‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘माणूसपण’ जपणारी अभिनेत्री
अश्विनी भावेची (Ashwini Bhave) तुझी आवडती भूमिका कोणती असे आजच्या डिजिटल पिढीतील कोणी मला विचारले तर मी पटकन सांगतो, तिचे माणूसपण! तिच्या आजपर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीचा ग्राफ माझ्या समोरच घडलाय. याचं कारण आम्ही समकालीन. तिचे जवळपास सगळे मराठी व हिंदी चित्रपट मी पाहिलेत. पण तिची ‘आहुती’मधील भूमिका, अथवा ‘वजीर’मधील भूमिका यापेक्षा तिचं माणूसपण जास्त महत्वाचे आहे.
ताजे उदाहरण म्हणजे, वर्षभरातील कोरोना काळात तिने नाट्य क्षेत्रातील कामगारांसाठी केलेला मदतीचा हात. अमेरिकेत स्थायिक होऊनही ती मराठी मनोरंजन क्षेत्राला विसरली नाही. वर्षभरात दुर्दैवाने निधन झालेल्यांची दखल घेत तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट खूप भावनिक आहे. ती तिकडे आहे, पण इकडच्या लहान मोठ्या आणि चांगल्या वाईट गोष्टींवर तिचे लक्ष आहे. त्यावर ती एक व्यक्ती म्हणून व्यक्त होते. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देताना तिच्या रुपेरी वाटचालीवर वेगळा फोकस टाकावा लागेल.
आज आर. के. स्टुडिओची वैभवशाली वास्तू नाही. पण जेव्हा ती होती तेव्हा तेथे एखाद्या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी (उदा. मनमोहन देसाई निर्मित ‘अल्लारखा’) गेल्यावर राज कपूरचे अर्थातच आर. के. फिल्मचे जुने चित्रपट, त्याचे गीत, संगीत आणि नृत्य, ‘बाॅबी’तील डिंपल यासह अश्विनी भावेचेही आठवण येई. आजच्या पिढीला कदाचित कल्पना नसेल पण एकेकाळी आर. के. फिल्म या प्रतिष्ठित बॅनरच्या चित्रपटातून भूमिका साकारायला मिळणे अनेकांचे स्वप्न असे, आणि त्यात प्रतिष्ठाही असे. त्यात जर ‘नायिका’ साकारायला मिळाली तर? नर्गिस (आवारा, बरसात, श्री ४२० इत्यादी) पद्मिनी (जिस देश में गंगा बहती है), वैजयंतीमाला (संगम), डिंपल कपाडिया (बाॅबी), झीनत अमान (सत्यम शिवम सुंदरम) ही काही बोलकी उदाहरणे आहेत.
खरं तर “हीना” (१९९१) पडद्यावर आणणे हे राज कपूरचे स्वप्न होते, त्यांनी दोन गाण्यांचे रेकाॅर्डिंगही केले. पण त्यांच्या निधनानंतर रणधीर कपूरने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे हाती घेतली. ऋषि कपूर आणि नवतारका झेबा बख्तियार यांची निवड झाली होती आणि या चित्रपटातील आणखीन एक नायिका निवडायची होती. गाॅसिप्स मॅगझिनमधून काही नावे चर्चेत आली. उलटसुलट बातम्या आल्या. पण एके दिवशी सकाळी काही मराठी वृत्तपत्रात पहिल्या पानावर बातमी आली, आर. के. फिल्मच्या चित्रपटात अश्विनी भावे! मराठी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात एकाच वेळेस आश्चर्य, कौतुक आणि उत्सुकता अशी वेगळी प्रतिक्रिया उमटली. असे काही घडेल अशी कोणीही कल्पना केली नव्हती आणि अश्विनी भावेची तर मराठी चित्रपटसृष्टीतील वाटचाल यशस्वीपणे सुरु होती.
