मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
‘या’ अभिनेत्याने यश चोप्रासोबत केलेला हा एकमेव चित्रपट
किसका रस्ता देखे
ए दिल ऐ सौदाई
मिलो है खामोशी
बरसों है तनहाई…
साहिरचे हे भावपूर्ण काव्य ‘जोशीला’ या चित्रपटातील आहे (पार्श्वगायक किशोरकुमार. संगीतकार राहुल देव बर्मन) हे चित्रपट संगीताच्या व्यसनींना, आर. डी. फॅन्सना वेगळे सांगायलाच नको. पण दिग्दर्शक यश चोप्रा यांनी या चित्रपटाच्या मांडणीत आपण कुठे तरी कमी पडलो. जे काही सांगायचे होते ते आपण सांगू शकलो नाही अशी अनेक वर्षांनंतर या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांनी म्हटलं, या चित्रपटातील या गाण्याच्याच भावना येथे व्यक्त कराव्याश्या वाटतात, किसका रस्ता देखे. एक दिग्दर्शक आपल्या कलाकृतीचे वर्णन करताना आपल्याच चित्रपटातील गाण्याचा संदर्भ देतो ‘येथेही दिग्दर्शक दिसतो’ असेच म्हणायला हवे. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनात देव आनंदने भूमिका साकारल्याचा हा एकमेव चित्रपट. त्याच्या मुंबईतील प्रदर्शनास (१९ ऑक्टोबर १९७३) पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. (Yash Chopra)
विजय आनंद दिग्दर्शित ‘जाॅनी मेरा नाम’ (१९७०) च्या खणखणीत यशानंतर निर्माते व वितरक गुलशन राॅय जबरदस्त फाॅर्मात होते. त्या काळातील ते चित्रपट वितरणातील दादा अथवा किंग. माॅडर्न मुव्हीज हे त्यांचे चित्रपट वितरण आणि नाझ चित्रपटगृहाच्या इमारतीतील त्यांचे वितरण कार्यालय विशेष लक्षवेधक. नवकेतन फिल्मच्या विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ (१९६५), ‘ज्वेल थीफ’ (१९६८) या आणि अन्य चित्रपटांच्या वितरणानंतर गुलशन राॅय यांनी आपली त्रिमूर्ती फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. पहिलाच चित्रपट ‘जाॅनी मेरा नाम’. याच्या यशानंतर गुलशन राॅय यांनी एकदम दोन पावले टाकली. (Yash Chopra)
बी. आर. फिल्म या प्रतिष्ठित बॅनरमधून बाहेर पडून स्वतःची यशराज फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केलेल्या दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या ‘दाग’च्या मुंबई विभागातील वितरण हक्क आपल्या माॅडर्न मुव्हीजकडे घेतले आणि त्याच वेळेस आपल्या त्रिमूर्ती फिल्म या बॅनरखाली विजय आनंद दिग्दर्शित पुढील चित्रपटाची जुळवाजुळव सुरु केली. ‘जाॅनी’चेच देव आनंद व हेमा मालिनी पुन्हा एकदा. जोडीला राखी. पण कशावरुन तरी विजय आनंद व गुलशन राॅय यांच्यात धुसफूस झाली. बिनसले. गाॅसिप्स मॅगझिनमधून म्हटलं गेले, विजय आनंद अर्थात गोल्डी आनंदला आता देव आनंदपेक्षा जास्त मानधन हवे होते. गुलशन राॅय यांनी विजय आनंदचा नाद सोडला आणि यश चोप्रा यांजकडे दिग्दर्शन सोपवत ‘जोशीला ‘ नाव ठेवले. परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत मुहूर्त केलाही.
