… या घटनेनंतर शर्मिला टागोर कमालीची ‘डिसिप्लिन मॅच्युअर्ड’ बनली!
लहानपणी आयुष्यात घडलेल्या काही घटना त्या व्यक्तीला कायमचा धडा शिकवून जातात. अभिनेत्री शर्मिला टागोर हिला देखील लहानपणी अशा एका घटनेला सामोरे जावं लागलं ज्यातून तिने एक चांगला धडा घेतला.या घटना कधी कधी आयुष्याला चांगले वळण लावतात. शर्मिलाच्या आयुष्याला एक चांगली स्वयंशिस्त या घटनेमुळे लागून गेली. एक ‘डिसिप्लिन मॅच्युअर्ड’ असं आयुष्य ती जगायला शिकली. काय होती ती घटना? असं काय घडलं होतं तिच्या आयुष्यामध्ये, ज्यामुळे तिच्यात एवढा बदल घडून आला? त्याचाच हा किस्सा आहे.
शर्मिला टागोर(Sharmila Tagore) त्यावेळेला बारा वर्षाची शाळकरी मुलगी होती. तिची आई लतिका टागोर ही रवींद्रनाथ टागोर यांच्या भावाची नात होती. त्याअर्थाने गुरुदेव रवींद्रनाथ टागोर शर्मिला टागोरचे हे पणजोबा होते. शर्मिलाच्या आईला आपल्या आजोबांविषयी नितांत आदर होता. त्यांच्या कलाकृती विषयी, त्यांच्या कवितांविषयी, त्यांच्या चित्रांविषयी, त्यांच्या कादंबऱ्यांविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. एक मोठा समृद्ध वारसा आपल्या सोबत आहे आणि आपण त्याचे वारसदार आहोत याची जाणीव त्यांना होती. हा वारसा जबाबदारीने सांभाळला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा सर्व खजिना त्यांनी मोठ्या प्राणा पलीकडे आपल्याकडे जपून ठेवला होता. त्यांच्या संग्रहात एकच पुस्तक (‘गोरा’ नावाचे) असे होते ज्यावर स्वतः गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सही केलेली होती. त्यामुळे हे पुस्तक त्यांच्यासाठी अतिशय अमूल्य असे होते. एक दिवस हा साहित्यिक खजिना ते आपल्या मुलीला शर्मिलाला दाखवत होत्या. बारा वर्षाची मुलगी असलेल्या शर्मिलाला (Sharmila Tagore)त्यावेळी कितपत कळत होतं माहिती नाही पण आपले पणजोबा मोठे व्यक्तिमत्व होते याची तिला जाणीव झाली. बाल सुलभ सवयीनुसार शर्मिलाने आपल्या आईला विनंती केली की ,”गुरुदेव टागोरांची सही असलेले त्यांचे पुस्तक उद्या मी माझ्या शाळेत घेऊन जाऊ का?” शर्मिलाची आई तात्काळ म्हणाली,” अजिबात नाही!” शर्मिला नाराज झाली. तेंव्हा पुन्हा आईने विचारले,” का घेऊन जायचे पुस्तक तुला?” त्यावर शर्मिला म्हणाली,” मी नेहमी माझ्या शिक्षकांना आणि मैत्रिणींना सांगते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे माझे पणजोबा आहेत. त्यांची अनेक पुस्तके माझ्याकडे आहे. पण कोणीच विश्वास ठेवत नाही. उद्या त्यांना दाखवून देते की माझ्याकडे किती मोठा संग्रह आहे!” क्षणभर शर्मिलाच्या आईला आपल्या लेकीचे ते बोल ऐकून कौतुक वाटले आणि आईने सांगितले,” पुस्तक घेऊन जा. पण अतिशय काळजीपूर्वक पुस्तकाचा सांभाळ कर. कारण या पुस्तकाची सही असलेली एकच प्रत आपल्याकडे शिल्लक आहे आणि काहीही खराब न करता हे पुस्तक संध्याकाळी परत घेऊन ये!” शर्मिला(Sharmila Tagore) आनंदाने झोपायला गेली जाताना तिने आपल्या बॅगमध्ये ते पुस्तक टाकले.
