दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘लंच ब्रेक’च्या तासाभरात देव आनंदने कल्पना कार्तिक सोबत उरकले झटपट लग्न!
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता ज्याचा उल्लेख रसिक कायम ‘आधुनिक ययाती’ म्हणून करत असत; त्या देव आनंद या अभिनेत्याचा हा किस्सा आहे. ‘आधुनिक ययाती’ हा शब्द यासाठी होता की सुरैया ते मीनाक्षी शेषाद्री असा त्याच्या नायिकांचा प्रदीर्घ प्रवास होता. तब्बल पन्नास ते साठ वर्ष देव आनंद मुख्य भूमिकेमध्ये रसिकांसमोर आले.
देव आनंद सुरैया या नायिकेच्या प्रेमात होते. सुरैय्यावर त्यांचं मनापासून प्रेम होतं. परंतु सुरैय्याची आजी या नात्यावर नाखूष होती. ‘विद्या’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एकदा नावेतून सुरैया पाण्यात पडली आणि देव आनंदने तिला वाचवले. तेव्हापासून हे दोघे जवळ आले होते. सुरैयाला देखील देव आनंद खूप आवडायचा, पण आजीच्या विरोधामुळे हे नातं पुढे जाऊ शकलं नाही.
सुरैयाचा अधिकाधिक सहवास मिळावा म्हणून देवआनंद दिग्दर्शकाला चित्रीकरणादरम्यान अधिकाधिक रोमँटिक सीन टाकायला सांगायचा. जेणेकरून तिचा अधिक सहवास आणि स्पर्श त्याला मिळेल. एका प्रसंगात देव आनंद सुरैयाच्या डोळ्याचे चुंबन घेतो असा शॉट होता. देवने या शॉटच्या चित्रीकरण्याच्या दरम्यान मुद्दाम रिटेक वर रिटेक घेतले जेणेकरून सुरैयाचा अधिकाधिक सहवास मिळेल. या दोघांनी शायर, विद्या, दो सितारे, अफसर, नीली,सनम,प्यार कि जीत या चित्रपटांत एकत्र काम केले.
‘तेरे नैनो ने चोरी किया मेरा छोटा सा जिया….’ हे सुरैय्याचे गाणे त्यांच्यातील कहाणी अधोरेखित करणारं होतं. ती त्याला लाडाने ग्रेगरी पेक म्हणायची. पण शेवटी या प्रेम कहाणीचा अंत झाला आणि हे दोघे वेगळे झाले. याच काळात कल्पना कार्तिकचे देव आनंदच्या आयुष्यात आगमन झाले.
कल्पना कार्तिक ही मूळची गुरुदासपूरची. देव आनंदचं कुटुंब देखील गुरूदासपूरचंच. त्यामुळे या दोन घराण्यांचा पूर्वीपासून संबंध होताच. कल्पना कार्तिक ही मूळची मोना सिंग. पंजाबी ख्रिश्चन. चेतन आनंद यांची पत्नी उमा हिची ती दूरची नातेवाईक होती. कॉलेजमध्ये असताना कल्पना कार्तिक मिस सिमला झाली होती. चेतन आनंद यांनीच तिला मुंबईला आणले आणि ‘बाजी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. यानंतर ‘हमसफर’ आणि ‘अंधिया’ या चित्रपटात ती चमकली. पण हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. यानंतरचा नवकेतनचा सिनेमा होता ‘टॅक्सी ड्रायव्हर’. या काळामध्ये देव आनंद आणि कल्पना खूप जवळ आले होते.
एकदा देव याने कल्पनाला विचारले, “तू बाहेरच्या बॅनरच्या चित्रपटात का काम करत नाहीस?” त्यावेळी तिने सांगितले, “क्या तुम मुझे खोना चाहते हो?” तिथून प्रेमाचा अंकुर उमलू लागला. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना एकदा लंच ब्रेक मध्ये हे दोघे बाहेर गेले आणि चक्क लग्न करून पुन्हा सेटवर आले आणि सिनेमाचे चित्रीकरण त्यांनी पुन्हा सुरू केले..
‘झट मंगनी पट ब्याह’ यापेक्षाही झटपट हे लग्न झाले. देवने आपले वैयक्तिक जीवन कधीच सार्वजनिक केले नाही. देव कधीच जुन्या आठवणीत, आपल्याच जुन्या चित्रपटात कधी अडकून पडला नाही. सदैव तो उद्याचा, पुढचा विचार करायचा.
======
हे देखील वाचा : धर्मेंद्र हेमाच्या प्रेमासाठी करत होता वाट्टेल ते….
======
या लग्नानंतर कल्पनाने ‘हाऊस नंबर 44’, (याच सिनेमात लताचे अप्रतिम असे ‘फैली हुई है सपनोकी बाहें’ हे गीत होते, जे लताच्या स्वत:च्या आवडीचे होते!) आणि ‘नौ दो ग्यारह’ या सिनेमात भूमिका केल्या आणि सिनेदुनियेपासून ती दूर झाली. या सिनेमातील अनेक गाणी रसिकांना आजही आठवत असतील. हम है राही प्यार के हम से कुछ न बोलिये, आजा पंछी अकेला है, ढलती जाये चुन्दरीया, कली के रूप में….
देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांनी हा विवाह झटपट जरी केला असला तरी ‘लॉंग लास्टिंग’ राहिला. कधीही त्यांच्या वैवाहिक जीवनातील बातम्या बाहेर आल्या नाहीत. कल्पना कार्तिक कायम मीडियापासून लांब राहिली आणि देव आनंदशी एकनिष्ठ राहिली.
आज कल्पना कार्तिक हयात आहे, मुंबईत आहे. १९ ऑगस्ट १९३१ चा तिचा जन्म. त्या हिशेबाने ती आता ९२ वर्षाची आहे. पण तिच्याबाबत कुठलीच बातमी आजही मीडियामध्ये छापून घेत नाही किंवा तिचे सार्वजनिक जीवनात कुठेही दर्शन घडत नाही.