मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
रहस्यरंजकतेचे ‘अनहोनी’
एक्स्प्रेस ट्रेन अतिशय वेगाने सुसाट धावत आहे. फर्स्ट क्लासच्या बोगीतून मिसेस राय बहादूर सिंग (कामिनी कौशल्य) आणि त्यांची मुलगी डाॅ. रेखा (लीना चंदावरकर) प्रवास करत आहेत आणि अगदी अचानक चाकू हातात घेतलेला एक वेडा (संजीवकुमार) त्याच डब्यात त्यांच्या समोर येताच त्या दोघी किंचाळतात, विलक्षण घाबरतात. त्यातून त्या स्वत:ला कसंबसं सांभाळतात. तोही थोडासा नाॅर्मल होतो. त्याला असेच सोडून देण्यापेक्षा त्याच्यावर उपचार करावेत. त्याची मानसिक स्थिती ठीक करावी. त्याला नाॅर्मल करावे असे डाॅ. रेखा ठरवते. त्याला इस्पितळात दाखल करते. घरी आणते. त्यात तो बरा होत जाताना ती त्याच्याकडे आकर्षित होते. चक्क त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच विश्वासात ती त्याला आपल्या पित्याचे निधन कसे झाले, ती हत्या असावी असे वाटते असे सत्य त्याला अतिशय मोकळेपणाने सांगते. तो सगळं व्यवस्थित ऐकून घेतो आणि एक फोन लावतो आणि बोलतो, मी पोलीस इन्स्पेक्टर सुनील बोलतोय… त्याचं हे बोलणे ऐकून रेखा हादरते. तिला हा आश्चर्याचा मोठाच धक्का असतो. आपल्यालाही असतोच आणि पडद्यावर येते, मध्यंतर. (Mystery Movie)
रवि टंडन दिग्दर्शित ‘अनहोनी’ ( प्रदर्शन ४ मे १९७३) च्या मध्यंतरला आम्ही चित्रपट रसिक भारावून गेलेलो असतो. माझे ते शालेय वय होते आणि माऊथ पब्लिसिटीवर पिक्चर हिट होण्याचे ते दिवस होते. ‘अनहोनी’ मेन थिएटर लिबर्टीत झळकला आणि पिक्चर रहस्यरंजक आहे अशी कानोकानी चर्चा होत गेली आणि चार आठवडयांनी गिरगावातील सेन्ट्रल थिएटरला तो शिफ्ट होताच एन्जाॅय केला. याला पन्नास वर्ष झाली कधी झाली हे समजलेच नाही. मध्यंतरनंतर ‘ खून कसा झाला? कोणी केला? का केला?’ याच्या रहस्याचा वेध सुरु होतो. सस्पेन्स पिक्चर म्हणजे सतत टर्न आणि ट्वीस्ट हवेत. आपण चित्रपट पाहताना जसा विचार करतो तसे न घडता, भलतेच घडणे आणि संपूर्ण पिक्चरभर ज्याच्यावर संशय येत नाही तोच नेमका गुन्हेगार असणे अशी पटकथा व दिग्दर्शन असेल तर पिक्चर हिट. ‘अनहोनी’च्या अगोदर ‘खिलौना ‘तही संजीवकुमारचा असाच वेडा (पण कारण वेगळे) पाहिला असल्याने यावेळी तशा रुपात पाहताना त्याला सहानुभूती राहिली. पण तो तर… हा चकमा म्हणजेच यश आणि पिक्चरमध्ये मध्यंतरनंतर काय घडेल याचे कुतूहल. (Mystery Movie)
सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांच्या एकूणच यशाची वेगळीच स्टोरी आहे. एकाच वेळेस पौराणिक चित्रपट (जय संतोषी मा) आणि समांतर चित्रपट (निशांत) असे दोन टोकाचे चित्रपट यशस्वी ठरत होते. यासह अनेक प्रकार होतेच. बहुस्तरीय हा शब्द बरोबर ठरावा आणि त्यात एक होता, सस्पेन्स चित्रपट. (Mystery Movie)
