…..आणि जेव्हा मीनाक्षीला ’दामिनी’ करीता एकही पारितोषिक मिळत नाही!
एखादा चित्रपट त्यातील एखाद्या व्यक्तीरेखेमुळे गाजतो; इतकेच नाही तर या व्यक्तीरेखेचे नावच चित्रपटाचे शीर्षक असते. सिनेमाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो थोडक्यात सिनेमा क्लासेस आणि मासेस दोन्ही मध्ये लोकप्रिय ठरतो. पण एवढं सगळं असूनही ज्या व्यक्तीरेखेमुळे सिनेमा गाजला ती भूमिका करणार्या अभिनेत्रीला एकही पारितोषिक मिळत नाही का? आजही हा चित्रपट म्हटलं की, त्या अभिनेत्रीचा चेहरा नजरे समोर येतो. तिच्यासाठी देखील ही तिची करीयर मधील सर्वोत्कृष्ट भूमिका ठरते तरी पारीतोषिकापासून मात्र ती वंचित रहावी? अर्थात यामुळे तिला पारीतोषिक मिळालं नाही हिच एक मोठी ’न्यूज’ झाली. चित्रपट होता १९९३ साली प्रदर्शित झालेला राजकुमार संतोषीचा ’दामिनी’! (Damini Movie) आणि अभिनेत्री होती मीनाक्षी शेषाद्री. त्या वर्षीच्या फिल्मफेयर आणि नॅशनल या दोन्ही पुरस्कारांनी तिला हुलकावणी दिली. त्यामुळे चर्चा याचीच जास्त झाली.
हा सिनेमा तसा कायमच निर्मिती पासूनच चर्चेत होता. याला कारण १९९० सालच्या ’घायल’ नंतर पुन्हा एकदा सनी-मीनाक्षी एकत्र येत होते. सिनेमाचा दिग्दर्शक संतोषी मीनाक्षीचा अभिनय, तिचा वक्तशीरपणा, तिच कामाच्या प्रति झोकून देणं त्याला बेहद आवडले होते. इथपर्यंत ठीक होतं. पण हे आवडणं आता प्रेमात परावर्तीत झालं होतं. अर्थात हा सर्व एकतर्फी मामला होता. एकदा धीर एकवटून त्याने तिला चक्क लग्नाची मागणी घातली. आता मीनाक्षी पार गोंधळून गेली. तिने त्या नजरेनं त्याच्याकडे कधी बघितलंच नव्हतं. मामला गंभीर होता. पण मीनाक्षी त्याला नम्र नकार दिला. संतोषी त्या वेळी ‘दामिनी’ची जुळवाजुळव करीत होता. त्याच्या नजरेसमोर मीनाक्षी शिवाय दुसरे कुठलेच नाव नव्हते. आता या बदललेल्या सि्च्युएशनमध्ये ती काम करेल का? हा त्याच्या पुढे प्रश्न होता.
पण मीनाक्षीने व्यावसायिक विचार केला आणि चित्रपटाकरीता होकार दिला. सिनेमाचे रीतसर शूटींग सुरू झाले पण आता त्यांच्या नात्यात तणाव आला होता. रीटेकचे प्रमाण वाढत होते. अशा परीस्थितीचा फायदा घ्यायला हितचिंतक तयार असतातच काहींनी निर्मात्याचे कान भरले. परिस्थिती इतकी टोकाला गेली की, एके दिवशी निर्माते मोराणी बंधूनी मीनाक्षीला सिनेमातून काढून टाकले! वर तिच्याकडे नुकसान भरपाई मागितली.’मी कां म्हणून नुकसान भरपाई द्यायची? मी काही आपण हून सिनेमा सोडलेला नाही. उलट मला सिनेमातून काढून टाकले आहे!’असं तिचं म्हणणं होतं. भांडण थेट एफ एम सी (फिल्म मेकर्स कंबाइन) कडे गेलं. त्यांनी दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि मीनाक्षीच्या बाजूने निर्णय दिला. बर्याच चर्चेनंतर पुन्हा एकदा ती सिनेमात आली आणि शूटींग परत सुरू झालं. (Damini Movie)
सनी देओल आणि अमरीश पुरी यांचे कोर्टातील सीन्स जबरदस्त होते. ‘तारीख पे तारीख’ हा डॉयलॉग आजही लोकप्रिय आहे. सर्वात अप्रतिम अभिनय मीनाक्षीचा होता.दामिनी म्हणजे चमकणारी विद्युलता. हिची भूमिका अशीच चमकती होती. सिनेमाचे एवढे रामायण होवूनही तिने त्याचा परीणाम आपल्या अभिनयावर होवू दिला नाही. तिने साकारलेली ’दामिनी’ (Damini Movie) भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट नारी व्यक्तीरेखेत गणली गेली.
=======
हे देखील वाचा : आर के बाहेरचा राजकपूर
=======
पण तिच्या या अभिनयावर पारितोषिकाची मोहर मात्र उठू शकली नाही. फक्त याचाच परीणाम नाही म्हणता येणार, पण १९९६ साली ‘घातक’ हा सिनेमा केल्या नंतर टॉपवर असताना तिने सिनेमातून संन्यास घेतला आणि हरीष मैसुरे सोबत लग्न करून दूर अमेरीकेत स्थायिक झाली. मीनाक्षी सिनेमात येण्यापूर्वी १९८१ सालची मिस इंडीया होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मीनाक्षीला डावलून त्या वर्षी ती पारीतोषिके मिळाली तरी कुणाला? तर फिल्मफेअर मिळाले जूही चावलाला ’हम है राही प्यार के करीता’ तर नॅशनल अॅवार्ड मिळाले डिंपल कपाडीयाला ’रूदाली’ करीता!