दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘वध’ ही मध्यंमवर्गीय पालकांची कथा…
अनेकवेळा असे काही चित्रपट येतात, की त्याची स्टारकास्ट तगडी नसते. या चित्रपटांचा लॉचिंग सोहळाही फार मोठा होत नाही. पण तरीही हे चित्रपट खास असतात. त्याची कथा दमदार असते आणि दिग्दर्शनही. असाच एक चित्रपट आलाय वध (Vadh Movie)…संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या ज्येष्ठ अभिनेत्यांचा हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. वरवर पाहता वध हा मध्यंमवर्गीय सिनीअर सिटीझनची गोष्ट आहे,असे वाटते. त्यानंतर वध हा सस्पेन्स थ्रिलरपटात कधी होतो, हे कळतही नाही, आणि आपण नकळत त्यामध्ये बांधले जातो. कोणीतरी दोषी आहे, हे जाणूनही त्या दोषीसोबत जोडले जातो. वध मोठ्या पडद्यावर रिलीज झालाय. नीना गुप्ता आणि संयज मिश्रा या दोन जेष्ठ अभिनेत्यांनी चित्रपटात केलेला अभिनय आणि उत्तम कथा बांधणी यामुळे दृष्यम सारख्या चित्रपटालाही वध बॉक्स ऑफीसवर टक्कर देऊ शकतो, असा अंदाज समिक्षकांनी व्यक्त केला आहे.
वध (Vadh Movie) ही मध्यंमवर्गीय पालकांची कथा आहे. आई वडील आपल्या मुलांसाठी काहीही करतात. आपली ऐपत नसतांनाही कर्ज घेऊन मुलांना हवे तसे शिक्षण देतात. अगदी मुलांना परदेशी शिक्षणालाही पाठवतात. त्यानंतर काय होतं, हे पालक किती असाह्य होतात, हा साधारण वध या चित्रपटाचा साचा आहे. मात्र त्यानंतर या पालकांच्या आयुष्यात येणारा ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
दिग्दर्शक जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल यांनी या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता सारख्या दोन कलाकारांना घेऊन अर्धी लढाई जिंकली आहे. कारण संजय मिश्रा, नीना गुप्ता आणि सौरभ सचदेवा यांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटाचे लेखन नेहा चौहान यांनी केले आहे. वध (Vadh Movie) हा चित्रपट खरतर अजय देवगणच्या ‘दृश्यम’ची आठवण करून देतो.
या चित्रपटाची कथा एका निवृत्त झालेल्या शिक्षकांभोवती फिरते. शंभूनाथ मिश्रा हे माध्यमिक शाळेतील निवृत्त शिक्षक आहेत. ग्वाल्हेरमध्ये त्यांची पत्नी मंजू मिश्रासोबत ते रहात आहेत. या दोघांचा एकुलता एक मुलागा आहे प्रजापती. या प्रजापतीला शिकवण्यासाठी शंभूनाथ मिश्रा खूप प्रयत्नशील असतात. हे मिश्रा दांम्पत्य आपल्या मुलाला, प्रजापतीला, त्याच्या आग्रहावरुन शिक्षणासाठी परदेशात पाठवतात. यासाठी शंभूनाथ मिश्रा कर्ज घेतात आणि त्या कर्जाच्या व्याजाचे हप्ते फेडता फेडता हैराण होतात. उत्तम शिक्षण आणि चांगले करिअर करण्यासाठी परदेशात गेलेला मिश्रा यांचा मुलगा तिथेच राहतो आणि आई वडीलांना टाळतो. मुलाच्या करिअरसाठी इकडे त्याचे आई बाबा कर्जबाजारी होतात. मुलगा परदेशात स्थिरावतो पण त्याला आई-वडिलांच्या समस्यांची काळजी नसते. इकडे हे दोघेही आईवडील आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी निकराचा प्रयत्न करतात. मात्र ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे, तो या वृद्ध जोडप्याला खूप त्रस्त करीत असतो. कर्जाचे हफ्ते दिले नाही म्हणून घरही जाण्याची वेळ येते. शिवाय मानसिक त्रासही खूप दिला जातो. एकवेळ जीव द्यावा की काय, अशा परिस्थितीत हे आई वडील येतात. अशावेळी ज्याच्यासाठी कर्ज घेतले तो मुलगाही दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. अशाच परिस्थितीत ज्याच्याकडून कर्ज घेतले आहे, त्याचा खून होतो. हा खून कोणी केला….इथून चित्रपटाला ट्विस्ट येतो आणि पूर्वाधात काहीसा संथ वाटणारा चित्रपट मग वेग पकडतो.
=====
हे देखील वाचा : शेजारी बसलेल्या सुनील दत्तला का ओळखू शकली नाही नर्गीस?
=====
वधमध्ये (Vadh Movie) सर्वात कमाल केली आहे ती संजय मिश्राने. म्हातार्या बापाची व्यथा, आर्थिक समस्या आणि निर्दयी व्यक्ती अशा प्रत्येक टप्प्यात ते परफेक्ट बसले आहेत. दुसरीकडे नीना गुप्तानेही आईच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. मुलगा कसाही असला तरी आईची ममता वेगळी असते. मुलामुळे अनेक अडचणींना सामोरी जातांना ही आई त्याचा फोन येतो तेव्हा मात्र त्याची विचारपूस करतांना हळवी होते. हा हळवेपणा नीना गुप्ता यांनी चोखपणे दाखवला आहे. यासाठीच चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायला हवाच. या चित्रपटात अनेक वृद्ध पालकांची व्यथाही दिसून येते.
वधची (Vadh Movie) सुरुवात थोडी संथ वाटते. कथेची प्रगती खूप हळू होते. पण कथेची बांधणी उत्तम आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या दोघांनीही हे काम चोखपणे पार पाडले आहे. त्यामुळेच वध (Vadh Movie) चित्रपट थेअटरमध्ये जाऊन बघण्यासारखा नक्कीच झाला आहे.
सई बने