याची पाळेमुळे साठच्या दशकात सापडतात. बी. आर. चोप्रा यांचा ‘कानून’ हा कोर्ट रुम ड्रामा यापासून रवि टंडन दिग्दर्शित ‘खेल खेल मे’, ब्रीज दिग्दर्शित ‘मगरुर’ असा हा जवळपास दीड दोन दशकांचा प्रवास आहे. ‘कानून’ चक्क गीतविरहीत होता. सस्पेन्स पिक्चरमध्ये चोरीची गोष्ट (ज्वेल थीफ, तिसरी मंझिल, व्हीक्टोरिया नंबर २०३, छुपा रुस्तम, बुलेट, शालिमार, लूटमार), भूताची गोष्ट ( बीस साल बाद, कोहरा), खूनाची गोष्ट (परदे के पीछे, खामोश) असे प्रकार असत. त्यात एक काॅमन फॅक्टर सुपर हिट गीत संगीत व नृत्य यांचा. यात रामसे बंधुंच्या थरारपटाची तर्हाच वेगळी. ते सस्पेन्स कमी आणि भयपट जास्त वाटत. दो गज जमी के नीचे, अंधेरा, दरवाजा, और कौन असे त्यांचे पिक्चर्स पाहिले न पाहिले तरी ते लक्षात येईल. राजा परांजपे दिग्दर्शित ‘पाठलाग’ या म्युझिकल रहस्यरंजक चित्रपटावरुन हिंदीत राज खोसला दिग्दर्शित ‘मेरा साया’ बनला, तोही सुपर हिट. त्या काळात सस्पेन्स पिक्चर एक यशस्वी जाॅनर होता. वह कौन थी, गुमनाम, मर्डर, यह रात फिर न आयेगी, हमशकल, हमराज, आमने सामने, उस्तादों के उस्ताद, परवाना, कब क्यू और कहा, गहरी चाल, धुन्द, खून खून, बेनाम, फिर वही रात असे बरेच रहस्यरंजक चित्रपट रसिकांनी एन्जाॅय केले. कुठे फुल्ल सस्पेन्स. तर कुठे मनोरंजनातील एक भाग म्हणून रहस्य (Mystery Movie). यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तेफाक’ यात नाट्यमय. हा गीतविरहीत. क्लायमॅक्स धक्कादायक असलेला चित्रपट.
======
हे देखील वाचा : मल्टीप्लेक्सचा चेहरा, सिंगल स्क्रीनचा आत्मा
======
एकदा का सस्पेन्स माहित पडल्यावर तो चित्रपट पुन्हा कशाला बघा असा प्रश्न स्वाभाविक. पण तरीही हे सस्पेन्स पिक्चर (Mystery Movie) मॅटीनी शोला पुन्हा पुन्हा पाहिले जात. याचे कारण, त्याचे लोकप्रिय गीत संगीत. ‘अनहोनी’चीही मै तो एक पागल, पागल क्या दिल बहेलाए गा, हंगामा हो गया ही गाणी लोकप्रिय. वर्मा मलिक यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत. पोस्टरभरचा दाढीधारी आणि हाती चाकू घेतलेला संजीवकुमार ‘अनहोनी’ची जातकुळी स्पष्ट करीत होता. थीमनुसार पोस्टर हवे ते हे असे. येथे दिग्दर्शक दिसतो म्हणूयात. पन्नास वर्षांनंतरही हा इफेक्ट कायम आहे हो. जुन्या काळातील चित्रपटांची ती ताकद आहे.
आज असे म्युझिकल रहस्यरंजक चित्रपट का बनत नाहीत हा प्रश्न निर्माण होत असला तरी त्याचे उत्तर कोण देणार? ते एक रहस्यच राहिलयं. ‘इत्तेफाक’ची रिमेक आली, पण रंगली नाही, याचं कारण मूळ चित्रपटातील नायिकेभोवती (नंदा) ड्रामा होता. ‘खेल खेल मे’वरुन ‘खिलाडी’ बनला पण मूळ चित्रपटातील प्रेमाच्या गोष्टीतील विघ्न आणि रहस्याचा चकमा भारी होता. ‘अनहोनी’ वरुन ‘छोटे सरकार’ बनताना नायिकेभोवती (शिल्पा शेट्टी) थीम रचल्याने ड्रामा खुललाच नाही.