अश्विनी भावेला ही संधी कशी मिळाली या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडूनच घ्यायला हवे ना? तिला सकाळीच फोन करताच तिने चुनाभट्टी येथील घरी मुलाखतीसाठी बोलावले. ती म्हणाली, स्टार फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेले फोटो रणधीर आणि ऋषि कपूर यांनी पाहिले. ते इम्प्रेस झाले आणि मग तिची आर. के. स्टुडिओत रितसर मुलाखत (स्क्रीन टेस्ट) घेतली. विशेष म्हणजे अनेकदा तरी आर. के. स्टुडिओच्या बाहेरुन जाणे होई. तेव्हा तिला अजिबात कधी असे वाटले नाही की, याच स्टुडिओच्या प्रतिष्ठित बॅनरच्या चित्रपटात आपण भूमिका साकारु.
लगोलग खूपच मोठ्या प्रमाणावर अश्विनीच्या सगळीकडे मुलाखती येऊ लागल्या. तिचे या चित्रपटासाठीचे पहिले शूटिंग आर. केतच होत होते. या चित्रपटातील देर ना हो जाए कही देर ना हो जाए या तिच्यासह अन्य डान्सरवरच्या गाण्याने तिचे शूटिंग सुरु झाले. ती मेकअप करून सेटवर आली आणि थक्क झाली. आर. के. फिल्मच्या अनेक चित्रपटात पाहिलेला उभा जिना आणि भव्य बैठक असलेला महाल अशा सेटवर तिने पाऊल टाकले आणि ती शहारली. पडद्यावरचा भव्य दिव्य सेट ती प्रत्यक्षात प्रथमच अनुभवत होती. या एका गाण्याचे शूटिंग आठ नऊ दिवस चालले. त्याशिवाय स्वित्झर्लंडच्या निसर्ग सौंदर्यात ती आणि ऋषि कपूरवर रोमॅन्टीक गाणे आहे.
गंमत म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा काय होती? तर या चित्रपटासाठी अश्विनीला किती किती छान ड्रेस परिधान करायला मिळाले ना? मराठी चित्रपटात तिला अशी श्रीमंती अजिबात मिळाली नसती, हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतानाच आर. के. फिल्म अशा बड्या बॅनरचा चित्रपट म्हणजे तिचं नशीब कसे दांडगे आहे ना? वगैरे वगैरे . आणि मग चर्चेतील मुद्दे वाढतच गेले. इंग्रजी मॅगझिनमधून तिला केवढे तरी कव्हरेज मिळतेय. तिची टाॅपच्या फोटोग्राफर्सनी छान ग्लॅमरस फोटो सेशन्सही केली… वगैरे वगैरे बरेच काही चर्चेत होते.
अश्विनी भावेच्या यशस्वी कारकिर्दीतील ‘हीनाचे दिवस’ एक वेगळे अनुभव आहेत, याची मला कल्पना असल्यानेच आर. के. स्टुडिओच्या विक्री आणि तेथे कमर्शियल काॅप्लेक्स उभारण्याची एका इंग्रजी वृत्तपत्रात बातमी येताच मी तिला कळवताच तिने लगोलग अमेरिकेतून फोन केला. तिच्यासाठी हा इमोशनल धक्का होता. तिच्या बोलण्यात ते प्रकर्षाने जाणवले. अगदी आर. के. स्टुडिओत पहिल्या मजल्यावर मेकअप करुन खाली उतरताना दिसणारा भला मोठा आरसा तिच्यासाठी विशेष आठवण होती. त्यावर तिने एक विशेष लेखही लिहिला. अश्विनी भावेची मराठी चित्रपटातील कारकिर्द प्रभाकर पेंढारकर दिग्दर्शित ‘शाब्बास सूनबाई’ (१९८६) या चित्रपटापासून सुरु झाली. हा चित्रपट भालजी पेंढारकर यांच्या ‘सूनबाई’ (१९४२) या चित्रपटावर बेतलेला. निर्माते, कथा पटकथा संवाद भालजी पेंढारकर यांचे. अश्विनीची चित्रपटातील सुरुवात अगदी वैशिष्ट्यपूर्ण. अजिंक्य देव त्यात तिचा नायक होता. दादरच्या कोहिनूर थिएटरमधील (आता त्याजागी नक्षत्र माॅल आहे) प्रीमियरला बाळासाहेब ठाकरे यांची खास उपस्थिती होती.
