मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
दादा कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ हा सिनेमा स्वत: का बनवला नाही?
मराठी सिनेमा यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण करणारे कलाकार म्हणजे दादा कोंडके(Dada Kondke)! दादांनी सलग नऊ चित्रपट गोल्डन जुबली करून एक रेकॉर्ड निर्माण केले. प्रेक्षकांना आपल्या हाफ पॅन्ट ची नाडी दाखवणाऱ्या या कलाकाराने प्रेक्षकांची नाडी बरोबर ओळखली होती. त्यामुळे दादांचे सिनेमे आज देखील जनमानासामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. विनोद हा त्यांच्या कलाकृतीचा स्थायीभाव होता. सिनेमात येण्यापूर्वी दादा कोंडके ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्या तून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होते. या नाटकांच्या प्रयोगातून जेव्हा त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे जमले; त्या वेळेला दादा कोंडके आपले गुरु भालजी पेंढारकर यांच्याकडे गेले . दादा भालजींना म्हणाले “ बाबा, आता पैसा बऱ्यापैकी जमा झाला आहे. आता नाटक पुरे करतो. एक हॉटेल काढतो आणि खानावळ टाकतो आणि पुढचं आयुष्य मस्त जगतो!” त्या वेळेला भालजींनी दादा कोंडके (Dada Kondke) यांना सांगितले,” जी गोष्ट तुला येत नाही त्यात पैसे टाकू नको. हॉटेल आणि खानावळ या धंद्यातले तुला काय नॉलेज आहे? त्यापेक्षा तू एक सिनेमा बनव. ज्याचे तुला नॉलेज आहे. काही अडचण आली तर मी तुझ्या पाठीशी आहे.
माणसाने आयुष्यात तेच काम करावे ज्यात आवड आणि गती आहे. तेव्हा शुभस्य शीघ्रम. एक चित्रपट तयार करायला घे.” गुरुची आज्ञा मानून दादांनी ‘सोंगाड्या’ हा पहिला चित्रपट बनवला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केले होते तर संगीत राम कदम यांच्या होते. वयाच्या चाळीसाव्या वर्षी दादा पहिल्यांदा नायक बनले होते. पण हा खेडूत, अडाणी आणि भोळा भाबडा नायक मराठी प्रेक्षकांना भावला आणि त्यांनी दादा कोंडके आणि त्यांच्या चित्रपटांना डोक्यावर घेतले. तिथून पुढची पंधरा ते वीस वर्षे दादा कोंडके यांच्या सिनेमांनी मराठी चित्रपटाची ध्वजा काय फडकत ठेवली. बुद्धिजीवी वर्ग भले दादांच्या सिनेमाला नाक मुरडत जरी असला तरी इथल्या आम जनतेने दादांच्या (Dada Kondke) चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. दादांचा सिनेमा म्हणजे विनोदाचा महापूर आणि घवघवीत यश हे जणू समीकरण झाले होत. दादांनी काही सिनेमे हिंदीत देखील बनवले. अमजद खान, मेहमूद यासारखे हिंदीतील मेगा स्टार त्यांच्या सिनेमात काम करत होते.
१९८८ साली दादा कोंडके (Dada Kondke) यांचे एक मित्र गजानन शिर्के यांनी दादांना एका लोकप्रिय राजस्थानी चित्रपटाची व्हिडिओ कॅसेट आणून दिली. हा चित्रपट राजस्थानातील सुपरहिट सिनेमा होता ‘ बाई चली सासरीये’ हे त्या चित्रपटाचे नाव होते. गजानन शिर्के दादांना म्हणाले ,”हा चित्रपट तुम्ही मराठी मध्ये तयार करा. प्रचंड यशस्वी होईल.” दादा म्हणाले,” मी हा चित्रपट आधी पाहतो जर मला हा विषय आवडला तरच मी त्यावर चित्रपट बनवेन.” दादांनी तो राजस्थानी चित्रपट बघितला आणि शिर्के यांना सांगितले,” हा चित्रपट खरोखरच सुंदर आहे. उत्कृष्ट आहे. पण सोशल ट्रॅजेडी चा विषय आहे. या विषयावर मी चित्रपट बनवत नाही. कारण माझे प्रेक्षक माझ्याकडून कॉमेडीचीच अपेक्षा ठेवतात. त्यामुळे मी हा चित्रपट बनवू शकणार नाही. पण तुम्हाला मी शब्द दिला आहे. त्या पद्धतीने हा चित्रपट मराठी मध्ये नक्की बनेल याची तुम्ही खात्री बाळगा.”
======
हे देखील वाचा : दिलचस्प किस्सा किशोरच्या ‘दूर गगन की छाव में’च्या रिलीजचा!
======
नंतर दादा यांनी आपला पुतण्या विजय कोंडके यांच्याकडे ती कॅसेट पाठवली आणि त्यावर चित्रपट बनवण्यास सांगितले. विजय कोंडके यांना अर्थातच तो राजस्थानी चित्रपट प्रचंड आवडला आणि त्याचे रीतसर हक्क घेऊन त्यांनी चित्रपट बनवला ‘माहेरची साडी’. ‘माहेरची साडी’ या सिनेमाने मराठी सिनेमाच्या इतिहासात नवा विक्रम केला हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला. महाराष्ट्रातील यात्रा, उरूस, टुरिंग टॉकीज इथे या सिनेमाने भले मोठे यश मिळवले. अक्षरशः सकाळी सहाचा शो लावला तरी तो हाऊसफुल होत असे. लोक बैलगाड्यातून समूहाने सिनेमा पाहायला येत असे. या सिनेमाने समस्त महिला वर्गाला प्रचंड रडवले. अलका कुबल या अभिनेत्रीवर ‘मराठीतील मीनाकुमारी ट्राजेडी क्वीन’ असा शिक्का बसला.
दादा कोंडके (Dada Kondke) यांचे कौतुक करायला पाहिजे कारण भालजींनी त्यांना जो आशीर्वाद दिला होता तो त्यांनी तंतोतंत पाळला.” तुला जे येते तेच कर. नको त्या विषयात लक्ष घालू नकोस!” दादांनी कॉमेडीचा ट्रॅक कधीच सोडला नाही!
धनंजय कुलकर्णी