धर्मेद्रमुळे ठरला ‘हा’ चित्रपट सुपरहिट
थेटरात (थिएटरमध्ये हो) पिक्चरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच लागलेला फुलांचा हार घातलेल्या हाऊसफुल्लच्या फलकाचा मुक्काम वाढत जाताना, तो कायमच असतानाच पटकथाकार, डायलॉग रायडर, वितरक, फायनान्सर, निर्माता व दिग्दर्शकांना एका गोष्टीची लागण लागते, त्या सुपर हिट पिक्चरमधील रोलनुसार (भूमिकेनुसार) अनेक कलाकारांना भूमिका ऑफर होणे हे एकेकाळचे फिल्मी सत्य (रिॲलिटी शो) होता. ‘बेईमान’मध्ये नाझनीनने मनोजकुमारची बहिण साकारताच तिला तशाच बहिणीच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. (Super Hit Movie)
ओ. पी. रल्हन दिग्दर्शित ‘फूल और पत्थर'(१९६६) च्या पोस्टरवरचा आजारी मीनाकुमारीच्या शेजारीच उभा असलेला उघड्या निधड्या पिळदार छातीच्या धर्मेंद्र फार लक्षवेधक ठरला आणि मग पिक्चर रिलीज होताच फर्स्ट शोपासूनच सुपर हिट ठरल्यावर यात धर्मेंद्रने साकारलेल्या ‘चोर नायक’ भूमिकेनुसार त्याच्याकडे नवीन पिक्चरची रांगच लागली. तो मनाने चांगला पण मजबूरीने चोर झालाय. अर्थात मग तो सुधारतो या मध्यवर्ती सूत्राभोवती हा चोर नायक असे. कधी पाकिटमार, कधी किंमती हीरे चोरणारा तर कधी दुर्मिळ मूर्ती, वस्तू चोरणे हा त्याचा उद्योग आणि कधी पिक्चरच्या मध्यंतरानंतर ह्रदय परिवर्तन असे धर्मेंद्रचे पिक्चर तर बघा किती, मेरे हमदम मेरे दोस्त, यकीन, आदमी और इन्सान, कब क्यू और कहा, इंटरनॅशनल क्रूक, पाकिटमार, किमत, लोफर, दो चोर, जुगनू , यादों की बारात, शालिमार वगैरे… (Super Hit Movie)
साठच्या दशकात सोबर भूमिका साकारणारा धरम सत्तरच्या दशकात ही मॅन झाला. भारी ताकदवान झाला. मारधाड म्हणजेच अभिनय समजू लागला. त्यात सपोर्ट सिस्टीम देणारा एक ज्युबिली हिट पिक्चर प्रमोद चक्रवर्ती निर्मित व दिग्दर्शित ‘जुगनू’ (मुंबईत रिलीज ३ ऑगस्ट १९७३. मेन थिएटर अलंकार. ज्युबिली हिट). गुलशन नंदा हे एकेकाळचे हिंदी साहित्यिक. त्यांच्या अनेक कादंबरीवर आधारीत पिक्चर आले. ( कटी पतंग वगैरे) कधी त्यांनी चित्रपटासाठी लेखन केले. ‘जुगनू’ची कथा त्यांचीच. सचिन भौमिक यांनी अनेक प्रकारचा मसाला मिक्स करुन त्याची पटकथा लिहिली. ऐहसान रिझवी यांनी डायलॉग लिहिले. बाप के नाम का सहारा कमजोर लोग लेते है हा डायलॉग हमखास टाळ्या वसूल करणारा. आपल्या पब्लिकला पिक्चर पाहतानाच तो ऐकण्यात जास्त आनंद मिळतो. (Super Hit Movie)
थोडक्यात स्टोरी सांगायची तर, कुठे किंमती मूर्तीची चोरी झाली की तेथे चोर ‘जुगनू’ असा सिक्का ठेवून जाई. त्याची ती आपली एक कामाची पद्धत आहे. अशोक राॅय (धर्मेंद्र) याचेच हे नाव प्यारासिंग ‘जुगनू’. तो अशोकच्या रुपात सीमाच्या (हेमा मालिनी) प्रेमात पडतो. दोघे एकमेकांच्या सहवासात रमतात. जुगनूला एके दिवशी आपल्या बाॅसचे (अजित) खरे रुप समजते आणि तो ‘शेवटची थरारक चोरी’ करायचे ठरवतो तेव्हाच तो पोलिसांकडून रेड हॅण्ड पकडला जाण्याची शक्यता असते. यात अनेक लहान मोठ्या गोष्टी घडत बिघडत पिक्चर रंगतदार बनतो. (Super Hit Movie)
धरम व हेमा ही त्या काळातील सुपर हिट लोकप्रिय जोडी. शूटिंग व ॲक्टींग करता करता ते एकमेकांचे व्हायला नेमकी कधी सुरुवात झाली हे तेच जाणोत. त्यात एक महत्वाची पायरी ‘जुगनू’ नक्कीच. विशेषत: हेलिकॉप्टरमधलं प्यार के इस खेल मे दो दिलो के मेल मे या गाण्यात अशोकचे (की धर्मेंद्रचे?) सीमावरचे (की हेमा मालिनीवरचे) उतू गेलेले प्रेम फार चर्चेचा विषय ठरले.
पिक्चरमध्ये धर्मेंद्र, हेमा मालिनी, अजित यांच्यासह प्रेम चोप्रा, मेहमूद, ललिता पवार, जयश्री टी, मनमोहन, नासिर हुसेन, कमल कपूर, धुमाळ इत्यादींच्याही भूमिका. छायाचित्रण व्ही. के. मूर्ती यांचे. तर आनंद बक्षी यांच्या गीतांना सचिन देव बर्मन यांचे संगीत. दीप दीवाली के, जाने क्या पिलाया तुने, गिर गया जुमका, प्यार की इस खेल मे ही गाणी सगळीकडेच हिट. त्या काळात अशा लोकप्रिय गाण्यांमुळे चित्रपट सतत रसिकांसमोर राही. अशा भारी हिट पिक्चरची रिमेक निघाली नसती तरच आश्चर्य होते. १९८० साली तेलगू आणि तमिळ भाषेत ‘गुरु’ नावाने रिमेक आली. (Super Hit Movie)
======
हे देखील वाचा : ‘मेहमान’ पन्नास वर्षांचा झाला…
======
दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती म्हणजे फिल्मवाल्यांचे चक्की. त्यांच्या चित्रपटात ‘नया जमाना ‘मध्ये (१९७१) धर्मेंद्र चक्क कवी होता. एकदम सोबर भूमिका. नायिका हेमा. त्यानंतर त्यांनी लगेचच ‘जुगनू’मध्ये धरमला चोर नायक केला. कारण आता तो त्याच रुपात आवडू लागला होता. याच चक्कीनी हेमा मालिनीच्या आईनी म्हणजे जया चक्रवर्ती निर्मित ‘ड्रीम गर्ल’मध्ये हेमाजींच्या लोकप्रियतेनुसार कथानक रचले, पण रंगले नाही. त्यानंतर ‘आझाद’मध्ये याच जोडीला घेऊन रंगत आणली. म्हणजेच चक्कीच्या चार चित्रपटात धरम हेमा जोडी. त्यात खणखणीत हिट ‘जुगनू’. या गोष्टीला चक्क पन्नास वर्ष झाली देखील.