‘शोले’ च्या प्रसिद्धीचा हा मोठा फंडा
याला बहुतेक योग्य शीर्षक सुचले नाही म्हणून याने ‘शोले…शोले’ चा जप केला असं तुम्हाला वाटेल. पण असा गौरव का करु नये? ज्याच्या प्रदर्शनास तब्बल अठ्ठेचाळीस वर्ष होऊन देखील सतत कोणत्या ना कोणत्या संदर्भात या चित्रपटाचा संदर्भ येतोच त्या पिक्चरचे नाव असं घ्यायलाच हवे. त्या काळात रेडिओ विविध भारतीवर शनिवार व रविवार दुपारी नवीन चित्रपटावर पंधरा मिनिटांचे रेडिओ प्रोग्राम असत. डायलॉग व गाण्याचे मुखडे त्यात असत. अनेकदा तरी अमीन सयानी आपल्या खास शैलीत ते प्रोग्राम खुलवत, रंगवत. श्रोत्यांमध्ये याची क्रेझ होती. ‘शोले’च्या रेडिओ प्रोग्राममध्ये शोले…शोले…शोले असं जोरदार हॅमरिंग होत असतानाचे मला आठवतंय. नवीन चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीचा हा एक फंडा होता. (Shole Movie)
‘शोले’ माझ्या शालेय वयातील पिक्चर १५ ऑगस्ट १९७५ ही रिलीज तारीखही अशी की कागदावर कोरुन ठेवायला नकोच. काही चित्रपट वेगळीच कुंडली घेऊन येतात हेच खरे. मला आठवतय, वृत्तपत्रात ‘शोले’च्या जाहिरातीत म्हटलं होतं, मिनर्व्हा आणि न्यू एक्सलसियर येथे सत्तर एमएम व स्टीरिओफोनिक साऊंड म्हणजे काय तर नेहमीपेक्षा पडदा आणि आवाज खूपच मोठा. नेहमी आपण पस्तीस एमएममध्ये पिक्चर एन्जाॅय करतो. गल्ली चित्रपटात तर सोळा एमएमचा पडदा. या साईजपेक्षा पडद्यावर काय दिसतेय, त्यात आपण गुंततोय, हरवतोय काय, पाहतोय काय हे जास्त महत्वाचे होते. बरं, यापूर्वीचा असा सत्तर एमएमचा पिक्चर कोणता? तेव्हा गुगल हा शब्दच माहित नव्हता. अन्यथा प्रश्न पडेपर्यंत उत्तर मिळतेही. तो साप्ताहिकांचा काळ होता. त्यात माहित झाले की, पांछी दिग्दर्शित ‘अराऊंड द वर्ल्ड’ अर्थात ‘दुनिया की सैर’ (१९६८) हा आपल्याकडील पहिला सत्तर एमएमचा चित्रपट. पण थीममध्ये सत्तर एमएमला आणि मोठ्या आवाजाला वाव हवा. तोच नसल्यानेच हा चित्रपट फ्लाॅप झाला.(Shole Movie)
त्या काळात शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या नवीन चित्रपटाची सोमवारपासून आगाऊ तिकीट विक्री सुरु होई. मिनर्व्हात सकाळी नऊ ते एक आणि दुपारी चार ते सात अशी त्यासाठी वेळ होती. आजच्या डिजिटल तिकीट बुकिंग पिढीला आश्चर्य वाटेल, मिनर्व्हात सकाळी सात वाजल्यापासून रांग लागली आणि वेगाने वाढली. अनेक पिक्चरच्या बाबतीत हेच घडे. कधी एकदा नवीन चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो ला अथवा पहिल्या तीन दिवसांत पाहतोय याची जबरदस्त ओढ असणारे चित्रपट व्यसनी खूपच असत. रांगेत ब्लॅक मार्केटवालेही असत. त्यांना पिक्चरमध्ये किती दम आहे याचा अंदाज अगोदर येई. त्यांचे आपले ढोकताळे असत. अजून एक गंमत म्हणजे, अशी रांग पाह्यला जाण्याचीही जणू प्रथा होती. आम्ही गिरगावातील मुलं हे आवर्जून करायचो. त्यात एक प्रकारचे थ्रील वाटे. अशातच तिकीट दरावर नजर टाकतोय तर धक्काच बसला. अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे तर बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे. एवढे महाग? एक रुपयाने हे दर वाढले असले तरी त्या काळात मध्यमवर्गीयाला मासिक पाचशे सहाशे रुपये पगार होता, त्या अर्थकारणानुसार एक रुपया जास्त देणे मोठीच गोष्ट होती. ‘शोले’ हिट होताच या दरांचेही काहीच वाटेनासे झाले. (Shole Movie)
पहिल्याच दिवशी थिएटरवरचे भव्य दिमाखदार डेकोरेशन पाहणे म्हणजे जणू सणच. पिक्चरनंतर पाहूच हो, डेकोरेशन पाहून समाधान मानूयात अशी एक भावना. मिनर्व्हावरच्या ‘शोले’च्या डेकोरेशनमध्ये मधोमध ठाकूर बलदेव सिंग (संजीवकुमार) यांनी गब्बरसिंग (अमजद खान) याला जबरा कैचीत पकडल्याचा भव्य देखावा. (ठाकूरला या चित्रपटात फ्लॅशबॅकमध्ये हात आहेत.)
