राजू श्रीवास्तव: वेळप्रसंगी रिक्षाही चालवली, पण निर्णयावर ठाम राहिले
उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात सरकारी नोकरीत असलेले रमेशचंद्र श्रीवास्तव हे उत्तम कवी होते. कविसंमेलनात त्यांच्या सोबत मुलगा सत्यप्रकाश श्रीवास्तवही असायचा. हा सत्यप्रकाश आपल्या वडिलांची कॉपी करायचा….यातूनच तो मिमिक्री करायला लागला. तो जमाना अमिताभ बच्चन यांचा होता. त्यांच्या ‘दिवार’ चित्रपटानं तर सत्यप्रकाशचं आयुष्यच बदललं. तो जळीस्थळी अमिताभ यांची मिमिक्री करायला लागला. त्यांच्यासारखे बोलायचे…उठायचे…बसायचे…चालायचे…(Raju Srivastav Passes Away)
सत्यप्रकाशच्या या मिमिक्रीचा प्रभाव हळूहळू लोकांवर पडायला लागला. वडिलांचा विरोध होता मात्र सत्यप्रकाशला याच क्षेत्रात आपलं भविष्य दिसू लागलं. मग काय त्यांनी सरळ मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. सत्यप्रकाश मायानगरीत आलाही. जवळपास पाच वर्ष परिस्थितीबरोबर झगडला. प्रसंगी उदरनिर्वाहासाठी रिक्षाही चालवली, पण आपली मिमिक्री सोडली नाही. याच मिमिक्रीतून त्याला ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ सारखा शो मिळाला आणि नवं नावही या तरुणाला मिळालं. नव्या नावानं त्याला यश आणि प्रसिद्धी मिळाली. मग काय गजोधर भैया म्हणत राजू श्रीवास्तव हे नाव सर्वमुखी झाले.
स्टँडअप कॉमेडीचा बादशहा म्हणून त्यांचा गौरव झाला. याच राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 वर्षी निधन झाले. राजू यांची ही अकाली एक्झीट चटका लावणारी आहे. यातून कलाकार आणि त्यांच्या व्यस्त आयुष्यामागची दगदग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मिमिक्री आर्टिस्ट, कॉमेडियन आणि राजकारणी राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यातील हे अनेक पैलू आहेत. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना पक्षाघाताचा झटका आल्यावर राजू श्रीवास्तव यांना रुग्णालगात दाखल करण्यात आले. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव एका साधारण कुटुंबातील. अंगातील कला, मेहनत करण्याची तयारी आणि अपयाशालाही हसत तोंड देण्याची वृत्ती असलेला हा माणूस मरणाच्या दारात तब्बल 42 दिवस झगडत होता.
आयसीयूमध्ये असतांना एकदा अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील डायलॉग त्यांना ऐकवण्यात आले. आश्चर्य म्हणजे तेव्हा राजू यांनी डोळे उघडले आणि बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांची तब्बेत सुधारेल अशी आशा होती. मात्र या स्टॅडअप कॉमेडीच्या बादशहानं वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजू यांचा मृत्यू त्यांच्या चाहत्यांना चटका लावून गेलाय. त्यासोबत अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. (Raju Srivastav Passes Away)
गजोधर भैय्या म्हणून परिचित झालेल्या राजू श्रीवास्तव यांचं मुळ गाव उत्तर प्रदेशमधील कानपूर. 25 डिसेंबर 1963 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव. त्यांचे वडील, रमेशचंद्र श्रीवास्तव बलई काका या नावाने ते प्रसिद्ध होते. लहानपणापासून राजू यांच्यासमोर आदर्श म्हणून त्यांचे वडील होते. मोठं होऊन वडिलांप्रमाणे प्रसिद्ध व्हायचं होतं.
राजूला लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीची खूप आवड होती. शाळेत असताना शिक्षकांची नक्कल करताना त्यांनी अनेकवेळा ओरडाही खाल्ला आहे. मात्र आपण इतरांना हसवू शकतो, हेच समाधान त्यांना मोठं वाटत होतं. हळूहळू राजू वाढदिवसाची पार्टी किंवा विवाह सोहळ्यात मिमिक्री करु लागले. एकदा त्यांनी अमिताभ बच्चन यांची मिमिक्री केली, तेव्हा खूष होऊन एका प्रेक्षकांनी 50 रुपयांचे बक्षिस दिले. या बक्षिसामुळे त्यांना आपल्यातल्या कलेची खरी जाणीव झाली. आपलं आयुष्य या कलेसाठीच आहे, याची जाणीव झाली. 1982 मध्ये नशीब आजमावण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली.
