‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ अंडररेटेड पण ग्रेट सिनेमा
बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सत्तरच्या दशकातील सिनेमांचा जेव्हा आढावा घेतला जातो त्यावेळी त्याच्या अभिनयाने नटलेल्या अनेक अनेक चित्रपटांचा वारंवार उल्लेख होतो. जसे दिवार, त्रिशूल, डॉन, मुकद्दर का सिकंदर..पण एका चित्रपटाला मात्र कायम डावलले जाते. हा चित्रपट होता ६ डिसेंबर १९७४ रोजी प्रदर्शित झालेला रवी टंडन दिग्दर्शित ‘मजबूर’. खरंतर अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतला ‘मजबूर’ हा देखील एक जबरदस्त सिनेमा होता. एक सस्पेंस थ्रिलर सिनेमा होता. यात अमिताभने रंगवलेला ब्रेन ट्यूमरग्रस्त रवी खूप वरच्या दर्जाचा होता. चित्रपटाची कथा सलीम जावेद यांनी लिहिलेली असली तरी १९७० साली आलेल्या zig zag आणि कोल्ड स्वेट या इंग्रजी चित्रपटावरून घेतले होते. आपल्याला झालेला जीवघेण्या गंभीर आजारानंतर आपला मृत्यू अटळ आहे हे जेव्हा नायकाच्या लक्षात येतं तेव्हा तो खुनाचा खोटा आरोप स्वीकारतो आणि फाशीची शिक्षा स्वीकारतो. कारण या बदल्यात त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मिळणार असतात. आपण ब्रेन ट्यूमरने मारणार आहोतच पण जाता जाता आपल्या आई आणि भावंडाची आर्थिक विवंचना संपवण्याची त्याची इच्छा असते. पण फाशीवर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याला ब्रेन ट्यूमरचा जबरदस्त अटॅक येतो आणि सरकारी खर्चाने त्याचे ऑपरेशन होते . तो व्यवस्थित बरा होतो. आता त्याला वाटते आपण विनाकारण खुनाचा आळ आपल्यावर घेतला. आता तर आपण काही ब्रेन ट्यूमरने मरणारही नाही. मग तो जेल मधून पसार होऊन खऱ्या खुन्याच्या शोधाला निघतो. या कामी त्याला मायकल (प्राण) याची मदत होते. अखेर ते खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढतातच.
या सिनेमाची कथा घेऊन सलीम जावेद यांनी बऱ्याच जणांना भेटायचा प्रयत्न केला. ते पहिल्यांदा अप्रोच झाले जी पी सिप्पी यांना. परंतु त्यावेळी ते बिग बजेट ‘शोले’ सिनेमाच्या निर्मितीचा विचार केला आणि त्यांनी ‘शोले’ या चित्रपटासाठी सलीम जावेद यांनाच पाचारण केले. ‘मजबूर’ ची कथा घेऊन नंतर सलीम जावेद नंतर निर्माते प्रेमजी यांच्याकडे गेले त्यांना ते कथानक खूप आवडले आणि दोन लाख रुपये देऊन त्यांनी ती कथा विकत घेतली. रवी टंडन यांच्याकडे दिग्दर्शनासाठी देऊन चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली. या चित्रपटात अमिताभ बच्चनला (Amitabh Bachchan) जो ‘ब्रेन ट्युमर’ दाखवला आहे तो आजार त्यावेळी भारतामध्ये फारसा कोणाला माहितच नव्हता.
