शेजारी बसलेल्या सुनील दत्तला का ओळखू शकली नाही नर्गीस?
सुनील दत्त (Sunil Dutt) सिनेमात येण्यापूर्वी रेडिओ सिलोनवर निवेदक होता. त्या वेळी तो सिने कलावंताच्या मुलाखती घ्यायचा. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री नर्गीस तशी मिडिया पासून चार हात दूरच असायची.आपल्या या कार्यक्रमात तिने यावे असे त्याला कायम वाटायचे. बर्याच मिन्नतवार्या करून ती मुलाखतीला तयार झाली.पण एवढी मोठी कलावंत अभिनेत्री तिची मुलाखत घेताना सुनीलला दडपण आलं.तो चक्क घाबरला होता.तो खूप नर्व्हस झाला. पण तिने त्याला तिथेही धीर दिला व मुलाखत छान रंगली! दोघांनाही कल्पना नव्हती काही वर्षांनी ते एकमेकाचे जीवन साथी बनणार आहेत!
अभिनेत्री नर्गीस एक परीपूर्ण स्त्रीचं आयुष्य जगली. तिने आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटनेला/प्रसंगाला आणि व्यक्तीला अतिशय मनापासून प्रामाणिकपणे साथ दिली. राजसोबतचं प्रकरण संपल्यावर तिने आयुष्यातून तो एपिसोड डिलीट करून टाकला.’आग’(१९४८) च्या निमित्ताने तिच्या जीवनात राज आला आणि सुनील दत्त तिच्या जीवनात येण्या करीता देखील कारणीभूत ठरली ती ’मदर इंडीया’च्या सेटवर लागलेली ’आग’चं! गुजरात मध्ये सिनेमाचे शूट चालू होतं. सिनेमात नर्गीस सुनील दत्त च्या आईची भूमिका करत होता. एका दृश्यात शेतीला आग लागते असा शॉट चित्रित होत होता.त्यावेळी काही डुप्लीकेट वापरले नव्हते कारण हे दृश्य एवढं प्राणघातक होईल असं दिग्दर्शक मेहबूब व सिनेमाचे कोरीओग्राफर फरदून इराणीला वाटलंच नाही. पण अचानक वार्याची दिशा बदलली व आगीचा लोळ अचानक पसरला.नर्गीसला आगीच्या ज्वाळांनी वेढून टाकल्यावर सुनीलने आपल्या जीवाची पर्वा न करता सरळ आगीत झेप घेतली.नर्गीसला वाचवताना सुनील गंभीर जखमी झाला.हॉस्पिटलमध्ये त्यांच्यातील प्रेमभावनेला अंकुर फुटले.सुनीलच्या साध्या सरळ निरपेक्ष स्वभावाने नर्गीसच्या दिलात घर केले. त्यांच प्रेमात पडणं सर्वांनाच अनपेक्षित होत! कारण मदर इंडीयाच्या वेळी नर्गीस टॉपची अभिनेत्री होती तर सुनील अजून यशाच्या प्रतिक्षेत होता.११ मार्च १९५८ रोजी ती दोघे विवाहाच्या बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सिनेमाच्या यशावर विपरीत परीणाम होईल म्हणून त्यांनी हि बातमी गुप्त ठेवली. २५ ऑक्टोबर १९५८ च्या दिवाळीत सिनेमा प्रदर्शित झाला. त्या नंतर त्यांनी आपल्या लग्नाची बातमी ब्रेक केली. या दोघांच लग्न फार काळ टिकणार नाही असं सर्व जण म्हणत असताना हे लग्न नुसतं टिकलंच नाही तर यशस्वी झालं. सुनीलच्या आयुष्याला आकार मिळाला.
लग्ना नंतर मात्र नर्गिस सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. त्याच्या करिअरला साथ देण्यासाठी ती त्याला सर्वतोपरी सहाय्य करून लागली. अजंठा आर्ट्स ही त्यांची स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था केवळ नर्गिसच्या पाठबळामुळे उभे राहिले आणि वाढली.सुनीलदत्त यांच्या करीयर ला आणि आयुष्याला हातभार देण्याचे मोठे काम तिने केले. या दोघांचा एक मनोरंजक किस्सा १९६६ सालचा आहे. त्यावेळी सुनील दत्त (Sunil Dutt) बी आर चोप्रा यांच्या ‘हमराज’ या चित्रपटात काम काम करत होते. चित्रपटाचा शूटिंग मुंबईच्या मोहन स्टुडिओमध्ये चालू होतं. एकदा नर्गिस सुनील दत्तला भेटण्यासाठी म्हणून स्टुडिओमध्ये दुपारी गेल्या. त्यावेळी सुनील दत्त मेकअप रूम मध्ये होता आणि त्यांचे मेकअप चालू होते. सुनील दत्तने या चित्रपटात नाटकात काम करणारा नट रंगवला होता. त्यादिवशी ऑथेल्लो चा मेकअप करायचा असतो. वेशभूषा , केशभूषा आणि एकूणच तो ऐतिहासिक लूक परफेक्ट आलेला असतो. नर्गिसला आपल्या रूम कडे येताना पाहून सुनीलदत्त आपल्या मेकअपमन पंढरीनाथ जुकर यांना हळूच नजरेने सांगितले ‘मी बाहेर गेलो आहे’ असं तिला सांग. नर्गिस सुनील दत्त चा मेकअप रूम मध्ये येते. तिने सुनील दत्तला ओळखलंच नाही! तिने पंढरी काका ना विचारले,” सुनील दत्त (Sunil Dutt) कोठे आहे?” त्यावेळेला ते म्हणाले ,”तो आत्ता इथे होता. सेटवर कुठेतरी बाहेर गेला आहे. येईल इतक्यात.” नर्गिस पर्समधून एक पुस्तक काढून वाचत बसली. तिकडे सुनील दत्त तिच्या शेजारीच असतो. त्याचा मेकअप चालू असतो पण नर्गिस त्याला काही केल्या ओळखू शकत नाही. दर पंधरा मिनिटांनी मात्र ती पंढरी काका यांना विचारत असायची,” कधी येणार?” शेवटी तासाभरानंतर ती कंटाळते आणि म्हणते ,”कदाचित सुनील दुसऱ्या कुठल्या तरी कामात अडकला असेल. मी निघते. फक्त मी येऊन गेले असं त्याला सांगा.” आता मात्र पंढरी काकांना हसू आवरत नाही . नर्गीस विचारते ,”काय झालं ? सुनील दत्त खरंच कुठे आहे?” त्यावर पंढरीनाथ जुकर म्हणतात ,” हा काय तुमच्या शेजारीच तर बसलेला आहे!!” ती आश्चर्याने शेजारी पाहते तर खरोखरच सुनील दत्त (Sunil Dutt) ऑथेल्लो अवतारामध्ये तिथे बसलेला असतो. तिघेही भरपूर हसतात.
=====
हे देखील वाचा : दिलचस्प किस्सा किशोरच्या ‘दूर गगन की छाव में’च्या रिलीजचा!
=====
तिथल्या तिथे नर्गिस पंढरीनाथ जुकर यांना आपल्या हातातील महागडे घड्याळ काढून दिले ,त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली ,” काका तुमच्या जादुई हाताला माझा सलाम!” अतिशय आनंदी आणि यशस्वी आयुष्य सहजीवन सुनील दत्त आणि नर्गीस चे होते!
धनंजय कुलकर्णी