‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
विनोद खन्नाच्या कारकिर्दीतला ‘हा’ सर्वोत्तम चित्रपट
विनोद खन्नाची कोणती गोष्ट तुला आवडते असा जर मला कोणी प्रश्न केला की, मी प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच म्हणतो, त्याची डौलदार चाल मला भारी वाटते. मग ती पडद्यावरची असेल अथवा प्रत्यक्षातील असेल. पडद्यावरची किती उदाहरणे सांगावीत ? तुम्हाला मुकुल आनंद दिग्दर्शित “इन्साफ” चित्रपटांमधला मांडवा बीचवरचा प्रसंग आठवतो का बघा, विनोद खन्ना (Vinod Khanna) चालत चालत चालत चालत चालत येतो… राज एन. सिप्पी दिग्दर्शित “इन्कार” पासून राज खोसला दिग्दर्शित “मै तुलसी तेरे आंगन की” पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्याची डौलदार चाल पाहायला मिळेल. त्यावरच एक रिल नक्कीच होईल. विनोद खन्ना म्हणजे चित्रपटसृष्टी आणि त्यात भटकंतीत रमलेल्या माझ्यासारख्या सिनेपत्रकारांसाठी व्ही. के. त्यांच पडद्यावरचे नि प्रत्यक्षातील अतिशय फिट्ट नि हॅन्डसम रुपडं एक वेगळाच कौतुकाचा विषय. व्ही. के.च्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला असं मला कोणी विचारताक्षणीच मी पटकन उत्तर देतो गुलजार दिग्दर्शित आणि एन.सी. सिप्पी निर्मित “अचानक”.
बरोबर पन्नास वर्षांपूर्वी पाच ऑक्टोबर १९७३ रोजी हा चित्रपट मुंबईमध्ये रॉक्सी आणि अन्य. चित्रपटगृहात झळकला. झाली की हो, याला पन्नास वर्ष. मला वाटतं ‘अचानक’ रिलीजचे टायमिंगच चुकले. अहो, त्याच्या मागच्याच शुक्रवारी म्हणजे २८ सप्टेंबर ७३ रोजी राज कपूर दिग्दर्शित सर्वकालीन तारुण्य सुलभ टवटवीत अशी “बॉबी” ही प्रेम कथा झळकली आणि संपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रातील वातावरण बदलून गेलं. त्याच वातावरणामध्ये “अचानक” आला.
‘अचानक’ होता १९५८ साली घडलेल्या के. एम. नानावटी खूनखटला प्रकरणावर आधारित. मूळ घटना सांगायची तर नौसेना अधिकारी कावस माणिक शा हे ज्यावेळेला आपल्या सुट्टीवर घरी येतात, त्यावेळेला त्यांची पत्नी सिल्वासा तिच्या अहुजा नावाच्या मित्राशी अधिकच जवळीकने वागतेय. याचा माणेकशा यांना राग त्यांना येतो आणि संतापातून ते आपल्या पत्नीची आणि मित्राची हत्या करतात. त्या काळात हे प्रकरण प्रचंड धक्कादायक होते आणि भारी गाजलेही. या हाय प्रोफाईल प्रकरणावर आधारित हा सिनेमा होता. याच प्रकरणावर सुनील दत्तने आपल्या अजंठा आर्ट्स या निर्मित संस्थेच्या वतीने आर. के. नय्यर दिग्दर्शित याच प्रकरणावर आधारित ‘यह रास्ते है प्यार के’ (१९६३) हा चित्रपट निर्माण केला त्यात अशोककुमार, सुनील दत्त, लीला नायडू, मोतीलाल, शशीकला, रहेमान इत्यादींच्या भूमिका आहेत. साठ वर्षांपूर्वी अशा धाडसी थीमवर हिंदीत चित्रपट येणे हा कल्चरल शाॅक रसिकांनी स्वीकारला नाही.
गुलजार यांनी आपल्या शैलीमध्ये “अचानक” (१९७३) साकारला. फ्लॅशबॅक तंत्राने आपलं कथानक पडद्यावर आणणे ही गुलजार यांची खासियत. मेजर रंजीत खन्ना (विनोद खन्ना) हा युद्धभूमीवरुन आपल्या घरी येतो तेव्हा त्याला आपली पत्नी पुष्पा (लिली चक्रवर्ती) आणि तिचा मित्र प्रकाश (रविराज) यांच्या मैत्रीचं नातं अधिक दृढ झालेले दिसतं. ते पाहून तो संतापाच्या भरात दोघांची हत्या करतो. त्यातूनच तो पळून जात असताना पोलिसांच्या गोळीबारात जखमी होतो आणि त्याला इस्पितळामध्ये दाखल केले जाते. इस्पितळामध्ये सर्जन (ओम शिवपुरी), डॉक्टर कैलास (असरानी), नर्स राधा फरिदा जलाल) यांच्याशी त्याचे भावनिक नातं निर्माण होतं. ‘अचानक’ व्ही. के.च्या कारकीर्दीतील सर्वाधिक उत्तम दर्जेदार कलात्मक चित्रपट कालांतराने टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित ‘रुस्तम’ (२०१६) हा सुद्धा याच थीमवरचा चित्रपट.