दुसऱ्या दिवशी जेव्हा शर्मिला शाळेत गेली त्यावेळी ज्याला त्याला ते पुस्तक ती दाखवत गेली. प्रत्येकाला ते पुस्तक पाहून खूपच आश्चर्य आणि आनंद वाटत होता. विद्यार्थ्यांचे ठीक आहे, पण त्या शर्मिलाच्या शिक्षकांना देखील या पुस्तकाचे खूप अप्रूप होते. प्रत्येकजण ते पुस्तक आवर्जून पाहत होता. रवींद्रनाथ टागोर यांची सही पाहत होता. त्या दिवशी शर्मिला शाळेमध्ये प्रचंड पॉप्युलर झाली. शाळेच्या प्रिन्सिपल ने देखील ते पुस्तक आवर्जून मागवून पाहून घेतले. त्या दिवशी शर्मिलाला सगळ्या मैत्रिणींवर मस्तपैकी शान मारता आली. त्या आनंदात ती घरी आली. पण हाय रे दैवा! आपली स्कूल बॅग ज्या वेळेला तिने उघडून पाहिली त्यामध्ये ते पुस्तक नव्हते. दिवसभर इतक्या लोकांनी ते पुस्तक पाहिले होते त्यामुळे नेमकं कुणाजवळ राहिले हे कळत नव्हते. शर्मिला(Sharmila Tagore) रडायला लागली. आईला तिने सगळी हकीकत सांगितली. आई प्रचंड नाराज झाली. चिडली. संतापली. रागावून ती शर्मिलाला म्हणाली,” मी तुला कालच सांगत होते हे अतिशय दुर्मिळ पुस्तक आहे. याची एकच प्रत आपल्याकडे शिल्लक आहे; ज्यावर गुरुदेव टागोरांची सही आहे. आणि असा मौलिक ठेवा तू एका दिवसात हरवून आलीस! काही शिस्त आहे की नाही? तुला काही गांभीर्य आहे की नाही?” शर्मिला आईचे बोल ऐकून घेत होती. आतल्या आत तिला देखील खूप दुःख झाले होते. पण नाईलाज होता. दुसऱ्या दिवशी तिने शाळेत सर्वांना विचारले. शिक्षकांना विचारले. पण कुणी देखील त्याबद्दल काहीही बोलले नाही. कुणीतरी ते पुस्तक चक्क ढापले होते. शर्मिलाचा भोळसटपणा केअर फ्री नेचर तिच्या अंगाशी आले होते. या प्रकारानंतर शर्मिलाची आई तिच्यावर इतकी नाराज झाली की पुढचे काही दिवस तिने अक्षरश: एक शब्द देखील तिच्याशी संवाद साधला नाही.
=====
हे देखील वाचा : ‘डर’ सिनेमातून आमिर खानचा पत्ता कसा काय कट झाला?
=====
शर्मिला (Sharmila Tagore) देखील मनातून खूप नाराज झाली. आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. याची तिला जाणीव झाली आणि यातून ती एक शिकली ‘आयुष्यात पुढे कधीही बेशिस्तेने वागायचे नाही, कुणावरही तात्काळ विश्वास ठेवायचा नाही आणि आपल्या वस्तू आपली माणसं प्राणापलीकडे जपून ठेवायच्या!’ शर्मिलाने हे तत्व आयुष्यभर पाळले आणि तिच्या आयुष्याला नकळतपणे एक डिसिप्लिन आले. पुढचा तिचा प्रवास हा एक सक्षम अभिनेत्रीचा तर होताच शिवाय ती एका राज घराण्याची सून देखील होती. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तिने मोठ्या कौशल्याने पार पडल्या.शर्मिलाने स्वत: एकदा विविध भारतीवर हि आठवण सांगितली होती.
आज देखील शर्मिला या वयात देखील स्वतःला मेंटेन ठेवणारी कलाकार आहे.लहानपणची एक छोटीशी गोष्ट शर्मिलाला आयुष्यात कमालीची मॅच्युअर्ड करून गेली!
धनंजय कुलकर्णी