दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
तेलगी घोटाळा – तमन्ना भाटीया कनेक्शन !
दक्षिण भारतातील एक ट्रॅव्हल एजन्ट बनावट कागदपत्रांद्वारे लोकांना अरब देशांमध्ये पाठवत असताना पकडला जातो. जेलमध्ये त्याची भेट सरकारी स्टॅम्प वेंडर राम रतन सोनी यांच्याशी होते. त्या जेलमध्ये मग आखला जातो भारतातील त्या काळातील सर्वात मोठा घोटाळा ! सरकारी यंत्रणा, अधिकारी, राजकारणी यांच्या संगनमताने ३२ हजार कोटींचा स्टॅम्प घोटाळा केला गेला. हा ट्रॅव्हल एजेंट होता अब्दुल करीम तेलगी ! (Tamannaah Bhatia)
हा सर्व घोटाळा व्यवस्थित शांततेत सुरु असताना तेलगीच्या एका चुकीच्या कृतीमुळे उघडकीस आला. ती चूक म्हणजे अंधेरीच्या लेडीज बारमध्ये बारबालेवर रात्रीत ९६ लाख रुपये उधळणे. तेलगीला अटक झाली आणि मग चौकशी सुरु झाली. चौकशीत जी काही माहिती उघड झाली ती अतिशय धक्कादायक होती. अनेक बड्या अधिकाऱ्यांची, राजनेत्यांची नावे समोर आली. तेलगीच्या कमाईचे आकडे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तेलगीची फिल्म क्षेत्रातील गुंतवणूक देखील समोर आली. या सर्व गोष्टींमुळे या घोटाळ्याची मुळे कुठपर्यंत गेली होती हे समजून येते. (Tamannaah Bhatia)
नुकतीच ‘स्कॅम २००३’ नावाची वेबसिरीज रिलीज झाली आहे. या निमित्ताने घोटाळ्याच्या संबंधित अनेक गोष्टींना उजाळा मिळाला. यातील खूप कमी लोकांना माहित असलेली माहिती म्हणजे प्रसिद्ध दाक्षिणात्य आणि आता सध्या हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे सुद्धा या सर्वांमध्ये नाव आले होते. तुम्हाला सुद्धा वाचून धक्का बसला ना ? आता हे सर्व कसे झाले ? (Tamannaah Bhatia)
तेलगीच्या चौकशीत जेव्हा त्याचे बारबालांबरोबरचे संबंध समोर आले तेव्हा एका बारबालेच्या नावाला खूप प्रसिद्धी मिळाली तिचे नाव होते तरन्नुम. ही तीच जिच्यावर तेलगीने एका रात्रीत ९६ लाख रुपये उधळले होते. त्यावेळी ती देशातील सर्वात श्रीमंत बारबाला बनली होती. तरन्नूमने हे पैसे क्रिकेट सट्टेबाजीत लावले आणि त्यात गमावून बसली होती. पुढे तिला सट्टेबाजीसाठी अटक देखील करण्यात आली होती. सामान्य लोकांमध्ये सुद्धा ही तरन्नुम कशी दिसते म्हणून कुतुहूल जागे झाले होते याच कुतुहलावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या न्यूज मीडियाने तिच्यात खूप इंटरेस्ट घेतला होता.
मग त्यांनी तिच्याबद्दलच्या मसालेदार बातम्या छापायला चालू केले उदा. अशी कोण आहे तरन्नुम जिच्यावर तेलगी एवढा भाळला ? किंवा या सर्व घोटाळ्यात अधिकारी आणि राजकीय व्यक्तींसोबत काही क्रिकेटर्सची नावे समोर आली होती ज्यात मुथय्या मुरलीधरनचे नाव समोर आले होते मग हा धागा पकडून सुद्धा मीडियाने बातम्या दिल्या होत्या की असे काय आहे या तरन्नुममध्ये की जिच्यावर क्रिकेटर्स आणि राजकारणी फिदा आहेत? या मसालेदार बातमी सोबत एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. जसे आता व्हाटसऍपमधून कोणतीही गोष्ट वायरल केली जाते तसे त्याकाळी अशा मसालेदार बातम्या ईमेल्स, ऑर्कुटमधून वायरल केल्या जायच्या. जो फोटो तरन्नुमचा म्हणून देण्यात आला होता तो होता आताची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाचा ! (Tamannaah Bhatia)
==========
हे देखील वाचा : चित्रपटसृष्टीतील आठवणीतला श्रीगणेशोत्सव…
==========
तमन्ना (Tamannaah Bhatia) त्यावेळी १६-१७ वर्षांची होती आणि तिने २००५ साली ‘चांद सा रोशन चेहरा’ या हिंदी फिल्मद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. या मसालेदार बातम्यात जो तमन्नाचा फोटो वापरला गेला होता तो तिने “श्री” या दाक्षिणात्य फिल्मच्या प्रमोशनवेळी काढलेला होता. तमन्ना आणि तिच्या घरच्यांना करियरच्या सुरुवातीला अशा प्रकारची बातमी मनस्ताप देणारी ठरली. त्यांनी या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि या सर्व प्रकारला आळा बसवावा म्हणून विनंती केली. अतिउत्साही पत्रकारांच्या बेपर्वा वागणुकीमुळे कोण्या निरपराध व्यक्तीवर काय वेळ येऊ शकते या बद्दलचा हा किस्सा !!