‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘चांदनी’ या चित्रपटात विनोद खन्नाची जबरदस्त एन्ट्री
रोमँटीक सिनेमाचे बादशहा यश चोप्रा यांना साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये चांगले चित्रपट प्रेक्षकांपुढे आणले. ऐंशीच्या दशकात मात्र त्यांचे चित्रपट चांगले बनत असूनही व्यावसायिक यश मात्र काही केल्या मिळत नव्हते. या दशकात त्यांच्या नाखुदा, सवाल, फासले, विजय या चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर फारसा दम धरला नाही. अमिताभचा ‘सिलसिला आणि दिलीपकुमारचा ‘मशाल’ यांना थोडे बहुत यश मिळाले. पण चोप्रांची जादू हरवली की, काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला. ही कोंडी फोडली १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘चांदनी’ या चित्रपटाने.या सिनेमाच्या मेकिंगची कहाणी भन्नाट आहे. (Vinod Khanna)
एकदा ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर यश चोप्रा आपल्या कारमधून मुंबईच्या रस्त्यावरून फिरत होते. तेव्हा रस्त्यावरच्या डीव्हायडर वरील चित्रपटाच्या होर्डिंगची रांग त्यांना दिसली. त्यात त्यांनी असे नोट केले की, जवळपास सर्व सिनेमे हे मारधाडीचे आहेत. तो काळ केवळ ॲक्शनपटांचा होता. सर्वत्र मारधाड, हिंसाचार असेच सिनेमे रिलीज होत होते. प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हळुवार कथानकाचे चित्रपट गेले कुठे? हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. सर्व जण मारधाडीचेच सिनेमे बनवू लागला तर म्युझिकल रोमँटीक सिनेमाचे भविष्य काय? त्यांनी ठरवले आता याच जॉनर चा सिनेमा बनवायचा. या पद्धतीने ‘चांदनी’ या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. (Vinod Khanna)
या चित्रपटात ऋषी कपूर, श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसं म्हटलं तर हा प्रेमाचा त्रिकोण होता. या सिनेमात विनोद खन्नाची एन्ट्री कशी झाली ऑफ इंटरेस्टिंग के साथ किस्सा आहे. कारण या सिनेमात विनोद खन्नाची (Vinod Khanna) एन्ट्री खूप खूप उशिरा होते. पिक्चर संपायला काही अर्धा-पाऊन तास राहिला असताना त्याची एन्ट्री होते. त्यामुळेच ही भूमिका करायला कुणी तयार नव्हते. त्याकाळी विनोद खन्ना आचार्य रजनीश यांच्याकडून पुन्हा बॉलिवूडमध्ये आला होता आणि तो त्याच्या इमेजला साजेसे ॲक्शन पट करत होता. त्यामुळे ‘चांदनी’ या चित्रपटातील त्याची निवड अनेक जणांना खटकली होती. ॲक्शन पटाचा हिरो यातील हळुवार रोमँटिक इमेज असलेला नायक कसा रंगवणार? असा प्रश्न सर्वांना होता. काहींनी तर यश चोप्रांना तशी भीतीच घातली होती. विनोद खन्नाला चित्रपटात घेणे हा एक जुगार ठरू शकतो असे त्यांचे म्हणणे होते. पण यश चोप्रा आपल्या निवडीवर ठाम होते. काही डिस्ट्रीब्युटर्सने ‘तुम्ही चुकीचा खन्ना निवडत आहात’ असे सांगितले. ‘विनोद खन्नाच्या ऐवजी येथे राजेश खन्नाला भूमिका द्या’ असे त्यांचे म्हणणे होते. असे असले तरी विनोद खन्नाची (Vinod Khanna) निवड त्यांनी कायम ठेवली. शेवटच्या तासाभरात येऊन विनोद खन्नाने चित्रपटात आपली छाप उमटवली. श्रीदेवीसोबतचा त्याचा हा पहिला चित्रपट ठरला.
या चित्रपटात विनोद खन्नावर (Vinod Khanna) चित्रित असलेले गाणे कोणत्या पार्श्वगायकांकडून गाऊन घ्यावे असा देखील प्रश्न पडला. चित्रपटाला संगीत शिवहरींचे होते. ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’ हे रोमँटिक गाणे गाण्या साठी हळुवार आवाजाच्या सुरेश वाडकर यांची निवड झाली. सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील गाणे अप्रतिम बनले होते. या चित्रपटात सुरुवातीला ऋषी कपूरची भूमिका अनिल कपूरला ऑफर करण्यात आली. परंतु त्याने यातील कॅरेक्टरला व्हीलचेअर मध्ये वावरावे लागते हे पाहून नकार दिला. सुरुवातीला खरं तर चांदनी ची भूमिका रेखाला द्यायची होती. परंतु रेखासमोर ऋषी कपूर खूपच लहान वाटला असता म्हणून तिथे श्रीदेवीची निवड झाली. जूही चावलाची भूमिका खूपच छोटी होती. ती भूमिका करायला कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती. पण जुही चावला न्यू कमर असल्याने तिने ती भूमिका एक्सेप्ट केली. यश चोपडांना जूही ची भूमिका खूप आवडली त्यांनी तिला तिथेच सांगितले की ‘मी आगामी चित्रपटात तुला नक्की प्रमुख भूमिका देईल’. त्या पद्धतीने १९९३ सालच्या ‘डर’ या चित्रपटात जुही चावला मुख्य भूमिकेत झळकली.
=========
हे देखील वाचा : गुरुदत्तने स्क्रॅप केलेल्या सिनेमातून हा सुपर हिट सिनेमा बनला !
=========
अशा पद्धतीने यश चोप्रा यांनी थोड्याशा भीती मध्येच १४ सप्टेंबर १९८९ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित केला. चित्रपट सुपरहिट झाला. केवळ सात कोटी बजेट असलेला हा चित्रपट त्या काळात तब्बल ३० कोटी रुपये कमाई करून गेला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘चांदनी’ला गौरवण्यात आले. फिल्म फेअर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक, नायिका, नायक, सहाय्यक नायक, सहाय्यक नायिका, संगीतकार, गीतकार, आणि गायक असे तब्बल नऊ नामांकन मिळाले होते. पण पारितोषिक मात्र एकही मिळाले नाही. ऋषी कपूर आणि विनोद खन्ना तब्बल १४ वर्षानंतर (अमर अकबर अँथनी नंतर) पहिल्यांदाच एकत्र आले. विनोद खन्ना आणि वहिदा रहमान देखील रेश्मा और शेरा या चित्रपटानंतर अठरा वर्षानंतर एकत्र आले!