‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
वाघाच्या तावडीतून ‘या’ अभिनेत्याने वाचवले राखीचे प्राण
अलीकडच्या काही वर्षात ऍनिमल राइट्सचे महत्व खूप वाढले आहे आणि ते गरजेचे आहे. आता कोणत्याही माध्यमातून पशुकडून काही कामे करून घ्यायचे असतात तर त्याला काही स्टॅंडर्ड नॉर्म्स सेट केलेले आहेत. पूर्वी सर्कस आणि चित्रपटातून प्राण्यांकडून काम करून घेतले जायचे आणि त्यांना अतिशय वाईट पद्धतीने वागवले जायचे. परंतु अलीकडच्या काळात शासनानेच काही नियम घालून दिलेले आहेत त्यामुळे प्राण्यांचे अधिकार जतन केले जातात. आज जेव्हा आपण जुने चित्रपट बघतो त्यावेळी आपल्याला प्रकर्षाने वाटते की, खरोखरच त्याकाळात जर हे नियम असते तर अशा पद्धतीने यांना चित्रीकरण करता आले असते का? या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळी अनेकदा अपघात देखील घडायचे त्याची त्या वेळे पुरती चर्चा होत असे. (Rakhi)
आपण जेव्हा आता जुने चित्रपट विषय मासिके पाहतो तेव्हा काही त्यातील काही असे किस्से आपल्याला पुन्हा एकदा वाचायला मिळतात. खरं तर आपण ते पार विसरून गेलेलो असतो. चित्रपट जर फ्लॉप असेल तर त्यावर फारशी काही चर्चा होत नाही, काही वर्षानंतर तो सिनेमा लोक विसरून देखील जातात. पण अशा फ्लॉप चित्रपटांमध्ये देखील काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स असतात. मागच्या आठवड्यात असेच जुने हिंदी फिल्मी मासिक चालताना हा किस्सा वाचण्यात आला. १९७२ साली शशी कपूर आणि राखी यांचा एक चित्रपट आला होता ‘जानवर और इंसान’. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते तापी चाणक्य आणि निर्माते होते चिन्नप्पा देवर. याच निर्मात्यांनी राजेश खन्नाला घेऊन ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट बनवला होता. खरंतर या चित्रपटाचा नायक देखील आधी राजेश खन्ना ठरला होता. परंतु त्याच्या व्यस्त शेड्यूलमुळे शशी कपूरची या चित्रपटात वर्णी लागली. या चित्रपटांमध्ये एका वाघाने देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.(Rakhi)
चित्रपटाच्या कथानकात एक वाघ एका गावाला कायम त्रास देत असतो. चित्रपटाचा नायक शशी कपूर एकदा या वाघासोबत मुकाबला करतो. तो त्याला ठार मारण्यासाठी गोळ्या घालतो. परंतु वाघ जखमी अवस्थेतच तिथून पळून जातो आणि तिथून पुढे तो डूख धरून पुन्हा पुन्हा गावात येऊन शशी कपूरला शोधत असतो. संपूर्ण चित्रपट भर या दोघांचा हा संघर्ष चालू राहतो. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान एकदा शशी कपूरने अभिनेत्री राखीचे प्राण वाचवले होते. याच वाघाच्या तडाख्यात ती सापडली होती पण शशी कपूरने तिचे प्राण वाचवले होते. रील लाईफ मधील या प्रसंगात खरोखर आपला जीव धोक्यात घालून रियल लाईफमध्ये शशी कपूर ‘हिरो’ ठरला होता.(Rakhi)
हा किस्सा त्याकाळच्या फिल्मी मासिकातून आला होता. चित्रपटातील या प्रसंगात राखीचा पाठलाग हा जखमी वाघ करत असतो. चित्रपटात खरंतर अशा प्रसंगांमध्ये बॉडी डबल किंवा स्टंटमन किंवा स्टंट वुमन यांचा वापर होतो. परंतु त्या दिवशी नेमकी स्टंट वुमन न आल्यामुळे राखीला (Rakhi) ती भूमिका करावी लागली. राखी खूप नर्वस झाली होती, खूप घाबरली होती. परंतु युनिट मधील सर्वांनी तिला धीर दिला.
=========
हे देखील वाचा : तब्बल १४ वर्षांनी शत्रुघ्न सिन्हाने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केले!
=========
त्या वाघाचे तोंड एका टेपने आणि दोरीने घट्ट बांधले गेले आणि नंतरच चित्रीकरण सुरू झाले. या शॉटमध्ये राखीला पळत पळत जाऊन खड्ड्यात पडायचे असते आणि वाघ तिच्या मागे मागे एका झाडापाशी तिची वाट पाहत असतो असा प्रसंग होता. परंतु झाले विपरीतच. ठरल्याप्रमाणे राखी (Rakhi) पळत पळत येऊन त्या खड्ड्यात पडली आणि पाठोपाठ वाघ देखील त्या झाडापाशी थांबायच्या ऐवजी तो देखील त्या खड्ड्यात येऊन पडला! आता मात्र सर्वांचे तोंडचे पाणी पळाले. कारण वाघाचे तोंड जरी बंद असले तरी त्याच्या हाताचे पंजे शाबूत होते युनिटमध्ये एकच ओरडा ओरडा झाला. सर्वजण प्रचंड घाबरले होते. परंतु शशी कपूरने हिमतीने त्या खड्ड्यात उडी मारून राखीला तेथून बाजूला काढले आणि राखीचे प्राण वाचवले! असे म्हणतात की तो वाघ खड्ड्यात पडताना त्याचे डोके एका दगडावर आपटले आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. राखीला भोवळ आली होती. अशाप्रकारे ही हि मॅन स्टंट मॅन अशी कुठलीही ख्याती नसलेल्या शशी कपूरने प्रत्यक्ष वाघाच्या तावडीतून राखीला वाचवले!