दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
नीना गुप्ता यांना जेव्हा निर्मात्याने विचारलं, “तू रात्री इथे थांबणार नाहीयेस”, तेव्हा….
नीना गुप्ता (Neena Gupta) यांची ओळख अभिनेत्री म्हणून आहेच पण त्याहीपेक्षा जास्त वेस्ट इंडिज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांची गर्लफ्रेंड अशी आहे. साधारणतः ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात या प्रेमकहाणीची चर्चा सर्वत्र चवीनं चघळली जात होती. याला कारणही तसंच होतं. नीना गुप्ता लग्नाआधीच सर विवियन रिचर्ड्स यांच्या मुलाची आई होणार होत्या. आजच्या काळातही एखाद्या अभिनेत्रीने असा निर्णय घेणं ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठरू शकते. त्या काळात तर ही बातमी एखाद्या बॉम्ब सारखी आदळली होती. नीना गुप्ता यांनी १९८९ साली ‘मासाबा’ नावाच्या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतरही नीना यांनी आपली अभिनय कारकीर्द सुरूच ठेवली.
नीना गुप्ता आणि रिचर्ड्स कधी एकत्र येऊ शकले नाहीत कारण एकच रिचर्ड्स आधीपासूनच विवाहित होते. सर्वसामान्य आणि पुराणमतवादी कुटुंबामध्ये वाढलेल्या नीना गुप्ता यांच्यासाठी हा निर्णय घेणं सोपी गोष्ट नव्हती. पण तरीही त्यांनी ‘सिंगल मदर’ व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.
या काळात त्यांना खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीने त्यांना एका ‘गे’ बॅंकरशी विवाह करण्याचा सल्ला दिला होता. या सर्व गोष्टी नीना यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी ‘सच कहू तो’ मध्ये लिहिल्या आहेत. ‘सच कहू तो’ या आत्मचरित्रामध्ये नीना यांनी आपले बरेच बरे वाईट अनुभव, तसंच काही किस्सेही कथन केले आहेत. यापैकीच एक किस्सा आहे तो विवादित ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा. (Sach Kahun Toh by Neena Gupta)
‘चोली के पीछे…’ या गाण्यासाठी सुभाष घई यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या गाण्यामध्ये माधुरी सोबत नीना गुप्ताही आहेत. नीना गुप्तांना या भूमिकेसाठी तयार करणं हे मोठं दिव्य होतं. कारण यामध्ये त्यांना खास अशी कोणतीच भूमिका नव्हती. त्यामुळे त्या आधी तयार नव्हत्या. सुभाष घई यांनी त्यांना हर तऱ्हेने समजावून सांगितलं तरीही त्या तयार होईनात. अखेर सुभाष घई यांनी त्यांना गाणं ऐकवलं.
नीना यांनी जेव्हा हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यांना ते खूपच ‘इंटरेस्टिंग’ वाटलं. तसंच त्यांना जेव्हा कळलं की, हे गाणं अलका याज्ञिक आणि त्यांची मैत्रिण इला अरुण यांनी गायलं आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या भूमिकेचा विचार करायचा ठरवला. पण फिरून फिरून गाडी एकाच गोष्टीवर अडत होती, ती म्हणजे भूमिका. या भूमिकेमध्ये विशेष काहीच नसल्यामुळे त्यांचं मन या भूमिकेसाठी तयार होत नव्हतं. अखेर कसबसं करून सुभाष घई यांनी त्यांना तयार केलंच.
गाण्याच्या दिवशी चित्रीकरणासाठी नीना गुप्ता तयार होऊन ट्रायलसाठी सेटवर पोचल्या. त्यावेळी त्यांना पाहून सुभाष घई अस्वस्थ झाले. नीना गोंधळून गेल्या. त्यांना काहीच कळत नव्हतं नक्की काय चुकलं. तेवढ्यात त्यांच्या कानावर घईंचे शब्द आदळले. ते ‘कॉश्च्युम’ टीमवर ओरडून त्यांना सांगत होते, “नहीं, नहीं, नहीं. कुछ भरो.” घईंच्या बोलण्यामधला मतितार्थ त्यांना लगेच समजला. त्याक्षणी त्यांना प्रचंड लाज वाटली कारण ते चोळी भरण्याबद्दल बोलत होते.
त्या दिवशी गाण्याचं चित्रीकरण होऊ शकलं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला सुभाष घईंसमोर दुसऱ्या गेटअपमध्ये नेण्यात आले. यावेळी ‘कॉश्च्युम’ डिपार्टमेंटने त्यांच्या ड्रेसमध्ये पॅडेड ब्रा जोडली होती. त्यामुळे त्यांचा गेटअप बघून घई यांचे समाधान झाले. (Sach Kahun Toh by Neena Gupta)
असाच एक कास्टिंग दरम्यानचा प्रसंग नीना यांनी यामध्ये लिहिला आहे. तो आहे एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाचा. एका दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यावेळी पृथ्वी थिएटरच्या जवळच्याच एका हॉटेलमध्ये निर्माते राहिले होते. नीना यांचं पृथ्वी थिएटरवरचं काम संपल्यावर आपल्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी त्या निर्मात्यांना भेटायला गेल्या. तिथे गेल्यावर निर्मात्यांनी त्यांना रूममध्ये यायला सांगितलं. या प्रसंगाबद्दल नीना यांनी लिहिलं आहे –
“माझं अंतर्मन मला नको जाऊस असं सांगत होतं. पण तरीही मी गेले कारण मला कामाची गरज होती. खोलीत गेल्यावर मी माझ्या भूमिकेबद्दल विचारलं तेव्हा, ‘नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका आहे’, असं सांगून त्यांनी मला माझी भूमिका समजावून सांगितली. मला ती भूमिका खूपच छोटी वाटली. मी ‘ठीक आहे’ असं म्हणून त्यांना विचारलं, “निघू का मी माझी फ्रेंड माझी वाट बघत असेल.”
=============
हे ही वाचा: आवर्जून पाहाव्यात अशा मराठीमधील ६ रोमँटिक वेबसीरिज
‘या’ प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गाण्यामुळे सुभाष घईंवर दाखल झाली होती कोर्ट केस…
==============
माझ्या बोलण्यावर अवाक होऊन त्यांनी विचारलं, “काय? निघू का म्हणजे? तू रात्री इथे थांबणार नाहीयेस? हे ऐकल्यावर वाटलं कोणीतरी माझ्या डोक्यावर गार बर्फ ठेवला आहे. माझं रक्त गोठून गेलं आहे. निर्मात्याने माझी पर्स अंगावर भिरकावली व म्हणाले, “इथे तुझ्यावर कोणीही कसलीही जबरदस्ती करणार नाहीये. तू जाऊ शकतेस.” हे ऐकून मी लगेचच वेगाने खोलीबाहेर पडले.
अभिनेत्री म्हणून आणि एक स्त्री म्हणूनही नीना यांनी खूप काही सोसलं आहे. सध्या त्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. मासाबा सकट त्यांचा स्वीकार करणारा आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार त्यांना मिळाला आहे. पण आयुष्यातल्या काही कटू -गोड आठवणी कधीही विसरता येत नाहीत, हेच खरं.