आता यश चोप्रा एकाच वेळेस ‘दाग’ ( राजेश खन्ना, शर्मिला टागोर व राखी) आणि ‘जोशीला’ अशा मुहूर्तापासूनच चर्चेत असलेल्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करीत होते. यावेळी त्यांच्यावर किती व कशी जबाबदारी होती हे तेच जाणोत. सर्वप्रथम ‘दाग ‘ (रिलीज २७ एप्रिल १९७३. मुंबई मेन थिएटर मिनर्व्हा) पडद्यावर आला तोच सुपर हिट आणि सहा महिन्यांनी ‘जोशीला’ रिलीज होईपर्यंत त्याची गाणी लोकप्रिय. किसका रस्ता…खास किशोरकुमार फॅन्सना आवडणारे. दिल मे जो बाते है ( आशा भोसले व किशोरकुमार), कुछ भी कर लो (लता मंगेशकर व किशोरकुमार), शर्मा ना यूं ( आशा भोसले) या गाण्याना लाऊडस्पीकरपासून इराणी हाॅटेलमधील ज्यूक बाॅक्सपर्यंत सर्वत्र पसंती. आर. डी. तेव्हा जबरदस्त फाॅर्मात होता. (Yash Chopra)
‘जोशीला ‘ला मोठा पुश बॅक, सपोर्ट सिस्टीम ‘जाॅनी मेरा नाम ‘ची . प्रचंड मिडिया हाईप असल्याने मुंबईतील मेन थिएटर ड्रीमलॅन्डला सोमवारी आगाऊ तिकीट विक्रीला प्रचंड मोठी रांग. त्यात धक्काबुक्की. पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाणं असं सगळेच. फर्स्ट डे फर्स्ट शोला अप्पर स्टाॅल तीन रुपये तीस पैशाचे तिकीट दहा रुपयाला तर बाल्कनीचे चार रुपये चाळीस पैशाचे तिकीट बारा रुपयाला जात होते. पिक्चरची क्रेझच तशी भारी होती. पण शो सुटताच पब्लिक रिपोर्ट मिक्स आला. बराचसा नरमच होता. काही दिवसांनी कोणी तरी चलाखीने बातमी पेरली. ‘मेरा नाम जोकर ‘ पाडल्याचा राज कपूरने बदला घेतला. ‘जोशीला ‘ त्याच्या कॅम्पने पाडला. ‘जाॅनी मेरा नाम ‘ गुलशन राॅयचा चित्रपट होता, त्यावरुन हे कनेक्शन. सत्य काय ते राज कपूरलाच माहित असेल वा नसेलही. ते कधीच समजले नाही. ‘जोशीला’च्या तीनच आठवडे अगोदर रिलीज झालेल्या ‘बाॅबी’ची अशी काही क्रेझ होती की ‘जोशीला’ला त्याचा तडाखा बसला हे कोणी लक्षात घेतलेच नाही.(Yash Chopra)
===========
हे देखील वाचा : सिनेमावृद्धीसाठी प्रयत्न की थिएटरची मार्केटिंग ?
===========
‘जोशीला ‘मध्ये एका गुन्ह्यात अमरला (देव आनंद) जेलमध्ये जावे लागते आणि शालिनी (हेमा मालिनी) त्याला निरपराध सिध्द करण्याचा यशस्वी प्रयत्न करते. दरम्यान येणारी आव्हाने, अडचणी, अडथळे म्हणजे हा चित्रपट. या चित्रपटाची कथा गुलशन नंदा यांची तर पटकथा अख्तर मिर्जा व सी. जी. पावरी यांची आहे. छायाचित्रण फली मिस्री यांचे तर संकलन प्राण मेहरा यांचे आहे. चित्रपटात बिंदू, मनमोहन कृष्ण, जगदीश राज, पद्मा खन्ना, सुलोचनादीदी, ए. के. हनगल, सुधीर, मा. सत्यजित, आय. एस. जोहर, विकास आनंद, रुपेशकुमार आणि प्राण यांच्याही भूमिका आहेत.
‘जोशीला ‘ने ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये शंभर दिवसांचा मुक्काम करेपर्यंत निर्माते गुलशन राॅय व दिग्दर्शक यश चोप्रा यांनी सलिम जावेद यांच्या पटकथेवरील चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात केली होती. त्याचा मुहूर्त राजकमल कलामंदिर स्टुडिओत केला. तो चित्रपट होता ‘दीवार’ (रिलीज २४ जानेवारी १९७५).