मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे…
आपल्या भारतीय समाज मनावर रामायणाची मोहिनी अगाध आहे. आपल्या कडील सर्व धार्मिक ग्रंथातून, वाङ्मयातून, सांस्कृतिक वारशातून रामायणाचे ठायी ठायी समग्र दर्शन आपल्याला घडत असते. या रामायणातील एक प्रमुख पात्र होते पवनपुत्र हनुमानचे. या हनुमानाने आपल्या हिंदी आणि मराठी चित्रपटात देखील मोठी भूमिका बजावली आहे. मूकपटापासून रामायणावर असंख्य चित्रपट आलेले आहेत. प्रत्येक दशकामध्ये किमान पाच चित्रपट तरी या आख्यायिकेवर येत होते. दूरदर्शनच्या गोल्डन इरा मध्ये रामानंद सागर यांनी ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षकांच्या पुढे आणली. यात हनुमानाची भूमिका दारासिंग या अभिनेत्याने केली होती. दारासिंग याने त्याच्या बलदंड शरीर यष्टी मुळे कायम हनुमानाच्या भूमिका हिंदी चित्रपटांमध्ये केल्या होत्या. हनुमान हे कॅरेक्टर लहान मुलांचे देखील अत्यंत आवडते असल्यामुळे ॲनिमेशन मुव्हीज मध्ये देखील हनुमान या व्यक्ती रेखेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. हनुमान या व्यक्तिरेखेला घेऊन स्वतंत्र टीव्ही मालिका देखील आल्या. गदिमा आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणामध्ये देखील हनुमान या व्यक्तिरेखेला समोर ठेवून त्यातील काही गाणी रचली गेली. आपल्याकडे दादा कोंडके यांनी ‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान..’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता हासिल केली होती. हनुमान म्हणजे शक्तीचे, बलाचे, ताकतीचे प्रतीक हनुमान म्हणजे आदर्श शिष्यत्वाचा नमुना!
उद्या हनुमान जयंती! या निमित्ताने हनुमानाच्या एका गाण्याचा हा किस्सा तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल. कधी कधी आयुष्यात झालेला अपमान त्या व्यक्तीला कसा जिद्दीने प्रगती पथावर नेतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे गीतकार अण्णा जोशी. त्यांच्या बाबतचा हा किस्सा जितका मार्मिक आहे तितकाच पथदर्शकही आहे. आधी तो किस्सा सांगतो . गदीमा सुधीर फडके एका गाण्याच्या रिहर्सलला बसले होते. (हे गाणे गीतरामायणातील नव्हते. त्याच्या नंतरच्या काळातील आहे.) त्यावेळी तबला वादक म्हणून अण्णा जोशी तिथे उपस्थित होते. दोन दिग्गज कलावंत गाण्याबाबत चर्चा करीत होते. एक शब्द मीटर मध्ये बसत नव्हता. त्या वरून बाबूजी व गदीमा दोघेही वैतागले होते. योग्य असा शब्द काही केल्या सुचत नव्हता.त्यावॆळी तबला वादक अण्णा जोशी सहज म्हणून गेले ’ मी काही सुचवू का?’ झालं. गदीमा आधीच वैतागले होते. त्यांचा ‘इगो’ दुखावला. हा तबलजी पण आता आपल्याला शिकवतोय म्हटल्यावर ते प्रचंड चिडले व म्हणाले ’आता तू मला शिकवणार? अरे तू तबला बडविणारा वादक. तू मला काय सांगणार?’ अण्णा जोशी यावर गप्प बसले. त्यांना हा अपमान जिव्हारी लागला!
गदीमा तिथून गेल्यावर बाबूजींनी अण्णा जोशीना समजाविले. ते म्हणाले ’ जे झालं ते झालं. वाईट वाटून घेऊ नकोस. आता यावर एकच उपाय तू स्वत: गाणं लिहायचं. गाण्यातला एक शब्दच कशाला संपूर्ण गाणेच लिही. तुझं गाणं मी गाईन. आगे बढो.’ बाबूजींच्या शब्दांनी अण्णा जोशीना धीर आला. एक आशेचा किरण दिसला. झालेला अपमान गिळून ते गाण्याचा विचार करू लागले. आता त्यांना स्वत:ला सिद्ध करयचे होते ते देखील एका महाकवी समोर. गदिमा यांच्याबद्दल त्यांच्या मनात अतीव आदरच होता. पण आता प्रश्न स्वत:ला सिद्ध करण्याचा होता. त्यांनी गाणं लिहिलं ’नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे…’ सुधीर फडके यांनी ते गाणे गायले. बाबूजींच्या स्वरातील या गीताला स्वरसाज चढविला संगीतकार नीळकंठ अभ्यंकर यांनी. गाणं इतकं जबरदस्त झालं की, बर्याच जणांचा हे गाणं गीतरामायणातीलच आहे. असा संभ्रम झाला. गदीमांनी देखील मागचा सारा राग विसरून अण्णांच खुल्या दिलाने कौतुक केलं. हे सारे लोक प्रतिभेच्या प्रांतात आभाळाएवढे उंच होते.यांचा रागही अफाट होता आणि लोभही!
======
हे देखील वाचा : लता आणि आशाला घडवणारे संगीतकार निर्माण करणारा निर्माता!
======
जाता जाता थोडंसं गीतकार अण्णा जोशी यांच्याबद्दल. अण्णा जोशी हे मूळचे तबलावादक जरी असले तरी त्यांना काव्याची जाण होती. गदिमांकडून नकळतपणे झालेल्या अपमानाने ते गीतकार झाले आणि त्यांनी अनेक चांगली गाणी लिहिली. विशेषतः संगीतकार सी रामचंद्र यांनी सत्तरच्या दशकामध्ये काही मराठी गाणी गायली होती ती बहुतेक सर्व गाणी अण्णा जोशी यांनीच लिहिली होती. पाचोळे आम्ही हो पाचोळे (सं. सी रामचंद्र) हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी, पळभर थांब जरा रे विठू (सं. नीलकंठ अभ्यंकर)
अण्णा जोशी यांनी जर गदिमांच्या बोलण्याचा राग मनात धरला असता किंवा अपमानाने ते खचून गेले असते तर ते गीतकार कधीच बनू शकले नसते. पण झालेला अपमान गिळून ते मोठ्या ताकतीने आणि इर्षेने गीतकार बनले अर्थात त्याला साथ मिळाली बाबूजी सुधीर फडके यांची. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हा एक वेगळा किस्सा खास आजच्या तरुण पिढीसाठी जी कायम थोड्याशा अपमानाने डीप्रेशन मध्ये जाते.