‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
यह जीवन है, इस जीवन का…
गोष्ट तशी छोटी वाटते. पण आशय खूपच मोठा आहे. विचार करायला लावणारा आहे आणि आजही काही प्रमाणात तो समाजातील एक भाग आहे. गावाकडची मुलगी मुंबईतील नवीन आयुष्याचे (life) स्वप्न पाहत लग्न करुन मुंबईत येते. तिच्या ‘माहेरची माणसं’ आपल्याला ‘मुंबईचा जावई’ लाभल्याने खुश आहेत. त्यांच्याही मनात मुंबईबद्दलची सुखासीन प्रतिमा आहे. तर ती नवविवाहिता मुंबईतील आपल्या ‘पिया का घर’ कसे सुरेख असेल, एका नवीन आयुष्याच्या स्वप्नाची पूर्तता होईल असे तिला मनोमन वाटत असते. पण मुंबईत गिरगावातील चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत एकत्र कुटुंब पध्दतीत राहताना तिची कुचंबणा होते. मानसिक कोंडी होते. पती पत्नीतील संवाद आणि स्वातंत्र्य यात अडचण येते. जेव्हा बाकीचे कुटुंबिय आपल्या कामासाठी बाहेर जातात तेव्हाच यांना सहवासाची संधी मिळते. यावर उपाय म्हणजे, ‘आपलं घर’ घेणे. एक म्हणजे ते उपनगरात कुठे तरी दूरवर मिळेल आणि त्यासाठी बराच पैसा हवा. कर्ज काढायचे तर हफ्ते फेडायचे कसे? हा प्रश्न… कारण पगार तुटपुंजा.
ही गोष्ट अनेक वर्षांपासूनची आहे. विशेषत: एकत्र कुटुंब पध्दतीच्या काळात तर अनेक नवदाम्पत्यात तसे घडायचे. अशी सामाजिक कौटुंबिक गोष्ट ‘सिनेमाच्या पडद्यावर’ येणे स्वाभाविक होतेच. १९७० साली तसा योग मराठीत आला. ते साहजिकच असावे.
त्याकाळात गिरगाव, गिरणगाव, मध्य मुंबईत मोठ्याच प्रमाणावरील ‘चाळ संस्कृती’त असेच संसार असत. ‘मुंबईचा जावई’ मिळतोय म्हणून गावाकडचे खुश आणि मुंबईत नांदायला मिळतेय म्हणून पुन्हा गावाकडून शहरात आलेली नवविवाहिता खुश. महत्वाचे आहे ते, अनेक असुविधांसह त्यांनी संसार केले, मुलांवर संस्कार केले. अनेक चाळीतील खोल्यांत पाय टाकताच ती खोली संपे अथवा एक खाट, एक कपाट, ओटी, स्टोव्ह, मोरी यानेच घर भरे. नशीबात असेल तर पोटमाळा. पण काॅमन नळ व टाॅयलेट. कधी त्यात भांडणे. यातलं बरंचसं चित्रपटात आले. यायलाच हवे होते. तुषार प्रधान निर्मित व राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई’ ( १९७०) या चित्रपटात ते पाहायला मिळाले. मी अगदीच लहान असतानाची आठवण. गिरगावातील आमच्या खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉकमधील चाळीत याच ‘पिक्चरचे शूटिंग’ आहे असे समजताच आम्ही सगळी पोरं टोरं धावत गेलो. पण शाळेची वेळ होताच ते सोडून द्यावे लागले.(life)
कालांतराने आमच्या गिरगावातील मॅजेस्टीक सिनेमागृहात हा चित्रपट एन्जाॅय करताना त्या वयात त्यातील आशय लक्षात येत नव्हता. ‘पिक्चर पाहायचा म्हणजे त्यातील गोष्ट पाहणे’ असे मानण्याचे ते वय होते. ( सिनेमाला गोष्ट असायला हवी हे सर्वकालीन सत्य आहेच. पण त्याचा आशय व मांडणी जास्त महत्वाची हे कालांतराने समजले.) चित्रपटात सुरेखा, अरुण सरनाईक, शरद तळवलकर, रत्नमाला, विमल राऊत, भालचंद्र कुलकर्णी, जयंत भट इत्यादींच्या भूमिका आहेत हे समजत होते. कथा पटकथा संवाद राम केळकर यांचे तर ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांना सुधीर फडके यांचे संगीत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला ही आणि आजही लोकप्रिय. अशा थीमची, अशा चित्रपटाची हिंदीत रिमेक व्हायलाच हवी होती. रिमेकमुळे एका भाषेतील चित्रपट अन्य भाषेत जात राहतात. चित्रपट संस्कृतीतील एक महत्वाचा घटक.
