हिट गाण्यांचा नवा फंडा!
सलमान खानच्या ‘राधे’मधील सिटी मार गाण्याला यु ट्यूबवर थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०० मिलियनपेक्षा जास्त (म्हणजे एकावर किती शून्य? कॅलक्यूलेटर पाह्यला हवा) Views मिळाले आणि मला शालेय वयात असताना आम्ही गंगा थिएटरमध्ये ‘प्रतिज्ञा’ (१९७५) सिनेमा पहायला गेलो असता धर्मेंद्र जेव्हा मै जट यमला पगला दीवाना… गाणे सुरु होताच अख्ख्या हाऊसफुल्ल थिएटरमध्ये (क्षमता हजार बाराशे सीटस) कानाकोपऱ्यातून शिट्ट्या वाजू लागल्या ते आठवले. अजूनही कानात त्या शिट्ट्या वाजताहेत…
दोन्हीत काॅमन फॅक्टर शिट्टी हाच आहे, एकात पब्लिक शिट्टी वाजवते (त्यात त्याना भरपूर आनंद मिळतो. पब्लिक सिटीवरुन पब्लिसिटी शब्द आला असावा. पूर्वीच्या चित्रपट आणि गाण्याना पब्लिकच्या माऊथ पब्लिसिटीने दूरदूरवर नेले. दोन्हीना सुपर हिट केले) तर एका गाण्याच्या मुखड्यात ‘सिटी’ आहे आणि आजच्या ग्लोबल युगातील सोशल मिडियात त्याचे यश लाईक्सवर मोजले जाते. तांत्रिक प्रगती म्हणतात ती हीच. अर्थात, ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट पाहताना मोबाईल हातात असताना शिट्टी वाजवता येणार नाही (कसे शक्य आहे?) आणि लॅपटॉप अथवा टीव्हीवर चित्रपट पाहताना घरातल्या घरात शिट्टी वाजवणे कोणी पसंत करीत असेल असे चुकूनही वाटत नाही. ‘होम थिएटर’ ही संकल्पना समाजात रुजली असली तरी कोणी शिट्टी मारुन गाणे अथवा संवादाला दाद देणार नाही. गाण्याच्या लोकप्रियतेची मोजदाद करण्याची पध्दतही बदलत्या काळानुसार बदलत गेली. ती चांगली की वाईट हा वेगळा विषय आहे, पण तोच ‘रिॲलिटी शो’ आहे.
मला अनेकदा तरी प्रश्न पडतो, साठच्या दशकापर्यंतही मध्यमवर्गीयांच्या घरी रेडिओ येणे म्हणजे फक्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच घरी श्रीखंड आणणे आणि ऐन दिवाळीत घरी चकली करणे इतकं ते दुर्मिळ होते आणि ज्याच्या घरी रेडिओ आणला जाई तो पाह्यला अख्खी चाळ जमे (माझ्या वयाच्या सातव्या वर्षी आमच्या गिरगावातील दहा बाय दहाच्या घरी वडिलांनी रेडिओ आणला तेव्हा ते मी अनुभवलेय. आईने तेव्हा त्या आनंदाप्रीत्यर्थ सगळ्याना रेशनवरची साखर वाटली होती. तेव्हा अनेक गोष्टी रेशनवरच मिळाल्या तर मिळत) इतकी ती दुर्मिळ गोष्ट असूनही चित्रपट गीते लोकप्रिय कशी होत? हवेतून प्रसार शक्यच नाही. याचाच अर्थ, तेव्हा प्रसार माध्यमे मोजकी असली तरी गाणी श्रवणीय असत आणि माध्यमांच्या असतील / नसतील त्या सगळ्या मर्यादा ओलांडूनही ती लोकप्रिय होत.
