तीन जीवलग मित्रांवर आधारित ‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
मराठी सिनेसृष्टित आता वेगवेगळ्या धाटणीचे अणि वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे येऊ लागले आहेत. आता लवकरच एक मैत्रीवर आधारित असलेला नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन जीवलग मित्र एक केस कशी ‘अफलातून’ रीत्या हाताळतात याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखदार कार्यक्रमात प्रकाशित झाला. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा चित्रपटाचे निर्माते आहेत. तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर पात्रांचा मजेशीर अंदाजही पहायला मिळतोय.
प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट असून ‘अफलातून’ मज्जा घ्यायची असेल तर चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं. प्रत्येक कलाकाराच्या सळसळत्या ऊर्जेचं दर्शन ‘अफलातून’ चित्रपटातून दिसणार आहे. श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत.
छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सी यांचे आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे.
=========================
हे देखील वाचा: २८ जुलैपासून लागू होणार मनोरंजनाची ‘आणीबाणी’…
=========================
वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए.ए.फिल्म्सने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहेत.‘अफलातून’ हा सिनेमा २१ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.