निर्माते ताराचंद बडजात्या यांनी आपल्या राजश्री प्राॅडक्सन्सच्या बॅनरखाली बासू चटर्जी दिग्दर्शित ‘पिया का घर’ ( मुंबईत रिलीज १२ मे १९७२. एकावन्न वर्ष पूर्ण) अशी रिमेक केली. पण मूळ चित्रपटातील रंजकता आली नाही. शहरातील नायक ( अनिल धवन) दूरवरच्या ग्रामीण भागातील युवतीशी ( जया भादुरी) लग्न करुन तिला मुंबईत आणतो. आयुष्यात ती पहिल्यांदाच मुंबई पहात असते. एक प्रकारची भाबडेपण तिच्या चेहर्यावर दिसते, ते तिच्या वागण्या,बोलण्यात दिसते. पण चाळीतील जीवन म्हणजे आजूबाजूच्यांचे सतत लक्ष आणि एकत्र कुटुंबात असल्याने पतीशी संवाद करण्यातील अडचण. मूळ चित्रपटाची गोष्ट फारसा फरक न करता रिमेकमध्ये आली. बहुदा गोष्टीवरचा मराठी ठसा हिंदीत रुजला नसावा. जया भादुरीने ( तोपर्यंत ती बच्चन झाली नव्हती) मुंबई शहरातील नवखेपण, नवीन संसारातील आनंद, छोट्या खोलीतील घुसमट, पतीला समजून घेण्यातील सद्भावना हे सगळं छान साकारल. अनिल धवन अभिनयासाठी कधीच ओळखला गेला नाही. चित्रपटात राजा परांजपे, असरानी, पेंटल, आगा, मुकरी, सुंदर, सुलोचना चटर्जी, सरीता देवी, सी. एस. दुबे इत्यादी अनेक कलाकार आहेत. आनंद बक्षी यांची गीते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत हे हिट समीकरण घट्ट होतेच. यह जीवन है इस जीवन का हे किशोरकुमारने गायलेले आयुष्याचे तत्वज्ञान सांगणारे गाणे सर्वकालीन लोकप्रिय.(life)
आजही याच थीमवर चित्रपट बनू शकेल? आज एकत्र कुटुंब पध्दतीपेक्षा स्वतंत्रपणे राहण्याची भावना वाढलीय. चाळ संस्कृती आकुंचन पावत फ्लॅट कल्चर वाढलयं. मुंबईत मुलाचे स्वतःचे घर आहे का, कसे आहे याची सखोल माहिती झाल्याशिवाय गावाकडच्या मुलीकडचे लग्नाला तयार होतील काय? महत्वाचे म्हणजे, मूळ चित्रपटातील नायिका या ‘घर आणि चूल’ यात रमल्या होत्या. आज घरखर्चाला आधार म्हणून का होईना एकादी छोटीशी नोकरी हवी अशा कमीत कमी अपेक्षा असतातच.
काही चित्रपटांच्या रिमेक होऊ शकत नाही आणि होऊ देखील नये. त्यापेक्षा मूळ चित्रपट पुन्हा पाहावा आणि तेव्हाची लग्न संस्कृती, मुंबईबद्दलची ओढ, ग्रामीण भागात मुंबईबद्दल असलेले गोड समज, चाळीतील छोट्या खोलीतील आयुष्याची धडपड आणि आनंद, एकत्र कुटुंबातील मानसिकता आणि या सगळ्यातील आशावाद, स्वप्ने पहावीत.(life)
======
हे देखील वाचा : फायटिंगलाही ॲक्टींग लागते यावर शिक्कामोर्तब!
======
जुने चित्रपट बरेच काही देत असतात. त्यात अनेक तात्कालिक संदर्भ असतात. त्यात एक प्रकारची गंमत असतेच असते.
‘पिया का घर ‘( मूळ चित्रपट ‘मुंबईचा जावई ‘)मध्ये ती आहे. पन्नास, एकावन्न वर्षांपूर्वीची चाळीतील (life) मुंबई त्यात आहे. यह जीवन है, यही है रंग रुप, थोडे गम है…