त्यासाठी तेव्हाच्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, गायक, संगीतकार अशा सगळ्यांना भरपूर श्रेय द्यायला हवे. त्यांनी एकेका गाण्याच्या जन्मावर घेतलेल्या सिटींगना दाद द्यायला हवी. त्या काळात फक्त आणि फक्त सिनेमात गाणी पाह्यला मिळत. आणि थिएटरबाहेरच्या जगात सणासुदीला लाऊडस्पीकर, आॅर्केस्ट्रा, तसेच घरी ग्रामोफोन असेल तर तबकडी विकत आणायला हवी. घरी ग्रामोफोन असणे श्रीमंतीचे लक्षण होते. अथवा इराणी हाॅटेलमध्ये ज्यूक बाॅक्समध्ये दहा पैशाचे नाणे टाकून गाणे ऐकावे लागे. (नंतर ते पैसे वाढत गेले.) पिकनिकला भेंड्या खेळण्यात हिट गाणी ओठावर येत तर रस्त्यावरचा भिकारी जे गाणे गायचे ते हिट मानले जाई. औलाद वालो फुलो फलो…
ज्या चित्रपटांच्या तबकड्या जास्त विकल्या जात ती गाणी जास्त लोकप्रिय हे एक सोपे गणित होते. त्याची कव्हर्स कल्पक असत. त्यावर चित्रपटाचा आणि गाण्याचा मूड व्यक्त होई. रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालामधील सरताज गाणे हेदेखील गाण्याची लोकप्रियता अधोरेखित करे. प्रत्येक बुधवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत रेडिओला कान लावून बिनाका ऐकून चित्रपट रसिकांच्या दोन पिढ्या मोठ्या झाल्या. मीही त्यातलाच. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, चाळीत एखाद्याकडेच रेडिओ असेल तर त्याच्याकडे सगळे फिल्म दीवाने जमत आणि बिनाका ऐकत. आणि मग आठवडाभर त्यातील गाण्यांवर उलटसुलट चर्चा, वाद विवाद (तो हवाच) करीत हे त्या गाण्यांची लोकप्रियता सिध्द करीत. समाजात गाणे मुरणे म्हटतात ते हेच. यात चित्रपट आणि त्याच्या संगीताचा समाजावरचा खोलवरचा प्रभाव दिसतो. त्यात मग एकेका गाण्याच्या जन्माच्या गोष्टी / किस्से / कथा / दंतकथा हिरीरीने सांगितल्या जात.
त्या सांगायच्या तर भरपूर वाचन हवे. फिल्मी गप्पात आपण कुठेही कमी पडू नये ही जागरूकता कमालीची असे. इगो असत. गाण्याचे वेड वेड म्हणतात ते हेच आहे. तेव्हा पेरलेल्या अगणित आणि बहुरंगी गोष्टी आज गीतकार संगीतकार गायकांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी व्हाॅटसअपवर फिरतात. त्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली, टीव्ही शो आहेत. पन्नास साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या चित्रपटाच्या गाण्यांची लोकप्रियता आणि त्याच्या गोष्टी आजही रंगतात हे यशाचे वेगळे मोजमाप आहे. विविध भारतीवर आपण एका पत्रावर आपले आवडते गाणे ऐकवा हे लिहून पाठवण्यात आनंद मिळे आणि यातही ज्या गाण्याची फर्माईश जास्त ते गाणे लोकप्रिय हे समीकरण होते. म्हणजे हिट गाण्याचा प्रवास टपाल खात्यातूनही जात असे. लोकप्रिय गाणे फक्त पडद्यावर राहते असे नव्हे मुळी.
भगवानदादांच्या ‘अलबेला’च्या (१९५१) भोली सूरत दिल के खोटे, श्याम ढले खिडकी तले या गाण्याच्या वेळी इंपिरियल थिएटरमध्ये पडद्यावर पैसे उडवले जात, प्रेक्षक खुर्ची सोडून पडद्यासमोर नाचत अशी मागची पिढी आम्हाला रंगवून खुलवून सांगे. तेच आजच्या पिढीने ‘सैराट’च्या (२०१६) झिंगाट गाण्याला संपूर्ण राज्यभर मल्टीप्लेक्समध्ये सीटस सोडून नाचणे अनुभवले. खरं तर याच मल्टीप्लेक्स कल्चरने ‘गाण्याला शिट्टी वाजवणे’ कालबाह्य केले, डाऊन मार्केट मानले. पण गाण्याला थिएटरमध्ये शिट्टी वाजली की ते सकारात्मक मानायचे हीच आपल्या चित्रपट प्रेक्षक संस्कृतीची खरी पारंपरिक ओळख आणि प्रथा आहे. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ (१९७२) च्या गाण्यांना इतक्या आणि अशा शिट्ट्या वाजत की संपूर्ण थिएटरमधला माहोल बदलला जाई.
सत्तरच्या दशकात मध्यमवर्गीयांच्या घरी टेपरेकाॅर्ड आला आणि कुठे ओटीवर तर कुठे गच्चीत ‘गाणी ऐकण्याच्या मैफली’ जमू लागल्या. त्यात दिलीपकुमार, मोहम्मद रफी आणि नौशाद असे समीकरण, राज कपूर, मुकेश आणि शंकर जयकिशन असे काॅम्बिनेशन अथवा देव आनंद, किशोरकुमार (अथवा मोहम्मद रफी) आणि सचिन देव बर्मन यांच्या जुन्या गाण्यांवर मैफल रंगे. यांची केवढी तरी हिट गाणी आहेत त्यात राजेश खन्ना, किशोरकुमार आणि राहुल देव बर्मन अशी भर पडली. गाणे ऐकायचे आणि त्यावर भरभरून बोलायचे हा तर जगण्याचा आणि मनसोक्त मनमुराद आनंदाचा एक यशस्वी फंडा होता. त्या काळात गल्ली चित्रपटाची एक मनसोक्त मनमुराद संस्कृती होती आणि त्यातही म्युझिकल हिट अशा पारसमणी, दोस्ती, तिसरी मंझिल, आराधना, कारवा, मै सुंदर हू, दो रास्ते, अशा चित्रपटांना जास्त मागणी असे. म्हणजे पुन्हा एकदा यशस्वी गाणी हा फंडा आलाच.
