‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
हम बने तुम बने एक दुजे के लिये…
विशुध्द प्रेमाच्या आर्त भावनेला जात, धर्म, भाषा, प्रांत कुणीच अडवू शकत नाही. प्रेमाची अडीच अक्षरे या सगळ्यांना पार करून पुढे जात असतात. हा आणि असा संदेश देणारे चिक्कार सिनेमे आपल्याकडे येऊन गेले पण या सर्वांचा मेरूमणी शोभावा असा एक चित्रपट १९८१ साली आला होता ’एक दुजे के लिये’.हा सिनेमा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला.(Movie)
या सिनेमातून कमल हसन, एस पी बालसुब्रमण्यम सारख्या गुणी कलावंतांचे हिंदीत आगमन झाले. रती अग्नीहोत्री या अभिनेत्रीचा हा पहिलाच सिनेमा होता. मूळात हा सिनेमा १९७८ साली तेलगू मध्ये ’मारो चरीत्र’ या नावाने १९७८ साली आला होता आणि ब्लॉक बस्टर हिट ठरला. त्याचाच हिंदी रीमेक म्हणजे हा सिनेमा होता. मूळ तेलगू सिनेमात कमल हसनची नायिका सरीता होती. भिन्न भाषा आणि प्रांत यांच्यामुळे होणारे सांस्कृतिक मतभेद व त्यातून होणारी दोन प्रेमी जीवांची होरपळ दिग्दर्शक के बालचंदर यांनी अतिशय प्रभावीपणे पडद्यावर दाखवली. गोव्याच्या पार्श्वभूमीवर फुलणारी ही अजब प्रेम की गजब कहानी पाहणं एक नेत्रसुखद अनुभव होता. (Movie)
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत अफाट गाजलं. लता आणि एस पीच्या स्वरातील ’तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना, हम बने तुम बने एक दुजे के लिये, सोलह बरस की बाली उमर को सलाम, हम तुम दोनो जब मिल जायेंगे’ या मेलडीयस गीतांवर युवा वर्ग फिदा झाला. (यातील तेरे मेरे बीचमे या गाण्याची लोकप्रियता एवढी सर्व दूर पोचली की ब्रिटनी स्पीयर्सच्या २००३ साली आलेल्या ’टॉक्सिक’ या अल्बम मधील एका गीतात ही धुन वापरली! ) यात एक ’पॅरेडी सॉंग’ होते. ज्यात शंभर एक जुन्या सिनेमांचे टायटल्स एकत्र करून आनंद बक्षींनी गाणे बनवले होते ’मेरे जीवन साथी प्यार किये जा…’ एस पी बालसुब्रमण्यमला गायक म्हणून घ्यायला सुरूवातीला एल पी तयार नव्हते. कारण त्यांचे हिंदी शब्दोच्चार फारच खराब होते पण जेंव्हा दिग्दर्शकाने त्यातील नायकाच्या व्यक्तीरेखेबाबत सांगितले तेव्हा ते राजी झाले. (Movie)
त्यातील ’हो हो आपडीया,येनी रूंबा अडगा इरूक्के’ या तमिळ शब्दांनी मजा आणली. कमल हसनचे बुलेट वरील स्टंट्स, रतीच्या पोटावर भोवरा फिरविणे, रात्री नाईट लॅम्पची उघड झाप या सार्या क्लुप्त्या तरूणाईला गुदगुल्या करणार्या होत्या. लिफ्ट मध्येच बंद करून त्यात ’पॅरेडी सॉंग’चित्रीत करण्याची आयडीया लई भारी होती. गोवा आणि विशाखापट्टणम च्या निसर्गरम्य समुद्रकिनारी याचं बरचसं चित्रण झालं. त्या काळी देशात सर्वत्र वासू-सपना या फिल्मी नावाने भिंती भरून गेल्या! सिनेमाच्या अखेरीस नायक – नायिका मरतात हा ट्रॅजिक एंड असूनही रसिकांना तो भावला. ५ जून १९८१ रोजी (अॅकडमिक इयरच्या सुरूवातीलाच) हा चित्रपट प्रदर्शित झाला व अक्षरश: हलकल्लोळ झाला. (Movie)
========
हे देखील वाचा : दो बेचारे बिना सहारे, देखो पूछ पूछ कर हारे…
========
तरूणाई यावर तुटून पडली. या सिनेमाला (Movie) फिल्मफेयर ची तब्बल १३ नामांकने मिळाली. राष्ट्रीय स्तरावर देखील या सिनेमाला गौरवण्यात आले. सिनेमा हिट झाला पण हा चित्रपट पाहून प्रेमी युगुलांच्या आत्महत्येने देशभर खळबळ उडाली. यावर देशभर उलट सुलट चर्चा सुरू झाली. एक नवा सामाजिक प्रश्न निर्माण होतोय का याची समाजधुरीणांना चिंता वाटू लागली. या चित्रपटाच्या शेवटी एक वाक्य येते ते वाक्यच आत्महत्येला प्रेरीत करणारे होते असे म्हटले गेले.ते वाक्य होते ’प्यार एक अजीब सी भाषा हैं.यहां जीतने वाले को कहते हैं हार गया और हारने वाले को कहते हैं जीत गया. इसमे जितने वाले शादी कर लेते हैं और हारने वाले एक दुजे के लिए जान देकर अमर हो जाते है….’