‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; सनबर्न एरेना,
अमिताभ बच्चन राखीला ‘दिदी’ म्हणून का संबोधत होता?
हिंदी सिनेमाच्या इतिहासातील पाने आपण जेव्हा पुन्हा एकदा चाळू लागतो; जुनी मासिके जुने अंक, जुने वर्तमानपत्र आपण ज्यावेळेला पुन्हा एकदा वाचू लागतो त्यावेळेला काही गंमतीदार प्रसंग वाचून आज हसू येते. अशीच एक बातमी १९७५ सालच्या एका सिने मॅगझीनमध्ये आली होती. ती बातमी अशी होती. ‘अमिताभ बच्चन यांचा राखी सोबत नायक बनण्यास नकार!’ सर्वांना ही बातमी वाचून खूप आश्चर्य वाटले. या निर्णयाचे कारण अमिताभनेच दिले होते. ते त्याच्या दृष्टीने जास्त ‘मिनिंग फुल’ होते. त्यात अमिताभने सांगितले होते ,”मी राखीला दिदी म्हणतो. मग या दिदी सोबत मी नायक म्हणून कसं काय भूमिका करू शकतो? तिच्या सोबत रोमांस कसा काय करू शकतो?” (Amitabh Bachchan Story)
नेमका काय होता हा किस्सा?
राखीचा पहिला हिंदी सिनेमा १९७० साली राजश्री प्रॉडक्शनच्या ‘जीवन मृत्यू’ हा होता. या चित्रपटात तिचा नायक धर्मेंद्र होता. त्यापूर्वी १९६७ साली ‘बोधू बोरन’ या एका बंगाली सिनेमातून तिने आपला सिने प्रवास सुरू केला होता. १९७१ साली राखीने ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते सुनील दत्त होते. याच सिनेमात अमिताभ बच्चन यांची देखील एक छोटी भूमिका होती. या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान राखी आणि अमिताभ यांची ओळख झाली. अमिताभच्या उंचीवरून राखी त्याची चांगलीच खेचत असे. यातूनच दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. राखी त्या अर्थाने अमिताभला सीनियर होती. त्यामुळे अमिताभ तिला ‘दिदी’ या नावाने सेटवर संबोधत असे. (अमिताभ हा पहिल्यापासून च सुसंस्कृत वर्तनाचा कलावंत म्हणून सिने क्षेत्रात मशहूर होता.) चित्रपट पूर्ण झाला. अमिताभ आणि राखी यांची मैत्री वाढत गेली.दोघे एकमेकांसोबत आपल्या भावना शेअर करीत असत. (Amitabh Bachchan Story)
१९७३ सालच्या ‘जंजीर’ नंतर अमिताभ सुपरस्टार बनला.याच वर्षी आलेल्या ‘दाग’,’ ब्लॅक मेल’ या सिनेमातून राखी देखील सक्षम अभिनेत्री म्हणून रसिकांच्या समोर आली होती. १९७५ साली दिग्दर्शक यश चोप्रा अमिताभ बच्चन आणि राखी यांना घेऊन ‘कभी कभी’ या चित्रपटाची निर्मिती करणार होते. या चित्रपटात शशी कपूर आणि वहिदा रहमान तसेच ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या देखील भूमिका होत्या. ज्या वेळी यश चोप्रा यांनी अमिताभच्या सोबत राखीला कास्ट करण्याचे ठरवले त्यावेळेला अमिताभने त्याला स्पष्ट नकार दिला आणि त्याने सांगितले “जिला मी कायम दीदी म्हणून बोलावतो तिच्यासोबत मी रोमांस कसा काय करू शकतो?” यश चोप्रा यावर हसले. ते म्हणाले,” राखी सोबत तुझी चांगली मैत्री आहे. तिच्यासोबत तुला काम करायला काय अडचण आहे? दीदी हे तिला तू आदराने म्हणतोस.” नंतर राखीला जेव्हा हा प्रसंग कळाला, त्यावेळेला तिने अमिताभला फोन करून सांगितले,” आपण दोघेही प्रोफेशनल कलाकार आहोत. आपले रिल लाईफ आणि रियल लाईफ हे वेगवेगळे असते. रियल लाईफ मध्ये भले तू मला दीदी म्हणतोस. मला त्याचा आदरच आहे. पण एक कलाकार म्हणून याकडे पाहायला पाहिजे. त्यामुळे आपण एकत्र काम करणे अजिबात गैर नाही.”(Amitabh Bachchan Story)
=======
हे देखील वाचा : पिक्चर हिट है तो दिवाली है!
=======
राखीच्या या अधिकार वाणीच्या समजावणीने अमिताभ चित्रपटात काम करायला तयार झाले. ‘कभी कभी’ या चित्रपटाला माफक यश मिळाले. पण अमिताभ आणि राखी यांची जोडी मात्र पुढे चांगली जमली. कसमे वादे, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, जुर्माना, काला पत्थर, लावारीस बरसात की एक रात, बेमिसाल या चित्रपटातून हे दोघे प्रेक्षकांच्या समोर आले आणि हिट पेयर म्हणून ते लोकप्रिय झाले. (Amitabh Bachchan Story)
१९८० साली ज्या वेळी रमेश सिप्पी ‘शान’ या चित्रपटाची निर्मिती करत होते, त्या चित्रपटात राखी अमिताभच्या मोठ्या भावाची बायको म्हणजे वहिनीच्या भूमिकेत होती. प्रेक्षकांनी त्यांचे हे नाते इथे एक्सेप्ट केले होते. यानंतरचा रमेश सिप्पी यांचा चित्रपट होता ‘शक्ती’ या चित्रपटात तर राखी अमिताभची चक्क आई बनली होती!
धनंजय कुलकर्णी