मुंबईत आल्यावर या नवख्या तरुणाला काहीच काम मिळत नव्हतं. रोज फिल्मसिटीच्या चकरा मारण्यात वेळ जात होता. शेवटी रोजचा खर्च भागण्यासाठी राजू रिक्षा चालवू लागले. याच संघर्षात राजू यांना ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा शो मिळाला आणि राजू श्रीवास्तव यांचे नाव सर्वोमुखी झाली.
या गजोधर भैयानं प्रेक्षकांच्या मनात खास जागा केली. राजू श्रीवास्तव या शोचे सेकंड रनर अप झाले. त्यांची इंडस्ट्रीमध्ये ओळख होऊ लागली आणि चित्रपटही मिळू लागले. अनिल कपूरच्या ‘तेजाब’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात ट्रक क्लीनरची भूमिका साकारली. शाहरुख खानसोबत ‘बाजीगर’ या चित्रपटात महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका केली. अत्यंत कष्टाने त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवले. (Raju Srivastav Passes Away)
राजू श्रीवास्तव यांचा प्रेमविवाहही खूप गाजला. त्यांनी यासंदर्भात अनेकवेळा आपल्या शोमध्ये उल्लेख केला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव शिखा आहे. या जोडप्याला अंतरा आणि आयुष्मान ही दोन मुले आहेत. फतेहपूरमध्ये आपल्या भावाच्या लग्नात राजू यांनी शिखाला पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हापासून हिच्याबरोबच लग्न करणार असा निश्चय केला. त्यांनी शिखा यांच्याजवळ प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्नही केला, पण तेव्हा राजू श्रीवास्तव हे वैयक्तिक आयुष्यात झगडत होते. दरम्यान ते मुंबईला आले. मुंबईत यश मिळाल्यावर त्यांनी शिखा यांना मागणी घातली आणि 17 मे 1993 रोजी राजी आणि शिखा यांचे लग्न झाले.
राजू श्रीवास्तव यांनी प्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग बॉस 3’ मध्ये देखील भाग घेतला होता. यानंतर ‘कॉमेडी शो महामुकबाला सीझन 6’ आणि ‘नच बलिए’ सारख्या शोमध्येही ते सहभागी झाले. नच बलियेमध्ये राजू श्रीवास्तव पहिल्यांदा पत्नीसोबत दिसले होते. त्यांनी आपल्या कॉमेडीमधून जिवंत केलेलं गजोधर भैय्या हे पात्र त्यांच्या गावातील, उन्नाव येथील आहे. लहानपणापासून बघितलेल्या या व्यक्तिला राजू श्रीवास्तव यांनी आपल्या कॉमेडीमधून अजरामर केले. (Raju Srivastav Passes Away)
राजू श्रीवास्तव यांनी 2014 मध्ये राजकारणातही एन्ट्री केली होती. 2014 मध्ये त्यांना समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत कानपूरमधून लोकसभेचे तिकीट दिले. मात्र राजू श्रीवास्तव यांनी तिकीट परत केले. त्यानंतर त्यांनी 19 मार्च 2014 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातही त्यांचा सहभाग होता. याशिवाय, राजू श्रीवास्तव अजूनही उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 2019 मध्ये त्यांना ही जबाबदारी मिळाली होती.
=================
हे ही वाचा: जेव्हा एका चुकीमुळे रवीनाला खंडणीसाठी येऊ लागले फोन..
वडील गेल्याच्या दुःखात असतानाही केला विनोदी सीन चित्रित… कुठला होता हा सीन?
=================
अगदी सामान्य कुटुंबातील राजू श्रीवास्तव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश संपादन केले. आज अलिशान गाडी आणि करोडोची संपत्ती मागे ठेऊन राजू आपल्या चाहत्यांपासून दूर गेले आहेत. प्रेक्षकांना हसवणारा हा गजोधर भैया गेल्यावर अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत येऊ लागले आहेत.त्यामधला प्रमुख प्रश्न म्हणजे, कलाकारांचे व्यस्त आयुष्य आणि बिघडलेले वेळापत्रक.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लापासून प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार यांनाही जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला. सेलिब्रिटींची जीवनशैली यासाठी कारणीभूत ठरत आहे. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पार्ट्या, खाण्यापिण्याच्या अनियमीत वेळा आणि सर्वात धोकादायक ठरत आहे ती झोपेची कमतरता. तज्ज्ञांच्या मते झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अतिरेकही ह्दयविकाराची मुख्य कारणे आहेत. एकूण या सर्व चर्चा आता होणार आहेत. मात्र सर्वांना हसवणारा गजोधर भैया मात्र आपल्याला पुन्हा दिसणार नाही, हे अवघड वास्तव राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांना कायम दुःखी करणार आहे.