कालांतराने, हिट चित्रपटात आणखी एक गाणे समाविष्ट करण्याचा ट्रेण्ड सुरु झाला. म्हणजे चित्रपट गर्दीत सुरु असतानाच आणखीन एका गाण्याचे शूटिंग करुन ते चित्रपटात समाविष्ट करायचे. तेजाब, दिल वगैरे चित्रपटाच्या वेळी ते झाले. निर्माता आणि दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या आमंत्रणामुळे मेहबूब स्टुडिओत मी ‘एक दो तीन चार’ या गाण्यासाठी माधुरी दीक्षितने नृत्यात कशी आणि केवढी मेहनत घेतली हे प्रत्यक्षात अनुभवले आणि तेव्हाच हे गाणे भारी लोकप्रिय होणार याची खात्री पटली. तात्पर्य, गाणे पहिल्यांदा ऐकताना ते ‘पब्लिक पसंत’ ठरेल काय याचा अंदाज यायला हवा. अशा पध्दतीचा कान आणि दृष्टी असलेल्या दिग्दर्शकात चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, गुरुदत्त, विजय आनंद, राज खोसला, मनमोहन देसाई असे करत करत मनोजकुमार, सुभाष घई, एन. चंद्रा, आशुतोष गोवारीकर, एन. चंद्रा, संजय लीला भन्साली यांचा खास उल्लेख हवाच. यांच्या चित्रपटातील गाणी ओठावर आली तरी त्याचे पडद्यावरचे सादरीकरण डोळ्यासमोर येतेच, हेदेखील गाण्याचे यश आहे.
नव्वदच्या दशकात उपग्रह वाहिन्यांवर ‘टाॅप टेन’ गाण्याचे शो सुरु झाले आणि पहिला मान सुभाष घई दिग्दर्शित ‘खलनायक’ (१९९३) मधील चोली के पीछे क्या है या धमाकेदार गाण्याला मिळाला. फरक इतकाच की आता एखाद्या चित्रपटाच्या किती ध्वनीफिती अर्थात कॅसेट विकल्या जातात यावर सिल्व्हर डिस्क, गोल्डन डिस्क यांच्या पार्ट्या रंगू लागल्या. एव्हाना, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, बार यात टेपरेकाॅर्ड एस्टॅब्लिज झाला होता आणि पब्लिकप्रिय गाण्याच्या कॅसेट तुफान संपत. तेव्हा कॅसेटच्या दुकानातून ती खरेदी करणारा वर्ग होता तसाच फुटपाथवरही मोठ्या प्रमाणावर कॅसेट विकल्या जात. अनेकदा तरी एखाद्या गाण्याची लोकप्रियता जरा ओसरली की आणखीन एक चित्रपट येई आणि पुन्हा कॅसेट विक्रीला चालना मिळे.
चित्रपट गीताचा हा खूपच मोठा रंजक आणि अनेक वळणावळणाचा प्रवास सुरु आहे. जुनी गाणी आजही लोकप्रिय आहेत आणि त्यामुळे त्या काळातील अनेक चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट आहेत हाही एक महत्वाचा फंडा आहे, तसेच कधी काळी आवडते गाणे पडद्यावर सुरु झाले की पैसे उडवायची एक प्रथा होती तोच प्रवास मग रुप / स्वरुप बदलत बदलत आता यु ट्यूबवर लाईक्स मिळवण्यात आला. पण… पण विक्रमी लाईक्स मिळालेले गाणे आजूबाजूला कुठे ऐकायला येत नाही ते? पूर्वी हिट गाणे कुठून ना कुठून ऐकायला येई, ओठावर राही, गुणगुणावेसे वाटे. तसे मात्र आता होत नाही. तरी गाणे मात्र हिट आहे…. तेच तर महत्वाचे आहे ना?
खरं तर हा विषय एवढा आणि असा मोठा आहे की, माझे हे सांगणे फक्त ट्रेलर ठरावे. मग मेन पिक्चर किती मोठा होईल?