गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
‘हा’ सिनेमा जयदेव यांच्या हातातून कसा गेला?
हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात संगीतकार जयदेव (Composer Jaydev) यांची कारकीर्द तशी खूपच छोटी आहे. अतिशय गुणी प्रतिभावान परंतु कम नशिबी असं वर्णन जयदेव यांच्याबाबत करायला लागेल. संगीतामध्ये यशाच सातत्य त्यांना कधीच राखता आलं नाही. एक चित्रपट यशस्वी झाला की, पुन्हा त्यांच्याकडे मोठे चित्रपट येतच नसत तर छोटे-छोटे लो बजेटचे सिनेमे त्यांच्याकडे येत. पुन्हा काही वर्षांनी एखादा सुपरहिट सिनेमा त्यांच्या संगीतातून घडत असे पण पुन्हा तोच प्रवास! यशापासून असा पाठशिवणीचा खेळ खेळता खेळता त्यांनी अतिशय दर्जेदार असे संगीत दिले. ‘मुझे जीने दो’, ‘हम दोनो’, ‘रेश्मा और शेरा’, ‘आलाप’, ‘गमन’, ‘दूरिया’, ‘अनकही’. हे त्यांचे गाजलेले आणि पारितोषिक प्राप्त चित्रपट. संगीतकार जयदेव यांच्या बाबत खरोखरच इंडस्ट्री कडून अन्याय झाला का? सर्व काही गुणवत्ता असून देखील त्यांना हेतू पुरस्सर रित्या डावलण्यात आलं का?
दुर्दैवाने त्याचे उत्तर हो असेच म्हणावे लागेल. कारण त्याची दोन ठळक उदाहरणे आपल्याला सापडतात. १९७८ साली दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी ‘गमन’ नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. आर्ट फिल्मच्या कॅटेगिरीत मोडणारा हा चित्रपट समीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. या चित्रपटात फारुक शेख स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला संगीतकार जयदेव (Composer Jaydev) यांनी अतिशय उत्तम असे संगीत दिले होते. ‘सीने में जलन आंखो में तुफान सा क्यू है’, ‘आपकी याद आती रही रात भर’ ही अतिशय अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. या सिनेमाच्या संगीतासाठी संगीतकार जयदेव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुजफ्फर अली जयदेव यांच्या संगीतावर प्रचंड खुश होते. त्यामुळे त्यांनी त्यांचा पुढचा महत्त्वाचा चित्रपट ‘उमराव जान’ हा देखील संगीतकार जयदेव (Composer Jaydev) यांच्याकडे सोपवला. जयदेव यांच्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. कारण ‘उमराव जान’ या चित्रपटांमध्ये संगीताला खूप मोठा वाव होता. जयदेव प्रचंड आनंदी झाले आणि त्यांनी या चित्रपटाच्या संगीतावर काम सुरू केले. ‘उमराव जान’ यांच्या गझल्स आशाराणी या नवोदित गझल गायिके कडून गाऊन घ्यायचे त्यांनी ठरवले. त्या पद्धतीने त्यांनी तिच्यासोबत काम देखील सुरू केले. परंतु चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मुजफ्फर अली यांना या चित्रपटातील गझल प्रस्थापित गायिकेकडून गाऊन घ्यायच्या होत्या. त्यासाठी त्यांना मंगेशकर भगिनी हव्या होत्या. परंतु जयदेव यांच्या डोक्यात मात्र नवोदित गायिका अशाराणी हिलाच ही गाणी द्यावे असे वाटत होते. दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम होते. परंतु शेवटी अर्थातच मुजफ्फर आली यांचे म्हणणे मान्य झाले. आणि संगीतकार जयदेव (Composer Jaydev) यांना हटवून तिथे संगीतकार खय्याम यांची वर्णी लागली.
अर्थात खय्याम यांनी अतिशय सुंदर असं संगीत या चित्रपटाला दिले. आशा भोसले, उमराव जान आणि संगीतकार खय्याम हे समीकरण अजरामर ठरले. परंतु या चित्रपटासाठी संगीतकार जयदेव यांचा विचार झाला होता हे देखील तितकेच महत्त्वाचे. असाच काहीसा प्रकार साठच्या दशकांमध्ये झाला होता. नवकेतन त्यांच्या ‘हम दोनो’ या चित्रपटाला जयदेव यांनी संगीत दिले होते. या चित्रपटातील प्रत्येक गाणं आज देखील लोकप्रिय आहे. अभी न जाओ छोडकर, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, प्रभु तेरो नाम जो ध्याले सुख पाये, कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, अल्ला तेरो नाम,जहां मी ऐसा कौन है… ही सर्वच गाणी प्रचंड गाजली. जयदेव (Composer Jaydev) यांचे नाव सर्वदूर लोकप्रिय झाले. त्यावेळी नवकेतन बॅनरने यापुढे एक चित्रपट सचिन देव बर्मनला तर पुढचा चित्रपट जयदेवला असे द्यायचे ठरले. त्या पद्धतीने नवकेतनचा पुढचा चित्रपट ‘तेरे घर के सामने’(१९६३) सचिन देव बर्मन यांच्याकडे गेला. त्यानंतरचा चित्रपट मात्र नियमाप्रमाणे जयदेव यांच्याकडे यायला हवा होता. तो चित्रपट होता ‘गाईड’. साहित्य अकादमी विजेता साहित्यकृतीवरील हा चित्रपट जयदेव यांच्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट होती. त्यांनी त्याच्यावर काम देखील सुरू केले होते. परंतु पुढे चक्र अशी फिरली की जयदेव यांच्या हातातून तो चित्रपट काढून संगीतकार सचिन देव बर्मन यांना देण्यात आला आणि जखमेवर मीठ चोळायचे त्या पद्धतीने या चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून जयदेव (Composer Jaydev) यांची नेमणूक करण्यात आली! यानंतर नवकेतन च्या कुठल्याच चित्रपटाला जयदेव यांना संगीत देता आलं नाही. यशापयशाचा असा पाठशिवणी चा खेळ जयदेव यांच्या आयुष्यात कायम होत राहिला.
=====
हे देखील वाचा : राजकारणाने ‘या’ अभिनेत्यांची मैत्री कायमची संपली!
=====
हा गुणी प्रतिभावान संगीतकार मुंबईमध्ये अखेर पर्यंत चर्चगेट स्टेशन जवळ एका खोलीमध्ये राहत होता स्वतःचं त्यांचं घर देखील नव्हते. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या या संगीतकाराने अतिशय दर्जेदार असं संगीत चित्रपटाला दिला होता पण नशिबाची साथ त्यांना कधी मिळाली नाही. त्यामुळे कदाचित ते म्हणत असावेत ‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया…’