दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमिताभचा हुकमी हिट पिक्चर…
काही तरी भारी घडावेच लागते, तेव्हाच ‘नवीन गोष्टी’ घडायला लागतात.सलिम जावेदची पटकथा व संवाद असलेला आणि प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ ( १९७३) फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच पब्लिकने असा काही डोक्यावर आणि डोक्यात फिट्ट करुन घेतला की ‘सूडनायक’ अशा प्रतिमेतील अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) नावाचे वादळ निर्माण झाले. आणि हा सत्तरच्या दशकात राजेश खन्नाने झपाटून टाकलेल्या सर्व वयोगटातील माझ्यासारख्या चित्रपट रसिकांना धक्काच होता. बरं, आपल्याकडील चित्रपट रसिक संस्कृतीचे सर्वकालीन सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जो पिक्चर भारी गर्दीत चालतोय तो आपणही पाहायलाच हवा… भले मग ‘पब्लिकला या पिक्चरमध्ये इतके काय आवडले? मला तर तो अजिबात आवडला नाही’ अशी चर्चा चित्रपट बघून आल्यावर केली तरीसुद्धा असे ‘शोले'( १९७५)च्याही अगदी पूर्वीपासून ते अगदी ‘काश्मिर फाईल ‘ ( २०२२) नंतरही सुरू आहे आणि सुरुच राहणार आहे.(Hit Movie Of Amitabh)
‘जंजीर’ची आमच्या गल्लीतील चाळीतील चर्चा ऐकून, रसरंग, मनोहर, मार्मिक, प्रभंजन अशा साप्ताहिकातील त्यावरचे लेख वाचून इंपिरियल थिएटरमध्ये मित्रांसोबत ‘जंजीर ‘ पाह्यला गेलो. इंपिरियल थिएटरमध्ये असा पहिल्यांदाच गेलो आणि अमिताभ अंगात भिनत बाहेर पडलो.. आता अमिताभ पर्व सुरु झाले होते, त्याचे एकेक नवीन चित्रपट प्रदर्शित होत होते. (Hit Movie Of Amitabh) हळूहळू लक्षात आले, अमिताभच्या पिक्चरनुसार त्याच्या मेन थिएटरचा फंडा आहे. तो काळ पिक्चरच्या स्वरुपानुसार दक्षिण मुंबईतील अशाच एकाद्या थिएटरमध्ये तो रिलीज करण्याचा होता. तो एक व्यावसायिक धोरणात्मक निर्णय असे. पिक्चर हिट तर तेथेच पंचवीस, पन्नास आठवड्यांचा मुक्काम हुकमी. दुर्दैवाने फ्लाॅप झालाच तर किमान तीन आठवडय़ांची खात्री.
अमिताभचे तेव्हाचे पिक्चर्स, त्याची मेन थिएटर आणि यशापयश यांची कुंडली खूप रंजक आहे.. त्याच्या यशात या थिएटर संस्कृतीचाही वाटा आहे. अर्थात, त्याचा एखाद दुसरा पिक्चर फ्लाॅपही होई. त्यावर म्हटले जाई, मिथुन चक्रवर्तीच्या हिट पिक्चरपेक्षाही अमिताभचा फ्लाॅप पिक्चर ‘पडूनही ‘ भारी असतो.(Hit Movie Of Amitabh)
थिएटर आणि अमिताभचे पिक्चर हे नाते असे,इंपिरियल….जंजीर, बेनाम, हेरा फेरी, अंधा कानून, गिरफ्तार ( यातील ‘बेनाम ‘ शंभर दिवसाचे यश… उर्वरित चित्रपट ज्युबिली हिट). बेशरम ( काठावर पास) गंमत म्हणजे, गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाला रसिकांनी नाकारल्याने तो मेन थिएटर मेट्रोमधून चारच आठवडय़ांत इंपिरियलला शिफ्ट केला आणि हे थिएटर या पिक्चरला एकदम सही असल्याने व्यावसायिक घसरणीचा वेग मंदावला.
अलंकार थिएटर…. बाॅम्बे टू गोवा, खून पसिना, आज का अर्जुन ( प्रत्येकी पंचवीस आठवडे), मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल, कुली ( प्रत्येकी पन्नास आठवडे), बन्सी बिरजू ( अमिताभचे सुरुवातीच्या अनेक फ्लाॅपपैकी एक).
गंगा थिएटर…. गंगा की सौगंध, दोस्ताना, डाॅन, मिस्टर नटवरलाल, कालिया, खुद्दार . ( प्रत्येक चित्रपट पंचवीस आठवडे)
आजच्या पिढीला यातील फंडा कदाचित लक्षात येणार नाही. या चित्रपटांचे स्वरुप पाहता ही मेन थिएटर एकदम फिट्ट होती. आम्हा रसिकांनाही याच थिएटर्समध्ये अमिताभचा पिक्चर पाह्यचा याची जणू सवय झाली होती आणि यातील एकादे मेन थिएटर म्हणजे अमिताभचा पिक्चर हुकमी हिट असेही वाटे.
