‘के’ पासून का असतात राकेश रोशन यांच्या सिनेमांची नाव
हिंदी सिनेमाच्या गोल्डन इरा मधील संगीतकार रोशन यांचं वयाच्या पन्नासाव्या वर्षी १९६७ साली अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा राकेश रोशन (Rakesh Roshan) चित्रपटात अभिनय करण्यासाठी आला तर दुसरा मुलगा राजेश रोशन हिंदी चित्रपटाचा संगीतकार बनला. आपल्या वडिलांचं कर्तृत्व दोन्ही मुलांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आले होते आणि दोघांनी आपल्या वडिलांचे नाव खऱ्या अर्थाने ‘रोशन’ केलं! अभिनेता राकेश रोशन यांना नायक म्हणून तसं फारसं मोठं कधी यश मिळालं नाही पण तरी सत्तरच्या दशकामध्ये त्यांनी सर्व आघाडीच्या अभिनेत्रीसोबत चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. अगदी हेमा मालिनी सोबत त्याचा ‘पराया धन’ हा चित्रपट आला होता.
सत्तरच्या दशकामध्ये राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचे ठरवले त्यांचा पहिला चित्रपट होता ‘आप के दिवाने’ हा संगीतमय चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवीला सोबत घेऊन त्यांनी ‘जाग उठा इंसान’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. याचे दिग्दर्शक के विश्वनाथ होते. या चित्रपटाची जाहिरात स्क्रीन या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाली. ही जाहिरात पाहून राकेश रोशनच्या एका चाहत्याने त्यांना एक पत्र पाठवले आणि त्यात असे लिहिले की,” तुम्ही तुमच्या चित्रपटाचे शीर्षक ‘के’ या अक्षराने सुरू करा कारण हे अक्षर तुमच्यासाठी लकी आहे. तुमचे आधीचे सुपरहिट सिनेमे पाहा. जे सर्व के या आद्याक्षराने सुरू झाले होते. जसे ‘खेल खेल मे’, ’ खानदान’, ’खट्टा मिठा’, ’खूबसूरत’ कामचोर…” राकेश रोशनने या फॅन लेटर कडे फारसे लक्ष दिले नाही आणि चित्रपट ‘जाग उठा इंसान’ याच टायटलने रिलीज केला. भरपूर मेहनत घेतलेला चित्रपट सुपर फ्लॉप झाला.
पण राकेश रोशन (Rakesh Roshan) एक व्यावसायिक निर्माता असल्याने त्याला त्याचे काही वाटले नाही. त्याने आपल्या सासऱ्याच्या सोबत पुढच्या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. हा चित्रपट होता ‘भगवानदादा’ या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांचे सासरे जे ओम प्रकाश यांनी केलं होतं. या सिनेमात रजनीकांत आणि श्रीदेवी असे टॉपचे स्टार होते. सर्व काही योग्य असून देखील हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अक्षरशः एक आठवड्यात भुईसपाट झाला! आता मात्र राकेश रोशनला (Rakesh Roshan) खूप आश्चर्य वाटले. कारण श्रीदेवी तेव्हा टॉपची अभिनेत्री बनली होती. रजनीकांत होता. जे ओम प्रकाश सारखा मुरब्बी दिग्दर्शक होता. असं असून देखील हा चित्रपट फ्लॉप होतो हे राकेश रोशनला पटले नाही. यानंतर त्याने जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, भानुप्रिया आणि अमृता सिंग यांना घेऊन पुढचा चित्रपट सुरू केला. हा चित्रपट बनवताना त्याला खूप अडथळे आले. आता मात्र चित्रपटाचे टायटल ठरवताना त्याने आपल्या फॅनच्या लेटरचा विचार केला आणि सिनेमाला टायटल दिले ‘खुदगर्ज’. सिनेमा रिलीज झाला आणि सुपरहिट ठरला. त्या फॅनचे पुन्हा एकदा पत्र राकेश रोशन यांना आले आणि त्यांनी सांगितले,” मला आनंद वाटला तुम्ही माझी सूचना मान्य केली आणि सिनेमाचे टायटल ‘K’ या अक्षराने सुरु केले. बघा , सिनेमा सुपरहिट झाला !
======
हे देखील वाचा : गोल्फ कॅप न वापरल्यामुळे चित्रपट चक्क फ्लॉप झाला?
=====
आता यापुढे तुम्ही कृपया तुमच्या चित्रपटाचे टायटल ‘के’ पासून सुरु करा! हिट सिनेमाची रांग लागेल.” राकेश रोशन यांनी विचार केला आपल्या चित्रपटाला कुठलं तरी शीर्षक द्यायचा आहेच मग के पासून का नको? अशा पद्धतीने त्या फॅनच्या एका सूचनेमुळे राकेश रोशन यांनी पुढच्या सर्व चित्रपटांच्या टायटल्स के पासून सुरु केले आणि यातील बहुतांश चित्रपट यशस्वी ठरले. किशन कन्हैया, खेल, करण अर्जुन, कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश, काबिल…. फक्त ठरला फक्त अपवाद ठरले ‘किंग अंकल’ आणि ‘कोयला’ या चित्रपटाचा. ‘कोयला’ हा चित्रपट खरंतर शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांना घेऊन त्याने बनवला होता. अमरीश पुरी यांची जबरदस्त भूमिका यामध्ये होते. परंतु या सिनेमाला देखील यश मिळाले नाही. १९९९ साली राकेश रोशन (Rakesh Roshan) यांचा मुलगा ऋतिक रोशन सिनेमात आला त्याच्या पहिल्याच चित्रपटाचे टायटल होते ‘कहो ना प्यार है’ रितिकचे हर एक सिनेमा सुपरहिट होत गेले. (पण ‘काईट’ हा सिनेमा मात्र फ्लॉप ठरला.)
अशा तऱ्हेने काही अपवाद वगळता राकेश रोशन ‘क’ च्या बाराखडी ने सुरू केलेले चित्रपट बनवत राहिले आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता दिग्दर्शक बनले!