर्त असली तरी शास्त्रीय संगीतात स्थानप्राप्तीसाठी कोणाचं तरी शिष्य होणं आवश्यक होतं तेव्हा दीनानाथांनी वझेबुवांचा गंडा बांधला. मास्टर दीनानाथाच्या बलवंत संगीत मंडळींनी ज्या अनेक नव्या प्रथा सुरू केल्या त्यात मराठी नाटकांचा मॅटिनी शो ही प्रथा एक होती. बलवंत संगीत मंडळींनी भावबंधन नाटकापासून तिकीटाचे दर पाच रु. केले जे आताच्या काळात २०० रु इतके ठरतात.
मास्टर दीनानाथांच्या गायकीविषयी बालगंधर्वानी काढलेले उद्गार पहा “हा मुलगा जर माझ्या नाटक कंपनीत यायला तयार झाला असता तर मंगेशी पासून मुंबई पर्यंतच्या रस्त्यावर रुपयांचा गालिचा घालून व त्यावर अमर्त्य शिंपडून मी त्याचं स्वागत केलं असतं. यांच्या गळ्यात काळीज हेलावून टाकण्याचे सामर्थ्य आहे. “मास्टर दीनानाथांनी संगीत रंगभूमीला जे काही देऊ केलं, तितकीच मोठी देणगी म्हणजे पाच मंगेशकर भावंड. आपली गायकी त्यांनी लता, आशा या आपल्या मुलींमध्ये जिवंत ठेवली. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना गायकीचं बाळकडू वडिलांकडूनच मिळालं.
मास्टर दीनानाथांच्या आयुष्याचा प्रवास विलक्षण होता. टोकाचं यश, सन्मान आर्थिक सुबता त्यांनी पाहिली तितकीच गरीबीही… शेवटचा काळ त्यांच्यासाठी कठीण होता. शुक्रवार दिनांक २४ एप्रिल १९४२ रोजी मास्टर दीनानाथांचा मृत्यू झाला तेव्हा जगाला त्याची खबरदारी नव्हती. चांगल्या काळातील मित्र सोडाच पण रक्ताचे नातेवाईकही अंत्यसंस्काराला आले नाही. केवळ सहाच जण अंत्यसंस्काराला उपस्थित होते. ससून रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. कुणी टॅक्सी वाला यायला तयार होईना. शेवटी एका वृद्ध टॅक्सीवाल्याला विचारल्यावर त्याने कोण व्यक्ती आहे?अशी विचारणा केली.
हे वाचलेत का ? लता मंगेशकर : एक विद्यापीठ
मास्टर दीनानाथांचा मृतदेह न्यायचाय कळल्यावर तो तयार झाला कारण त्याच्यामते दीनानाथांच्या नाटकाला होणा-या गर्दीमुळे त्याने नाटकादरम्यान खूप पैसा कमावला होता. त्यामुळे पैसे मिळतील वा नाही याची चिंता न करता तो टॅक्सी ड्रायव्हर दीनानाथांचा मृतदेह घेऊन आला. इतकेच नव्हे तर अंत्यसंस्काराला थांबला. मास्टर दीनानाथांच्या मुलाचं अर्थात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं वय तेव्हा अवघं पाच वर्षे असल्याने मास्टर दीनानाथांचे सहकारी अभिनेते श्रीपाद जोशी यांनी चितेला अग्नी दिला. अर्थात अशा निराशेच्या राखेतूनच पुढे लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर, ऊषा मंगेशकर, मीना खडीकर अशी पंचरत्न आपल्या वडिलांच्या गायकीचा वारसा पुढे न्यायला सिद्ध झाली.
मास्टर दीनानाथांनी रंगभूमीला दिलेलं योगदान अमूल्य आहे पण त्याचबरोबर पाच भावंडांमधून मास्टर दीनानाथांचे जे संगीत बहरत राहीले ते देखील महत्वाचे. या संगीतसूर्याला त्यांच्या स्मृतीदिनी मानाचा मुजरा!