‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
“बेटे आज तुने मुझे हरा दिया!” असं किशोर कुमार अमित कुमारला का म्हणाले?
‘बापाची चप्पल जेव्हा पोराच्या पायात फिट बसू लागते त्यावेळी बाप बाप राहत नाही तर तो पोराचा मित्र बनतो’ अशी आपल्याकडे एक समजूत आहे. पण बाप आणि मुलगा एकाच क्षेत्रात कार्यरत असतील तर नकळत त्यांच्यामध्ये एक सुप्त असा संघर्ष असतो किंबहुना मुलाला दुहेरी संघर्षाला सामोरे जावे लागते. एक तर त्याला स्वतःला त्याची कर्तृत्व सिद्ध करावी लागतात शिवाय ते वडिलांच्या कर्तृत्वासोबत तोलले जाते. किमान ते मिळते जुळते तरी असावे असा आग्रह असतो. अर्थात स्वतःला कुणाच्या तरी तुलनेत सिद्ध करणे वेगळे आणि आपल्याच पित्यासोबत करणे महाकठीण असते. हे सर्वच क्षेत्रांमध्ये घडत असते. क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी सुनील गावस्कर यांच्या मुलाला म्हणजेच रोहन गावस्करला अशाच मोठ्या संघर्षातून पुढे जावे लागते.अभिषेक बच्चन,अमितकुमार,रणधीर कपूर,कुमार गौरव हे सर्व जण याच व्यवस्थेचे बळी आहेत.
सिनेमाच्या दुनियेत बाप लेकाच्या बऱ्याच जोड्या आपल्याला दिसतात. गायक किशोर कुमार आणि त्यांचा मुलगा अमित कुमार(Amit Kumar) हे साधारणपणे दहा ते बारा वर्ष एकाच क्षेत्रात कार्यरत होता. अमित कुमार १९७५ पासून हिंदी सिनेमात गायला लागला. १९७६ साली आलेल्या ‘बालिका बधू ‘ या चित्रपटातील ‘बडे अच्छे लगते है…’ या गाण्याने त्याने सर्वांचे लक्ष घेतले. आर डी बर्मन यांच्याकडे अमित कुमार भरपूर गायला. त्याच्या स्वराला खरं तर स्वतंत्र आयडेंटिटी नक्की होती वारंवार त्याने ते सिद्ध करूनही दाखवले होते पण रसिकांनी त्याच्या स्वराला कायम किशोरच्या स्वराशी को रीलेट केले. ऐंशीच्या दशकात अमित कुमार(Amit Kumar) भरपूर गायला. कुमार गौरवचा पडद्यावरील आवाज ही त्याची ओळख झाली होती.अमित कुमारच्या लोकप्रिय गाण्यांची यादी करायची तर चिक्कार मोठी होईल. ये जमी गा रही है आसमा गा रहा है (तेरी कसम) आती रहेगी बहारे (कसमे वादे) ना बोले तुम ना मैंने कुछ कहा (बातो बातो मे) देखो मैने देखा है एक सपना (लव स्टोरी) रोज रोज आँखो तले एकही सपना (जीवा) तू रूठा तो मै रो दूंगी सनम (जवानी)मांग लुंगा मै तुझे तकदीर से (रोमान्स) उठे सबके कदम (बातो बातो में)दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है (आखिर क्यू?)
१९८१ साल त्याच्यासाठी खूप लकी ठरले. कारण यावर्षी कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचा ‘लव स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातील नायकावर चित्रित असलेली सर्व गाणी अमित कुमारने गायली होती. चित्रपटाला संगीत राहुल बर्मन यांचे होते. देखो मैने देखा है एक सपना, याद आ रही है, कैसा तेरा प्यार कैसा गुस्सा है तेरा ही त्याची गाणी त्या काळात प्रचंड गाजली. १९८२ साली ज्यावेळी फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकन जाहीर झाले, त्यावेळी गायकांच्या नामांकनात एस पी बालसुब्रमण्यम यांना ‘एक दुजे के लिए’ चित्रपटातील ‘तेरे मेरे बीच मे कैसा है ये बंधन अंजना’ या गाण्यासाठी, जगजीत सिंग यांना ‘प्रेम गीत’ या चित्रपटातील ‘होठो से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो’ या गाण्यासाठी, अमित कुमार (Amit Kumar)यांना ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटातील ‘याद आ रही है’ या गाण्यासाठी तर किशोर कुमार यांना दोन गाण्यांसाठी नामांकन मिळाले होते. ही दोन गाणी होती ‘कुदरत’ चित्रपटातील ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते’ आणि ‘याराना’ चित्रपटातील ‘ छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’ आता मुकाबला किशोर कुमार आणि अमित कुमार या बाप लेकात होता.
========
हे देखील वाचा : हाडाचा शिक्षक अन् जातिवंत ‘स्टार’ कलाकार : सचिन गिरी
========
त्यावेळी फिल्मफेयर पुरस्कार व्यासपीठावर जाहीर होत नसत तर ते आधीच जाहीर होत असत. फक्त त्या कार्यक्रमांमध्ये त्या पुरस्कारांचे वितरण होत असे. ज्यावेळी गायकांचा विजेता जाहीर झाला तर तो पुरस्कार अमित कुमार यांना लव स्टोरी चित्रपटातील ‘याद आ रही है’ या गाण्यासाठी होता. यावेळी अमित कुमार राजस्थानला जोधपुरमध्ये एका म्युझिक शो साठी गेला होता. तिथे किशोर कुमारने फोन करून त्याला सांगितले,” बेटे आज तूने मुझे हरा दिया आज एक बेटे ने बाप को हरा दिया!” अमित कुमारला काहीच कळाले नाही. किशोर कुमार ने त्याला सांगितले ,” बेटा आज मे बहुत खुश हूं क्यू की, आज तुझे फिल्म फेयर का अवॉर्ड डिक्लेअर हुआ है.” अमित कुमारला देखील खूप आनंद झाला. या पुरस्कार सोहळ्यात अमित कुमार आणि किशोर कुमार दोघे हजर होते. आणि गंमत म्हणजे हा पुरस्कार देण्यासाठी किशोर कुमारला रंगमंचावर बोलवण्यात आले आणि त्याच्या हस्ते अमित कुमारला हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी स्टेजवर किशोर कुमार खूप गहिवरला होता साहजिकच आहे म्हणा मुलाचं यश पाहिल्यानंतर बापाच्या डोळ्यात पाणी येणारच!
धनंजय कुलकर्णी