याच विषयावर आधारित लेखक नाटककार मधुसूदन कालेलकर यांनी ‘अपराध मीच केला’ हे नाटक लिहिलं. त्यातील त्याच्यामध्ये अरुण सरनाईक यांनी केलेली कमांडरची भूमिका प्रचंड गाजली. डॉक्टर श्रीराम लागू यांनी “लमाण” या आपल्या आत्मचरित्रामध्ये तर असे म्हटले आहे की, “अचानक” हा हिंदी चित्रपट वाटतच नाही, तो हॉलीवूडच्या तोडीचा चित्रपट वाटतो. डॉक्टर श्रीराम लागू यांनी या चित्रपटाला दिलेलं हे प्रमाणपत्र अतिशय विशेष उल्लेखनीय असंच म्हणायला पाहिजे. ‘अचानक’ ला तात्कालीक समीक्षकांनी दाद दिली. विशेष म्हणजे गुलजार स्वतः चांगले कवी आणि गीतकार असूनही त्यांनी या चित्रपटांमध्ये एकही गाणं वापरलं नाही. पाश्वसंगीत वसंत देसाई यांचं असून ती निवड अतिशय योग्य होती. वसंत देसाई अतिशय दर्जेदार संगीतकार म्हणून ओळखले जायचे आणि त्यांच्या पार्श्वसंगीताने ‘अचानक’ च्या थीमची परिणामकारकता वाढलीय. गुलजार साहेबांनी आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीमध्ये ‘मेरे अपने’,आंधी, किनारा खुशबू परिचय, मीरा, लेकिन, इजाजत असे बरेच चित्रपट दिले. त्यात ‘अचानक’ एक वेगळी कलाकृती.(Vinod Khanna)
व्ही. के.च्या कारकिर्दीवर फोकस टाकायचा ठरला तर खूप मोठा ‘सिनेमास्कोप’ विषय. सुनील दत्तच्या अजंठा आर्ट्स निर्मित आणि के. सुबाबाराव दिग्दर्शित “मन का मीत” (१९६९) या चित्रपटांमध्ये सोम दत्त हिरो (हा सुनील दत्तचा भाऊ), लीना चंदावरकर नायिका आणि विनोद खन्ना खलनायक असे तिघेही नवीन. व्ही. के. खलनायक म्हणून त्यांनी वाटचाल सुरू केली नि “रखवाला” , “एलान”,” सच्चा झूठा”,” मेरा गाव मेरा देश” इत्यादी चित्रपटांमध्ये त्याने खलनायक साकारल्यानंतर आपली पर्सनॅलिटी, आपला अभिनय, आपला आत्मविश्वास आणि चित्रपटसृष्टीकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद या जोरावर तो नायकाच्या भूमिकेकडे वळला आणि नायक म्हणून सुद्धा त्याने आपला अतिशय चांगला ठसा उठवला. व्ही. के.चे महत्वाचे चित्रपट, गुलजार दिग्दर्शित ‘ मेरे अपने’ आणि ‘अचानक’, राज खोसला दिग्दर्शित ‘ मेरा गाव मेरा देश ‘, प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘हाथ की सफाई’, राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘इन्कार’, फिरोझ खान दिग्दर्शित ‘कुर्बानी ‘ आणि ‘दयावान’, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ’. (Vinod Khanna)
=========
हे देखील वाचा : विद्या बालन : एकेकाळी बॅड लक समजली जाणारी हिरोईन !
=========
व्ही. के.ने आपला पुत्र अक्षय खन्नाला चित्रपटसृष्टीत आणताना पंकज पराशर दिग्दर्शित ‘हिमाहयपुत्र ‘ या चित्रपटाची निर्मिती केली आणि हिमाचल प्रदेशातील डलहौसीत पहिल्या मोठ्या चित्रीकरण सत्राचे आयोजन केले. विशेष म्हणजे मुंबईतील आम्हा सात सिनेपत्रकारांचा या फिल्मच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी खास डलहौसी दौरा झाला, तेव्हा व्ही. के.ला तीन दिवस जवळून अनुभवता आले. त्याला उत्तम मराठी येत असल्याने थोडं मराठीत बोलणं झालं. आठवणीत राहणारा असाच हा दौरा होता. विनोद खन्नाला भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ‘अचानक ‘ ही त्याच्या यशस्वी अष्टपैलु कारकिर्दीतील एक अतिशय कलात्मक आणि बहुचर्चित अशी कलाकृती. त्याला पन्नास वर्षे झाल्यानिमित्ताने हा विशेष फोकस. व्ही. के.चे चाहते पुन्हा एकदा ‘अचानक ‘ पाहतीलच. नि जे यानिमित्त पहिल्यांदा ‘अचानक ‘ पाहतील ते व्ही. के.चे नक्कीच फॅन होतील. एकाद्या दर्जेदार चित्रपटाची ताकद अशी असते. पन्नास वर्षांनंतरही ती कायम असते.