‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
मनमोहन यांच्या मनातलं ‘हे’ गाणं चार वर्षांनी चित्रित झाले…
१९७७ साल मनमोहन देसाई (Manmohan Desai) करीता फार लकी होतं. कारण या वर्षी त्यांचे चार बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आणि सर्व बंपर हिट झाले. हे सिनेमे होते ’परवरीश’,’धरम वीर’, ‘चाचा भतीजा’, आणि ’अमर अकबर अॅन्थोनी’ या सर्व सिनेमातली तगडी स्टार कास्ट पाहता मनजींनी हा सारा डोलारा कसा सांभाळला असेल याचे कौतुक वाटते. ’अमर अकबर अॅन्थोनी’ हा सिनेमा तमाम भारतीयांना जवळचा वाटला कारण प्रथमच हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन असे नायक दाखवून मनजींनी राष्ट्रीय एकात्मतेला हातभारच लावला होता. याच सिनेमाचा सिक्वेल करण्याचा विचार त्यांच्या मनात चालू होता.
या सिनेमाची स्टार कास्ट तशीच कायम ठेऊन त्यांनी ’जॉन जानी जनार्दन’ हा सिनेमा करण्याची तयारी सुरू केली. यासाठी या प्रस्तावित सिनेमाचे टायटल सॉंगची धुन त्यांनीच बनवली. ‘बॉबी’ च्या ’अक्सर कोई लडका’ या गाण्याच्या चालीवर त्यांनी ’जॉन जानी जनार्दन’ हे शब्द उच्चारले आणि मनातल्या मनात ही ट्यून पक्की केली. या गाण्याच्या सिच्युएशन करीता त्यांना मस्त संधी आयती चालून आली. त्यांचा ’धरम वीर’ हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला होता. (Manmohan Desai)
धर्मेद्र-जितेंद्र हे रेअर कॉम्बिनेशन असलेला पहिला हिट सिनेमा. या सिनेमाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने देसाईंनी जंगी पार्टी दिली होती. या पार्टीला सिनेमातील सर्व सेलिब्रिटीज येणार होते. या सर्व कलावंतांना एकत्र आणता येईल अशी मस्त सिचुएशन मिळतेय हे पाहून पार्टीच्या आधीच आनंद बक्षी यांच्याकडून एक गीत लिहून रफीच्या स्वरात ध्वनीमुद्रीत करून घेतले. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी आर के स्टुडिओत मोठा हॉटेलचा सेट उभा केला. पंचतारांकीत हॉटेलच्या वेटरच्या वेशातील अमिताभच्या हातात ट्रे देऊन गाणं चित्रीत करायला सुरूवात केली. जॉन जानी जनार्दन तररम पम पम… या फिल्मी पार्टीत अनेक सेलिब्रिटीजने हजेरी लावली यात प्रामुख्याने राजकपूर, राजेश खन्ना, रणधीर कपूर, धर्मेंद्र, राकेश रोशन, माला सिन्हा, वहिदा रहमान, सिम्मी गरेवाल यांचा समावेश होता.(Manmohan Desai)
या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी अनेक गमती घडल्या. राजकपूरच्या हातात अमिताभ अॅकॉर्डीयन देतो आणि त्यावर तो संगमची धुन ऐकवतो. राजेश त्याच्या खास डान्स स्टाईलमध्ये शर्मिलासोबत पोझ देतो. धरम पाजी अमिताभवर लटके रागावतात. (हिरोईनसे टकराया हिरो को गुस्सा आया!) तब्बल सात दिवस तुकड्या तुकड्यात हे गाणे चित्रीत झाले. मनमोहनजी आपल्या सिक्वेलच्या पहिल्या गाण्यावर बेहद खुश होते. ते आता जोमाने कामाला लागले पण नेमकं त्याचवेळी अभिनेता विनोद खन्ना आचार्य रजनीशांच्या आश्रमात गेल्याने सर्व प्लॅनवर पाणी पसरले. विनोद खन्ना नाही म्हटल्यावर सिक्वेलचा विचार मागे पडला. त्यांनी लगेच ’सुहाग’ या त्यांच्या फ्लोअरवर गेलेल्या सिनेमावर लक्ष केंद्रीत केलं. हा सिनेमा पूर्ण होऊन १९७९ साली प्रदर्शित होऊन सुपर हिट ठरला. (Manmohan Desai)
=========
हे देखील वाचा : एक कोल्ड वॉर : अनुराधा पौडवाल विरुद्ध मंगेशकर भगिनी
=========
मनजींच्या (Manmohan Desai) डोक्यातून मात्र चित्रीत झालेलं ’ते’ गाणं काही जात नव्हतं. त्यांनी पुन्हा नव्याने सुरूवात केली. आता स्टोरी लाईन बदलली. (अर्थात त्यांच्या सिनेमात लॉस्ट अॅंड फाउंड हाच फार्म्युला आणि हिच स्टोरी लाईन असायची!) विनोद खन्नाच्या जागी शत्रुघ्न सिन्हा आला. आता सिनेमाचे नाव ठरले ’नसीब’. यातील एका प्रसंगात गाणे फिट बसले. तुम्ही लक्षपूर्वक बघितले तर या गाण्याच्या बॅक ड्रॉपवर तुम्हाला ’धरम वीर’चे पोस्टर दिसेल. अशा रीतीने तब्बल चार वर्षांनी गाण्याला कोंदण लाभलं. ’नसीब’ सिनेमा देखील सुपर हिट झाला आणि ज्या नावाने मनजी सिक्वेल काढणार होते त्याच नावाचा सिनेमा रजनीकांतने १९८२ साली केला ज्यात त्याची तिहेरी भूमिका होती आणि दिग्दर्शन टी रामाराव यांचे होते. पण अजूनही वाटतं मनजींचा सिक्वेल यायला हवा होता!