‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेव्हा संजू बाबा ऋषी कपूरला जीवे मारायला धावून गेला होता…
ऋषी कपूरने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या ‘मेरा नाम जोकर‘ (१९७०) मधील भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार बालकलाकार म्हणून होता. नायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता ‘बॉबी’ (१९७३) या चित्रपटात भूमिकेसाठी ऋषीला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. डिंपल कपाडियासोबतचा ‘बॉबी’ दणकून चालला पण या चित्रपटाच्या दरम्यानच तिने राजेश खन्नासोबत लग्न केल्यामुळे ही जोडी काही पुढे प्रेक्षकांना पाहायला मिळाली नाही. पण पुढे दहा वर्षानंतर रमेश सिप्पी यांनी डिंपलच्या पुनराग मनासाठी ‘सागर’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि पुन्हा एकदा ऋषी कपूर आणि डिंपलही जोडी जमली! (Rishi Kapoor)
दरम्यानच्या काळात ऋषी कपूरची (Rishi Kapoor) खरी जोडी जमली नीतू सिंह सोबत. १९७४ ते १९८० या सहा वर्षात त्यांचे तब्बल बारा सिनेमे प्रदर्शित झाले. जहरीला इन्सान, जिंदा दिल, खेल खेल में, रफू चक्कर,कभी कभी, अमर अकबर अन्थानी, दूसरा आदमी, अंजाने में, झूठा कही का, दुनिया मेरी जेब में,धन दौलत… आणि सर्व सिनेमे हिट झाले. या काळातच त्यांच्या रियल लाईफ मधील प्रेम कहाणीला देखील चांगलाच बहर आला होता. ऋषी कपूरची पडद्यावरची इमेज कायम चॉकलेट बॉयची होती. त्यामुळे रोमँटिक सिनेमांचा तो आघाडीचा नायक होता. मस्त मस्त रंगीबेरंगी स्वेटर घालून काश्मीरच्या नयनरम्य वातावरणात तो नायिकांच्या भोवती रुंजी घालत प्रेम गीते साकारत होता. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस त्याची जोडी आणखी एका अभिनेत्रीसोबत जमली ती म्हणजे टीना मुनीम! या अभिनेत्रीसोबत त्याने सहा चित्रपट केले. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘आपके दिवाने’. यानंतर सुभाष घई यांच्या ‘कर्ज’ या चित्रपटाने तर इतिहास घडवला. आजही हा सिनेमा कल्ट क्लासिक म्हणून लोकप्रिय आहे. त्यानंतर दिदार-ए- यार, कातिलों के कातिल, बडे दिलवाला असे अनेक चित्रपट त्यांचे येत होते. त्या काळातील गॉसिप्स मॅगझीम मधून ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्या बद्दल तिखट मीठ लावून खमंग बातम्या पेरल्या जात होत्या. अर्थात हा सर्व एक प्रकारे पेड प्रमोशनचाच भाग होता.
या काळातच सुनील दत्त आणि नर्गिस यांचे चिरंजीव संजय दत्त यांच्यासाठी ‘रॉकी’ या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या सिनेमात संजूबाबाची नायिका टीना मुनीम होती. संजूबाबा पहिल्याच चित्रपटात आपल्या नायिकेच्या प्रेमात पडला होता आणि तो टीना बाबत बऱ्यापैकी पझेसिव्ह झाला होता. या काळातच त्याला अंमली पदार्थाच्या सेवनाची सवय लागली. त्यामुळे तो कायम त्याच नशेच्या अधीन असायचा. एकदा त्याला एका फिल्मी मॅगझिनमध्ये ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि टीना मुनीम यांच्या प्रेमप्रकरणाबाबत गॉसिप्स वाचायला मिळाले. आधीच डोक्यात नशेचा अंमल असल्यामुळे तो प्रचंड संतापला.
‘रॉकी’ चित्रपटातील त्याचा कोस्टार गुलशन ग्रोवर याला घेऊन तो चक्क ऋषी कपूरला मारण्यासाठी धावून गेला! ऋषी कपूर (Rishi Kapoor) नीतू सिंगच्या पालीहिलच्या घरी आहे असे कळल्यानंतर त्याने रागाच्या भरात आपला मोर्चा तिच्या घराकडे वळवला. गुलशन ग्रोवर आणि संजय दत्त दोघेही नशेत असताना नीतू सिंगच्या पाली हिलच्या घरी गेले. अर्वाच्य शिवीगाळ करत ऋषीचा ठाव ठिकाणा विचारू लागले. नीतू सिंगने संजय दत्तचा रागरंग ओळखला. तिने प्रथम त्याला शांत केले आणि त्याला समजावून सांगितले, ” तू समजतो तसे काहीही नाही. ऋषी कपूर आणि टीना म्हणून हे दोघे चांगले मित्र आहेत. सिनेमाच्या दुनियेत तू नवीन आहेस. तुला अशा बातम्यांची आता सवय करायला पाहिजे. अशा बातम्या ह्या फक्त गॉसिप्स म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायला शिक. विनाकारण डोक्यात काही राग घालून घेवू नकोस. पुढच्या महिन्यातच मी ऋषी कपूरसोबत (Rishi Kapoor) लग्न करत आहे! त्यामुळे त्याच्या बाबतचा डोक्यातील राग काढून टाक आणि शांतपणे घरी जा!”
==========
हे देखील वाचा : एका हिंदी सिनेमाच्या गाण्याने झाला या गार्डनचा कम्प्लीट मेक ओव्हर!
==========
नीतू सिंगच्या त्या समजावण्याने संजूबाबा भानावर आला आणि तिची माफी मागून तो तिथून निघून गेला. संजू बाबाला शांतपणे समजावले म्हणून मोठा अनर्थ टळला नसता संजू बाबाने काय केले असते देव जाणे! पुढे २२ जानेवारी १९८० या दिवशी ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचे लग्न झाले. यानंतर संजय दत्त आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) ज्या ज्या वेळी परस्परांना भेटले त्या त्या वेळी ही आठवण काढून मनमुराद हसले. पुढे अनेक वर्षांनी ‘अग्निपथ’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र भूमिका केल्या होत्या. ऋषी कपूर याने त्याच्या आत्मचरित्रात ‘खुल्लम खुल्ला’ या चित्रपटात या पुस्तकात ही आठवण लिहिली आहे.