अश्विनी भावे पहिल्यापासूनच फोकस्ड पर्सनालीटी आहे हे या चित्रपटाच्या निमित्ताने आमची पहिली भेट झाली तेव्हा एकूणच तिच्या बोलण्यात लक्षात आले. तिचे वडील एस.आय.ई. काॅलेजमध्ये केमिस्ट्रीचे प्राध्यापक आणि आई साधना विद्यालयात शिक्षिका, स्वतः अश्विनी रुपारेल काॅलेजमधून फिलाॅसाॅफी विषयात बी. ए. असल्याने अश्विनी पहिल्या भेटीपासून अतिशय मॅच्युअर्ड वाटणे स्वाभाविक होतेच. आणि अनेक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका साकारुनही फिल्मी झाली नाही. त्या ग्लॅमरस वातावरणात हरवून गेली नाही. हे जमणे वाटते तितके सोपे नसते. तिने किती मराठी चित्रपट आणि नाटकात भूमिका साकारल्या, हिंदी चित्रपटात ऋषि कपूर, जॅकी श्राॅफ, अक्षयकुमार, नाना पाटेकर वगैरे कोणत्या नायकांसोबत भूमिका केल्या, ‘राऊ’ मालिकेत तिने मस्तानी साकारलीय, दोन कन्नड चित्रपटातही तिने भूमिका साकारल्या आहेत. अशा प्रगती पुस्तक अथवा तपशीलांपलिकडे तिचं ‘असणं’ आहे.
एकीकडे आजही सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’मधील अशोक सराफबरोबरचा तिचा लिंबू कलरची साडी प्रसंग लोकप्रिय आहे आणि आजही ‘हा चित्रपट कितीदाही पाह्यला तरी कंटाळा येत नाही, फ्रेश व्हायला होतं’ असा तिला छान प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडे आज अमेरिकेतील आपल्या घरी ती फळलागवड, भाजी लागवड यांचा मनो’भावे’ आनंद घेत त्याचे व्हिडिओ सोशल मिडियात पोस्ट करीत असते. मुंबईतील काही व्हाॅटसअप ग्रुपवरही ती आहे. मी देखिल इकडच्या महत्वाच्या घडामोडी तिला कळवतो, कधी बोलणंही होते.
अमेरिकेतील किशोर बोपर्डीकर या साॅफ्टवेअर इंजिनिअरशी १९९७साली लग्न करुन ती अमेरिकेत स्थायिक झाली तरी ती तेव्हापासून आजही ॲक्टीव्ह आहे. अमेरिकेत युनिव्हर्सिटीत तिने फिल्म मेकिंगचा डिग्री कोर्स केला. २००२ साली तिने भारतात येऊन ‘वारली पेंटींग’वर लघुपट निर्माण केला. अधूनमधून ती मुंबईत येते. अशातच एकदा कासा फिल्म या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना करुन ‘कदाचित’ (२००७) या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित सायकाॅलाॅजिकल थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा’ (२०१३), जतिन वागळे दिग्दर्शित ‘मांजा’ (२०१८) अशा काही चित्रपटात भूमिका साकारली.
या सगळ्यात मला जास्त महत्वाचे वाटते ते तिचा समंजसपणा आणि माणूसपण. आणि त्याच वेळी आपल्या अमेरिकेतील प्रशस्त घरात छोट्या छोट्या गोष्टींचा, दोन मुलांच्या मातृत्वाचा ती अतिशय काळजीपूर्वक घेत असलेला आनंद.