दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेंव्हा वहिदा रहमानने केलेला एक ‘मजाक’ तिच्यावरच ‘बूमरॅंग’ सारखा उलटला!
कधी कधी गमतीने केलेली एखादी गोष्ट (आजच्या तरुणाईच्या भाषेत Prank) ‘बूमरॅंग’ होऊन प्रत्यक्षात स्वतःवरच उलटू शकते, याचा अनुभव अभिनेत्री वहिदा रहमान(Waheeda Rehman) हिने घेतला होता. तिने तिच्या आत्मकथनामध्ये हा मजेदार किस्सा सांगितला होता.त्या वेळी वहिदा रहमान गुरुदत्त यांच्या ‘कागज के फूल’ या चित्रपटात भूमिका करत होती. ‘कागज के फूल’ हा भारतातील पहिला कृष्ण धवल रंगातला ‘सिनेमास्कोप’ चित्रपट होता. गुरुदत्त यांचा अतिशय महत्त्वकांक्षी असा हा चित्रपट. गुरुने आपल्या प्रतिभेचा कस लावून या चित्रपटाची निर्मिती केली होती. दुर्दैवाने प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि गुरुदत्त यांनी या अपयशाचा इतका धसका घेतला की त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करणेच सोडून दिले! या चित्रपटानंतर पाच वर्षांनी १९६४ साली गुरुदत्त यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी ‘कागज के फूल’ या चित्रपटाचे अपयश हे देखील एक कारण होतं. अर्थात त्यावेळी जरी हा चित्रपट अयशस्वी झाला असला तरी ‘कल्ट क्लासिक’ म्हणून आजही या चित्रपटाकडे पाहिले जाते. देश-विदेशातील चित्रपट महोत्सवात या ‘कागज के फूल’ ची हमखास हजेरी असते. जागतिक विद्यापीठांच्या अनेक अभ्यासक्रमात या चित्रपटाची वर्णी लागते.
या ‘कागज के फूल’ चित्रपटाच्या दरम्यानचा हा किस्सा आहे. चित्रपट जरी गंभीर असला तरी हा किस्सा मात्र काहीसा विनोदी आहे. इसाप नीती मध्ये एक गोष्ट आहे ‘लांडगा आला रे आला..’ अगदी तसाच काहीसा प्रत्यय या किस्स्यामधून वहिदा ला आला होता. काय होता हा किस्सा? ‘कागज के फूल’ या चित्रपटांमध्ये एक शॉट होता ज्यामध्ये गुरुदत्त आणि वहिदा रहमान कारमधून जात असताना त्यांच्या कारचा अपघात होतो आणि वहिदा रहमान जखमी होते. या शॉटचे चित्रीकरण चालू असताना वहिदाने जखमी असल्याचा मेकअप केला होता. कपाळाला पट्टी बांधलेली त्यातून खोटे खोटे रक्त ओघळत आहे, हाताला प्लास्टर, शरीराला मुका मार लागलेला आहे , कपडे फाटलेले आहेत अशा अवतारात ती सेटवर वावरत होती. शॉट ओके झाला. सर्व कलाकार आपापल्या रूम कडे निघून गेले. वहिदाने विचार केला ‘जर आपण अशाच अवतारात घरी गेलो तर घरच्यांची ‘मज्जा’ घेऊ! ते कसले घाबरतील! त्यांना वाटेल वहिदाचा(Waheeda Rehman) अपघात झाला‘ गमंत म्हणून घरच्यांना फसवण्यासाठी वहीदाने हा अपघाताचा मेकअप उतरवलाच नाही. त्याच अवतारात ती कार मध्ये जाऊन बसली. ड्रायव्हरने देखील तिला विचारले पण तिने त्याला नजरने गप्प राहायला सांगितले.
तशा अवतारातच वहिदा (Waheeda Rehman) आपल्या घरी पोहोचली. तिला बघितल्यानंतर तिच्या घरचे प्रचंड घाबरले. वहिदा देखील लंगडत चालण्याचे नाटक करत रडत म्हणाली ,” माझ्या गाडीचा अपघात झाला. मला खूप लागले आहे. डोके भयंकर दुखते आहे. हाताला प्रचंड वेदना होत आहे!” घरच्यांचा आधार घेत ती आपल्या रूममध्ये गेली. घरातल्या सर्वांच्या तोंडचे पाणी पाळले. लगबगीने ते डॉक्टरला फोन करू लागले. कोणी तिच्यासाठी ज्यूस बनवून आणून दिला. कोणी तिचे पाय चेपून देऊ लागले. सगळेजण हा अपघात कसा झाला काय झाला असे विचारू लागले. घरच्यांची ही लगबग पाहिल्यानंतर वहिदा ला हसू फुटले आणि तिने आपल्या बेडवर टूणकन उडी मारून ,”मला काहीच झाले नाही! मी नाटक करत होते!! तुमची ‘मज्जा मज्जा’ घेत होते!” असे सांगितले. घरच्यांनी सुटकेचा विश्वास टाकला. पण तिच्या आई-वडिलांनी तिला “आम्हाला तू किती घाबरलंस.” असं म्हणत तिला दटावले. त्यानंतर वहीदाने तो सगळा अवतार बाथरूम मध्ये जाऊन धुवून टाकला आणि पुन्हा आपल्या रूममध्ये येऊन मस्त गरम कॉफीचे घुटके घेत बसली!
======
हे देखील वाचा : काजोलच्या लेकीची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री?
======
पण कधी कधी नियती सुद्धा विचित्र खेळ खेळते. वास्तू तथास्तू म्हणत असते. वहीदाच्या बाबतीत तसेच झाले. त्याच आठवड्यामध्ये वहिदाच्या कारचा खरोखरच अपघात झाला. तिची कार एका झाडाला जाऊन धडकली. वहिदाचे(Waheeda Rehman) डोके समोर आदळले. तिच्या डोक्याला खोक पडली. हाताला जबरदस्त मार लागला. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले आणि डोक्याला मलमपट्टी हाताला प्लास्टर करून ती पुन्हा घरी गेली. आज तिचा खरोखरच अपघात झाला होता. पण आता घरचे लोक त्यावर विश्वास ठेवत नव्हते!! सगळेजण तिच्याकडे पाहून हसत होते. आणि तिची खेचत होते हो कां? नक्की अपघात झाला का? खरंच झाला का? असे म्हणून सर्व जण तिला चिडवत होते. वहिदा मात्र जीव तोडून सांगत होती,”आज खरोखरच माझ्या कारचा एक्सीडेंट झाला वाटल्यास तुम्ही ड्रायव्हरला विचारा!” पण कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. शेवटी वहीदाने डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन कीट काढून दाखवले ज्यावर औषध उपचार गोळ्या लिहून दिल्या होत्या, आणि त्यावर तारीख आजचीच होती! तेव्हा कुठे घरच्यांचा विश्वास बसला आणि सगळेजण शांत झाले. त्यानंतर मात्र वहिदाने ठरवले अशाप्रकारे कधीही कुणाला कधी खोटं सांगून फसवायचे नाही कारण हे ‘बूमरॅंग’ कधी कधी आपल्यावरच उलटून येऊ शकते!
धनंजय कुलकर्णी