दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मल्टीप्लेक्सचा चेहरा, सिंगल स्क्रीनचा आत्मा
मुंबईच काय, महाराष्ट्रातील, अगदी देशातील शहरातील, गावातील एकादं जुने सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृह बंद पडल्याच्या बातमीची आपल्याला जणू सवय झालीय. फक्त राहतात तेथे एन्जाॅय केलेल्या पिक्चर्सच्या आपापल्या आठवणी. ज्या दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये मी अनेक मराठी व हिंदी चित्रपट एन्जाॅय केले अशी मॅजेस्टिक, नाझ, ड्रीमलॅन्ड, रेक्स, अप्सरा, नाॅव्हेल्टी, मिनर्व्हा अशी एकेक करत अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत गेली याचीही जणू पन्नाशी झालीय. एकादा विक्रम असाही. गिरगावातील आमच्या खोताची वाडी, तसेच शेजारील आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी यांच्या बरोबर समोरच असलेले मॅजेस्टिक थिएटर हे १९७२ च्या उत्तरार्धात बंद पडले. ते माझे शालेय वय होते. पण असे मूकपटाच्या काळापासूनचे आणि मग बोलपटापासूनचे अनेक वैशिष्ट्य असलेले आणि आमच्या गिरगावातील मराठी माणसाचे मराठी चित्रपटासाठीचे हक्काचे थिएटर अचानक बंद होताच सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात त्याची केवढी तरी प्रतिक्रिया उमटली. एक चित्रपटगृृह बंद होतेय म्हणजे फार काही घडतयं असाच साधारण सूर होता. पिक्चरवरचे प्रेम म्हणतात ते असेही. अनेक चित्रपट रसिकांनी वृत्तपत्रात पत्र लिहून यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना आपली निराशा लपवता येत नव्हती. त्याच सुमारास अथवा काही वर्षातच फोर्टचे रेक्स, दादर टी.टी.चे ब्राॅडवे, माटुंगा माहिममधील श्री, रिव्होली अशी एकेक करत आणखीन काही थिएटर बंद होताना धक्का बसणे कमी कमी होत गेले.
आता तर ‘बंद झालेले एकादे चित्रपटगृह पुन्हा सुरु झाले तर सुखाचा धक्का बसेल’ असे वाटते आणि खरंच असा धक्का बसलाच. दादरचे चित्रा, घाटकोपरचे श्रेयस आणि बोरिवली (पूर्व) चे अजंठा ही थिएटर्स कात टाकून पुन्हा सुरु झालीत आणि अशीच काही बंद असलेली चित्रपटगृह पुन्हा सुरु होणार आहेत. मूळ चित्रा थिएटर १९४५ साली सुरु झाले. सत्तरच्या दशकात बाल्कनीच्या एका बाजूला पंचवीस सीटसचे मिनी थिएटर कार्यरत झाले. ऐंशीच्या दशकात मला आठवतय, प्रभात चित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक रविवारी जगभरातील अनेक चित्रपटांचे खेळ याच मिनी थिएटरमध्ये आयोजित केले जात. मी स्वतः सत्यजित राय दिग्दर्शित ‘पथेर पांचोली’ वगैरे चित्रपट येथे पाहिले. त्यानंतर नूतनीकरणात मिनी थिएटर नव्हते. आता मुख्य हाॅलमध्ये ५३९ सीटस होत्या. आखीव रेखीव असे थिएटर ही एक ओळख झाली. अलीकडेच काही वर्षापूर्वीच ते बंद होताना ते कात टाकतयं ही गोष्ट दुर्लक्षित राहिली. आता असं काही रुपडं घेतलयं की मल्टीप्लेक्स कल्चरचा भारी फिल यावा. आता ५०६ सीटस असून काही तर ऐषआरामात चित्रपट एन्जाॅय करावा असा झक्कास मामला आहे. डाॅल्बी साऊंड सिस्टीम, सिल्व्हर स्क्रीन, लेटेस्ट साऊंड क्वालिटी असा एकूणच क्लास मामला आहे. तिकीट दर मात्र दोनशे अडिचशे असे आहेत. मूळ श्रेयस थिएटरच्या जागी राजहंस ग्रुपने प्रत्येकी अडिचशे सीटसची दोन थिएटर सुरु केली. याचाही लूक मल्टीप्लेक्सला साजेसा. अजंठा सहा वर्षांपूर्वी बंद झाले. या १०१० सीटसच्या भव्य थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यांनी पिक्चर एन्जाॅय करणे म्हणजे एक भारी अनुभव असे. आता ते ३३४ सीटसचे आहे. वरच्या मजल्यावर आहे.