त्या काळातील मिडियात ‘शोले’ वर बरीच टीका झाली. प्रचंड हिंसक आहे वगैरे वगैरे. पहिले काही दिवस तर ‘शोले’ फ्लाॅप आहे, पडला पडला असेच म्हटले जाई. पण काही दिवसांतच पिक्चर रसिकांना भारीच आवडू लागले. माऊथ पब्लिसिटीवर गर्दी कायम राहू लागली. मिनर्व्हावर कधीही जावे तर ॲडव्हास बुकिंगला हमखास रांग दिसायची. ‘शोले’च्याच बरोबर रिलीज झालेला ‘गरीब हटाव ‘ हा चित्रपट ‘शोले’च्या वादळात कुठे हरवला ते समजलेच नाही. ‘शोले’च्या लाटेचा फक्त ‘जय संतोषी मां’ (मुंबईत रिलीज ३० मे १९७५) च्या क्रेझला फटका बसला नाही. सगळीकडेच या दोन चित्रपटांच्या सामाजिक सांस्कृतिक प्रभावाची चर्चा जी काही सुरु झाली ती अगदी आजपर्यंत आहे. यश असावे तर असे. पडद्यावरुन चित्रपट उतरला तरी त्याचे अस्तित्व असे अनेक बाबतीत कायम आहे. (Shole Movie)
त्या काळात राज्यातून अथवा देशातून कोणी मुंबईत सुट्टीत नातेवाईकांकडे येत त्यांना गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, राणीचा बाग अशा अनेक गोष्टी दाखवतानाच मिनर्व्हात ‘शोले’ दाखवायची प्रथाच होती. आपल्या देशात अशा ‘छोट्या वाटणार्या मोठ्या गोष्टीं’नी रुजवला. आजही देशातील कानाकोपऱ्यातील गावखेड्यात एकाद्या गोष्टीसाठी कोणी पाण्याच्या टाकीवर चढतोय तोच ही ‘बातमी’ न्यूज चॅनेलवर येते देखील.(Shole Movie)
=======
हे देखील वाचा : धर्मेद्रमुळे ठरला ‘हा’ चित्रपट सुपरहिट
=======
‘शोले’ बद्दल अनेक किस्से, कथा, गोष्टी, दंतकथा अगदी अफवा देखील आजही सातत्याने रंगवून खुलवून सांगितल्या जातात. मिनर्व्हात पहिली तीन वर्ष दिवसा तीन खेळ याप्रमाणे आणि मग मॅटीनीला शिफ्ट करुन आणखीन दोन वर्ष असा एकूण पाच वर्ष मुक्काम केला. हा ‘कागदावरचा हिशोब’ झाला. त्यापलिकडे जाऊन ‘शोले’चा सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रातील प्रवास आणि जबरदस्त प्रभाव आहे. ‘शोले’ न आवडलेले अनेक भेटतात पण ‘शोले’ न पाहिलेला चित्रपट रसिक नसावा. रुपेरी पडद्यावरुन ओटीटीपर्यंत चित्रपट पाहण्याच्या पध्दती बदलत बदलत आल्या. त्यात ‘शोले’ मात्र कायम आहे.