गोल्फ कॅप न वापरल्यामुळे चित्रपट चक्क फ्लॉप झाला?
आपल्या सिनेमातील लोक बऱ्यापैकी अंधश्रद्धाळू असतात. हाच दिवस, हाच वार, हेच कपडे, हेच भगवान… अशा सगळ्या गोष्टींवर त्यांची प्रचंड श्रद्धा असते आणि त्यातील कुठली जरी गोष्ट थोडी मागेपुढे झाली की, त्यांना अपयशाची भीती वाटत असते! आणि हे केलं नाही म्हणून पराभूत झालो असा समज ते करून घेतात. असे खूप काही किस्से या माया नगरीत ऐकू येत असतात. आज जो किस्सा मी आपल्या सोबत शेअर करणार आहे; तो अभिनेता राजेश खन्नाच्या एका टोपी बाबतचा आहे. ही टोपी साधीसुधी नव्हती तर गोल्फ कॅप होती. या गोल्फ कॅपमुळे (Golf cap) आपला चित्रपट यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते आणि ही कॅप त्यांना न मिळाल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला असे त्यांना कित्येक वर्ष वाटत होते! कोणती होती गोल्फ कॅप? कोणता होता हा सिनेमा? आणि काय होता हा किस्सा?
१९७८ साली तमिळ भाषेमध्ये ‘सिंगाप्पू रोजाक्कल’ हा चित्रपट बनला होता. या चित्रपटाचा नायक होता कमल हसन आणि नायिका होती श्रीदेवी. या सिनेमातील नायक एक सायको किलर असतो. तमिळमध्ये हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या सिनेमाचे दिग्दर्शक होते भारती राजा. या सिनेमांमध्ये कमल हसनने एक विशिष्ट कॅप वापरली होती. ही कॅप गोल्फ कॅप (Golf cap) प्रमाणेच होती. यातील कमल हसन अटायर जबरदस्त होता. त्याने या सिनेमासाठी एक विशिष्ट गॉगल देखील वापरला होता. सिनेमा तामिळमध्ये प्रचंड हिट झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक भारती राजा यांना असे वाटले की, ही लोकप्रियता आपण मेन स्ट्रीम म्हणजे हिंदीमध्ये देखील कॅश करू शकतो. त्यांनी हा चित्रपट हिंदीमध्ये रिमेक करायचे ठरवले. सिनेमाचे नाव ठरले ‘रेड रोज’!
यासाठी हिंदीमध्ये त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना याची निवड केली. त्याच्या सोबतीला पूनम धिल्लनला घेतले. राजेश खन्ना देखील पुन्हा एकदा कम बॅक करण्यासाठी उत्सुक होता. त्याला असे वाटले हा चित्रपट आपला नक्कीच पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल. यासाठी त्याने कुठलीही कसर न ठेवायचे ठरवले. त्याने तमिळ सिनेमाचे पारायण केले. या सिनेमाच्या लोकप्रियतेमध्ये कमल हसनच्या गोल्फ कॅपचा (Golf cap) मोठा वाटा आहे असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे हीच कॅप आपण हिंदी सिनेमात वापरायचे असे त्यांनी ठरवले. त्यामुळे चित्रपटाच्या मुहरतच्या आधी त्याने फोन करून कमल हसनला ती कॅप मुंबईला पाठवून द्यायला सांगितले. त्यावेळी काही कुरियर वगैरे प्रकार आपल्या देशात नव्हता. तेव्हा कमल हसनने त्याच्या एका मित्राला ही कॅप घेऊन मुंबईला पाठवले आणि जाताना त्याने मित्राला सांगितले,” ही अतिशय महत्त्वाची वस्तू तुझ्यासोबत देत आहे. ही कॅप घालूनच राजेश खन्ना हिंदीमध्ये काम करणार आहे. त्यामुळे ही कॅप खात्रीने तू राजेश खन्ना कडेच दे!” असे म्हणून ती कॅप त्याने त्या मित्रासोबत मुंबईला पाठवून दिली.
नंतर राजेश खन्नाने कमल हसनला देखील या सिनेमाच्या मुहूर्तासाठी निमंत्रित केले. कमल हसन म्हणाला, ”तिथे माझे काय काम?” पण नंतर त्याने विचार केला की, एवढा मोठा सुपरस्टार आपल्याला बोलवत आहे आपण जाणे गरजेचे आहे. म्हणून मुहूर्तच्या आदल्या दिवशी तो मुंबईत पोहोचला. दुसऱ्या दिवशी मुहूर्तासाठी जेव्हा कमल हसन सेटवर गेला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले, कारण राजेश खन्नाच्या डोक्यावर वेगळीच कॅप होती!! राजेश खन्ना कमल हसनवर खूप चिडला म्हणाला,” जर तू स्वतः येणार होता तर कॅप स्वतःच घेऊन यायची. त्या मित्रासोबत पाठवायची काय गरज होती?” कारण ती कॅप राजेश खन्ना पर्यंत पोहोचली नव्हती. तो मित्र ती कॅप घेऊन गायब झाला. राजेश खन्नाने झापल्यामुळे कमल हसनचा देखील मूड गेला. परंतु त्या अवस्थेत त्यांनी सिनेमाचा मुहूर्त पार पाडला. (Golf cap)
पण राजेश खन्नाची ती कॅप (Golf cap) न मिळाल्याने प्रचंड चिडचिड होत होती. तो काळ काही मोबाईल गुगलचा नव्हता त्यामुळे मित्राला ट्रॅक करणे अशक्य होते. काही दिवस दोघांनी प्रयत्न केला पण नंतर नाद सोडून दिला. तो मित्र आणि ती गोल्फ कॅप पुन्हा कधीच मिळाली नाही! राजेश खन्नाने या चित्रपटात तशीच एक कॅप वापरली आहे. ती कॅप जरी तशीच असली पण ती कमल हसनची कॅप नव्हती. त्यामुळे थोडी निगेटिव्हिटी घेऊनच राजेश खन्नाने चित्रपट केला. चित्रपट प्रदर्शित झाला पण पहिल्या आठवड्यातच पडला! प्रेक्षकांना राजेश खन्नाची ही निगेटिव्ह भूमिका अजिबात आवडली नाही. कायम नायिकेसोबत रोमँटिक भूमिका करणार राजेश खन्ना त्यांना माहित होता त्यामुळे त्याची अशी सायको किलर निगेटिव्ह भूमिका प्रेक्षकांनी अजिबात पसंत केली नाही.
=====
हे देखील वाचा : दिलीप कुमारने दिलेला स्वेटर धर्मेंद्रने आजही ठेवलाय जपून…
=====
चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही. सिनेमा प्रेक्षकांना जरी आवडला नसला तरी समीक्षकांनी मात्र त्याचे नावाचे चांगले कौतुक केले होते. आज आपण जेव्हा youtube वर हा सिनेमा बघतो त्यावेळी आपल्याला देखील हा सिनेमा चांगलाच वाटतो पण त्यावेळच्या प्रेक्षकांची टेस्ट कदाचित वेगळी होती. त्यांनी राजेश खन्नाला या भूमिकेमध्ये स्वीकारले नाही. राजेश खन्ना मात्र कायम आपल्याला कमल हसनची ती कॅप मिळाली नाही म्हणून हा चित्रपट फ्लॉप झाला असे समजत होता! जाता जाता या रेड रोज सिनेमाला प्रचंड अपयश मिळाले तेव्हा मुंबईच्या एका दैनिकाने याचे परीक्षण लिहिताना ‘रेड रोज: रोज रडे!” असे केले होते!