जुने थिएटर पाडून त्याच जागी नवीन थिएटर (Theater) उभे राहणे याचीही दीर्घकालीन परंपरा आहे. काही उदाहरणे द्यायची तर, जुने मिनर्व्हा पाडून त्याजागी १९७२ साली भव्य दिमाखदार असे मिनर्व्हा उभे राहताना त्याला महाराष्ट्राचे गौरवस्थान असे कौतुकाने म्हटले गेले. या चित्रपटगृहाची मालकी शम्मी कपूर व निर्माते एफ. सी. मेहरा यांची. उदघाटनाचा चित्रपट ‘लाल पत्थर’. १४९९ सीटसमुळे येथे पिक्चर पाहणे म्हणजे रोमांचक अनुभव असे. मी अनेक पाहिलेत. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ( १९७५) चा सत्तर एमएमचा पडदा आणि स्टीरीओफोनिक साऊंड यामुळे मिनर्व्हात अचंबित करणारा अनुभव येई. कालांतराने ही भव्य वास्तू पाडण्यात आली. अप्सरा म्हणजे मूळचे इंग्रजकालीन लॅमिन्टन थिएटर. १९६४ साली अप्सरा चित्रपटगृह उभे राहिले. पहिला चित्रपट राज कपूर अभिनित व दिग्दर्शित ‘संगम’. हा चित्रपट चार तासांचा असल्याने दोन मध्यंतर. अप्सरा कालांतराने पाडून नवीन इमारत उभी राहताना वरच्या मजल्यावर मल्टीप्लेक्स कल्चरचे तीन स्क्रीन होते. पण मूळ चित्रपटगृहाची ओळख हरवली होती. थिएटर दिसलं पाहिजे, तो फिल त्यात नव्हता. त्यामुळे हे स्क्रीनही बंद झाले.
एकिकडे जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स (Theater) बंद आणि त्याच वेळेस गणिताच्या संख्येने त्यापेक्षाही अधिक मल्टीप्लेक्स स्क्रीन असा प्रवास सुरु झाला. त्यात दक्षिण मध्य मुंबईतील पीला हाऊस विभागातील गुलशन, ताज, दौलत वगैरे अनेक थिएटर्स बंद होत गेली. पण निशातने कात टाकली. ते आंतर्बाह्य बदलले. अतिशय कलरफुल आणि देखणे केले. मी आवर्जून हे नवीन रुपडं पाह्यला गेलो असता त्याच्या उत्तम सीटस आणि एकूणच रंगसंगती पाहून इम्प्रेस झालो. चित्रपटाचं नवीन फॅशनेबल स्वरुप प्रेक्षकांना पुन्हा सिंगल स्क्रीन थिएटर्सकडे (Theater) आकर्षित करेल असाच त्यामागचा हेतू आणि उद्देश होता.
======
हे देखील वाचा : ‘माहेरची साडी’ नंतर काय? उत्तर मिळाले हो…
======
चित्रा, अजंठा, श्रेयस पुन्हा सुरु करताना तोच सकारात्मक दृष्टिकोन आहे. मल्टीप्लेक्सच्या कल्चरमध्ये हरवणारा अथवा त्या झगमगीत वातावरणाला आपलसं न मानणारा, बुजणारा असा एक सामाजिक वर्ग आहे, तो प्रेक्षक या मल्टीप्लेक्सचा चेहरा आणि सिंगल स्क्रीन थिएटरचा (Theater) आत्मा असलेल्या अशा कात टाकून पुन्हा उभे राहिलेल्या थिएटर्सना नक्कीच हाऊसफुल्ल गर्दी करेल असा विश्वास आहे. अर्थात पिक्चरही तसेच असावेत. ते जास्त महत्वाचे. अन्यथा रिकाम्या खुर्च्यांना पिक्चर दाखवायची वेळ येते. महाराष्ट्र शाहीर, ‘पुष्पा २ असे काही हुकमी क्राऊड पुलर ठरतील असे काही चित्रपट येताहेतच. काही असो, पिक्चर पाहण्याची खरी मजा थिएटरच्या मोठ्याच पडद्यावरच हे सत्य असेपर्यंत तरी सिनेमा थिएटरचे काय होणार याची चिंताच नको ती.