या आणि आसपासच्याच थिएटर्समध्ये असणारा अमिताभचा मुक्काम मराठा मंदिर, मेट्रो अशा अधिक पाॅश व प्रतिष्ठित थिएटरमध्ये कधी होता? मराठा मंदिरला फरार व जादुगर अपयशी ठरले. ‘जादुगर ‘ने तर त्या काळातील अमिताभच्या तोपर्यंतच्या सर्व फ्लाॅप पिक्चर्सचे जणू सगळेच रेकाॅर्ड मोडले. प्रदर्शनाच्या अगोदरपासूनच विरोधाच्या वादळात सापडलेल्या ‘शहेनशाह’साठी मराठा मंदिर थिएटरबाहेर पोलिसांची व्हॅन ठेवावी लागली. पहिले तीन आठवडे पिक्चरला हे संरक्षण होते. ‘अग्निपथ ‘ आणि ‘खुदा गवाह ‘ यांचे मेन थिएटर मराठा मंदिर होते, पण आता अमिताभ पाश्चात्य स्टाईलचा दिग्दर्शक मुकुल आनंदच्या चित्रपटापर्यंत आला होता.(Hit Movie Of Amitabh) ‘बेनाम ‘ इंपिरियलबरोबरच मेट्रोत प्रदर्शित होतानाच तो फक्त दोन आठवड्यांसाठी आहे, असे जाहिरातीत म्हटले होते. अमिताभची लोकप्रियता कॅश करण्याची ही खेळी होती…. ‘कभी कभी’ मेट्रोलाच हिट. तो एकट्या अमिताभचा नाही , तो मल्टी स्टार कास्ट. ‘राम बलराम’ मेट्रोसह गंगालीही होता, पण काही पिक्चर निर्मितीवस्थेत असतानाच त्यांच्या आगमनाबाबत उत्सुकता ओसरते तसाच हा एक. त्यानंतर ‘गंगा जमुना सरस्वती ‘ मेट्रो कल्चरचा नसूनही तेथे रिलीज केला आणि अमिताभचे करियर बॅकफूटवर गेलेय असे पहिल्यांदाच जाणवले. ‘हम ‘ मेट्रोत झळकला. अर्थात मुकुल आनंद दिग्दर्शित हा चित्रपट आहे . याच काळात अमिताभने काही वर्षे नवीन चित्रपट स्वीकारला नाही. त्यानंतरचे ‘मेजरसाब ‘, ‘आंखे’ या मेट्रोलाच आले तरी एव्हाना रसिकांची पुढची पिढी आली होती. इंपिरियल, अलंकारचा स्टाॅल, अप्पर स्टाॅलचा टाळ्या शिट्ट्या, हंसे यांनी उसळून दाद देणारा पब्लिक आणि मराठा मंदिर, मेट्रो, लिबर्टीचा इस्त्रीच्या कपड्यांना महत्त्व देत, तुलनेत थोडे महागडे तिकीट काढणारा रसिक यांच्यात फरक होता. अमिताभला घडवले ते भाबड्या, स्वप्नाळू, आशावादी, आदर्शवादी अशा मास अपिलने! कष्टकरी, कामगार वर्गाने! हाच वर्ग इंपिरियल, अलंकार, गंगा थिएटरचा मोठा आश्रयदाता होता. गंगाचे जुळे थिएटर जमुनामध्ये ‘सुहाग’ ज्युबिली हिट. ‘नास्तिक ‘ मात्र फ्लाॅप ठरला. तो कुठेही रिलीज केला असता तरी तेच झाले असते.
अमिताभची त्या काळातील पिक्चरमधील भाषा ( विशेषत: मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा यांच्या पिक्चरमधील) इंपिरियल, अलंकार येथील पब्लिकला आपलीशी वाटत होती. त्याचे हे चित्रपट रिगल, इराॅस, स्ट्रॅन्ड, स्टर्लिग येथे अजिबात सूट झाली नसती, पचली नसती. मोठ्या शहरातील अमिताभचे पिक्चर रिलीज होण्याची खेळी अशीच असल्याचे दिसून येईल. पिक्चरच्या स्वरुपाप्रमाणे त्याचे मेन थिएटर हे काॅम्बिनेशन त्या काळात पक्के होते. क्वचित ते फसेदेखिल. अहो, इतकेच नव्हे तर अमूकच मेन थिएटर हवे यासाठी काही आठवडे, कधी महिनेही वितरक थांबत. त्या काळात टप्प्याटप्प्याने पिक्चर रिलीज होत त्यामुळे थांबणे शक्यही असे. उत्तर भारतात रिलीज झालेला एकादा चित्रपट काही महिन्यांनी मुंबईत अथवा उलटही घडायचे.
========
हे देखील वाचा : ‘या’ सिनेमासाठी प्रियांका चोप्राला कसे काय मिळाले सहापट अधिक पैसे?
========
गिरगावात लहानपणापासून थिएटर संस्कृती अनुभवली आणि मिडियात आल्यावर अनेक लहान लहान गोष्टींची उत्तरे मिळवली. टाॅकीजची गोष्ट ही अशी वेगळीही असू शकते. अमिताभने चित्रपट ते मुव्हीज ( आजच्या डिजिटल युगातील पिढीचा शब्द) असा प्रवास करताना त्याचे चित्रपट सेन्ट्रल थिएटर ( परवरीश), शालिमार ( याराना, द ग्रेट गॅम्बलर) यापासून आयनॉक्स, फन, पीव्हीआर वगैरे मल्टीप्लेक्स असा बराच मोठा प्रवास केलाय. त्यात काही थिएटरची त्याला हुकमी साथ होतीच. त्यात एक प्रेक्षक मी देखिल….
प्रेक्षकांनी घडवलेला अमिताभ व्हाया सिंगल स्क्रीन थिएटर्स हा या सगळ्यात अभ्यासाचा एक वेगळा विषय नक्कीच आहे. दुर्दैवाने आज इंपिरियल, गंगा , अलंकार अशी अनेक थिएटर्स काळाच्या पडद्याआड गेली आहेत. इंपिरियल तर शंभरपेक्षा जास्त वर्षे जगलेले थिएटर. अशी अनेक थिएटर्स बंद होत चाललीत तरी त्यांच्या पडद्यावरचा पिक्चर अजूनही संपलेला नाही. आणि संपणारही नाही.