त्यामुळे त्या आजाराच्या वेदना ठळकपणे दिग्दर्शकाने दाखवायचे ठरवले. नायकाला जेव्हा ट्युमरच्या असह्य वेदना होतात त्यावेळेला तो डोकं दोन्ही हाताने गच्च पकडून ठेवतो आणि त्याच्या कानाच्या मागून एक घामाची धार येताना दाखवली आहे आणि संपूर्ण चेहरा वेदनेने कासावीस झालेला दाखविला आहे. यामुळे भारतीय समाजामध्ये ब्रेन ट्युमर या आजाराची ओळख झाली असे म्हटले तर वावगे होणार नाही! चित्रपटात अभिनेते प्राण यांची एन्ट्री खूप उशिरा म्हणजे मध्यंतराच्याही नंतर आहे. पण एन्ट्री उशिरा असली तरी चित्रपट त्यानेच खाऊन टाकला होता. यात त्यांनी रंगवलेला ‘मायकल’ भन्नाट होता. निर्माते प्रेमजी आणि दिग्दर्शक रवी टंडन यांना प्राणची ही छोटीशी भूमिका त्याच्यावर अन्याय केल्या सारखी वाटली. म्हणून त्यांनी चित्रपटाचे सर्व शूटिंग पूर्ण झाल्यानंतर प्राण वर एक गाणे चित्रित करायचे ठरवले आणि संपूर्ण सिनेमा पूर्ण झाल्यानंतर हे गाणे रेकॉर्ड झाले आणि प्राणवर चित्रित झाले. गाण्याचे बोल होते ‘दारू की बोतल में साहब पानी भरता है आहे फिर ना कहना मायकल दारू पिके दंगा करता है….’ हे गाणं अतिशय घाईत बनवावे लागल्यामुळे अक्षरशः बांद्रा ते जुहू या प्रवासाच्या दरम्यान गाडीमध्ये लक्ष्मीकांत यांनी या गाण्याची ट्यून तयार केली. आनंद बक्षी यांनी तितक्याच त्वरेने त्यावर शब्द लिहीये. आणि त्याच दिवशी संध्याकाळी या गाण्याचे रेकोर्डिंग झाले. दुसऱ्या दिवशी शूट झाले. या गाण्यात जयश्री टी देखील आहे.(Amitabh Bachchan)
सलीम जावेद यांनी लिहिलेल्या जंजीर, मजबूर आणि डॉन या तिन्ही चित्रपटात प्राण आणि अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी होती. या तिन्ही सिनेमात सुरुवातीला या दोघांचे फाईट सीन्स होते आणि नंतर दोघांची मैत्री झालेली दाखवली आहे. या काळात अभिनेता प्राण हा हायली पॅड आर्टिस्ट होता अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा देखील त्याला जास्त मानधन दिले जायचे.‘डॉन’ या चित्रपटात डीसीपी इफ्तेकार डुप्लिकेट डॉन (अमिताभ) ला ओरिजनल डॉनचा (अमिताभ) फोटो दाखवतो त्या फोटोत दाखवलेला डॉन अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan) फोटो ‘मजबूर’ चित्रपटाच्या दरम्यान घेतलेला आहे!
==========
हे देखील वाचा : अभिनेता जितेंद्र सोबत अभिनेत्री साधना? एक हुकलेला योग!
==========
हा चित्रपट खूप भावस्पर्शी होता. फरीदा जलालने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बहिणीची भूमिका फार सुंदर पद्धतीने साकारली होती. दिग्दर्शक रवि टंडन आणि अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच चित्रपट होता. नंतर १९८२ साली या दोघांनी पुन्हा ‘खुद्दार’ हा चित्रपट केला. चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. ‘रुठे रब को मनाना आसान है’, ‘आदमी जो कहता है आदमी जो सुनता है’,’ नही मै नही देख सकता तुझे रोते हुये’ आणि ‘मायकल दारू पिके दंगा करता है…’ ही गाणी त्या काळात खूप चालली होती. चित्रपटात अमिताभ बच्चन, परवीन बाबी, प्राण, सज्जन, रहमान, सत्येन कप्पू , फरीदाजलाल, मास्टर अलंकार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला फिल्मफेयरचे दोन नामांकन मिळाले होते. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता प्राण आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री फरदा जलाल परंतु त्यावर्षीचे हे पारितोषिके अनुक्रमे शशि कपूर(दिवार) आणि नादिरा (ज्युली) यांना मिळाली. या चित्रपटातील क्लायमॅक्स शॉट जबरदस्त घेतला होता. त्यात प्राण बंदुकीच्या धाकाने सत्येन कप्पूला खिळवून ठेवतो तो थरारक प्रसंग सिनेमाचा हायलाईट ठरला होता! एवढा जबरदस्त चित्रपट पण अमिताभच्या टॉप टेन मध्ये मात्र याला स्थान नाही.