‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एका कुलीने मारलेल्या हाकेमुळे मिथुनचा आत्मविश्वास वाढला
अगदी सर्वसामान्यासारखा चेहरा असलेला आणि कुठलाही ग्लॅमरस लुक नसलेला एक कलाकार सुपरस्टार पदापर्यंत पोहोचतो हे खरोखरच आश्चर्य होतं. तो कलाकार होता मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्तीने आजवर तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. तसेच पाच वेळा त्याला फिल्म फेअरचे नामांकन मिळाले त्यापैकी दोनदा तो विजेता ठरला! असे असले तरी या कलावंताबद्दल समाजात संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. काहीजण त्याच्या संघर्षमय जीवनातून शिखरावर पोचण्याच्या कर्तृत्वाला सलाम करतात. तर काहीजण पूर्वग्रह दूषित मत सांभाळत त्याच्यावर भरपूर तोंड सुख घेतात. मिथुन चक्रवर्ती मात्र कधीच कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्याने आपले सर्व लक्ष फोकस केले होते आपल्या करिअरवर.
पश्चिम बंगालमध्ये महाविद्यालयात असताना तिकडे नक्षलवादी चळवळ जोर पकडत होती. तरुणाचे जथ्थे त्या चळवळीकडे ओढले जात होते. कळत नकळतपणे मिथुन देखील त्या चळवळीत ओढला गेला. पण त्याच्या एकुलत्या मोठ्या भावाचा पोलीस गोळीबारात झालेल्या मृत्यूने त्याचे आयुष्य ३६० अंशात फिरले. घरच्यांनी त्याला आता पश्चिम बंगाल पासून दूर जाण्यास सांगितले. ११ सप्टेंबर १९७३ या दिवशी तो मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उतरला. तिथे एका कुलीने त्याला ‘ए हिरो s s’ असा आवाज दिला. काही क्षणासाठी तो सुखावला. पण नंतर त्याच्या लक्षात आले तो कुली सर्वांनाच हिरो म्हणून बोलवत होता ! पण काही क्षणासाठी का असेना त्या कुलीच्या एका शब्दाने मिथुनमध्ये (Mithun) आत्मविश्वास आला आणि मुंबईत आपण काही तरी करू शकतो याची जाणीव झाली आणि त्यासाठी संघर्ष करण्यासाठी तो तयार झाला.
त्याकाळात चित्रपटात काम करण्यासाठी विधिवत शिक्षण घेऊन येणाऱ्या तरुणांची लाट आली होती. मिथुन चक्रवर्तीने देखील पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. १९७४ साली पदवीदान समारंभाला मुख्य अतिथी म्हणून आले होते प्रख्यात दिग्दर्शक मृणाल सेन. मिथुन चक्रवर्तीला पदवी तर मिळाली पण संघर्ष थांबला नाही. त्याला कुठल्याच चित्रपटाची ऑफर मिळाली नाही. तिकडे कलकत्त्यामध्ये मृणाल सेन एका चित्रपटाचे कास्टिंग करत होते. त्यांना एक काळा सावळा सामान्य चेहऱ्याचा आदिवासी सारखा दिसणारा मुलगा या सिनेमासाठी हवा होता. काही केल्या त्यांना तो सापडत नव्हता. अचानक त्यांच्या डोक्यात पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधील पदवीदान समारंभ आठवला.
एक ‘एम’ नावाचा सावळा मुलगा आपण तिथे पाहिला हे त्यांना आठवले. त्यांनी FTII सोबत पत्रव्यवहार करून त्या मुलाचे डिटेल्स मागून घेतले. योगायोगाने सर्व डिटेल्स त्यांना मिळाले आणि त्यांनी मुंबईमध्ये मिथुनला कॉन्टॅक्ट केले. त्याला कलकत्त्याला बोलून घेतले. अशा प्रकारे मिथुन चक्रवर्तीला पहिला चित्रपट मिळाला मृणाल सेन यांचा ‘मृगया’. ही एक आर्ट फिल्म होती. या सिनेमाची कथा १९२० सालच्या ब्रिटिश काळातील आहे. हा चित्रपट हिंदी आणि बंगाली या दोन भाषेत बनला. ममता शंकर ही मिथुनची (Mithun) या चित्रपटातील नायिका होती. बंगाली चित्रपटाला थोडे फार यश मिळाले. मात्र हिंदी सिनेमा पूर्णपणे साफ झोपला. एकच चांगली गोष्ट झाली ती म्हणजे पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी मिथुन चक्रवर्तीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा चक्क राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते मिथुनने हा पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर देखील त्याचा संघर्ष चालूच होता. पण तो हरला नाही, थकला नाही नाराज तर झालाच नाही. मोठ्या सातत्याने आणि कष्टाने तो मुंबईमध्ये टिकून राहिला. १९७९ साली दिग्दर्शक रवी नगाईच यांनी त्याला ‘सुरक्षा’ हा चित्रपट ऑफर केला. जेम्स बॉण्डच्या धर्तीवर गन मास्टर जी नाईन हा भारतीय बॉण्ड त्याने या सिनेमात रंगवला. इथे खऱ्या अर्थाने मिथुन (Mithun) क्लिक झाला ! एका ट्रेड मॅगझीमने कव्हरवर त्याचा फोटो छापून ‘द स्टार इज बॉर्न!’ असे लिहिले. मिथुनला चित्रपट मिळत होते. पण ज्या सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळवून दिला तो चित्रपट १९८२ साली आला. बी. सुभाष दिग्दर्शित ‘डिस्को डान्सर’ हा भारतातील पहिला शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा चित्रपट ठरला.
=========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ अंडररेटेड पण ग्रेट सिनेमा
=========
यातील मिथुन चक्रवर्तीच्या (Mithun) डान्सने तरुणाईमध्ये मोठी हवा निर्माण केली. मायकल जॅक्सनचा तो फॅन होताच शिवाय एल्विस प्रिस्ले हा देखील त्याचा आदर्श होता. मिथुनने वेस्टन डान्सला इंडियन टच दिला आणि त्याची ही स्टाईल लोकप्रिय झाली. १९८५ सालानंतर त्याला सामाजिक चित्रपट देखील मिळू लागले. अमिताभ बच्चन राजकारणामध्ये गेल्यामुळे एक मोठी स्पेस निर्माण झाली होती आणि ती मिथुन भरून काढली. इतकी की ‘इथून तिथून मिथुन’ अशी अवस्था झाली. १९८९ साली त्याचे तब्बल १९ चित्रपट प्रदर्शित झाले. त्याने तब्बल साडेतीनशे चित्रपट नायक म्हणून केले. एवढे सिनेमे करणारा तो जगातील कदाचित एकमेव अभिनेता असावा. त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले. नव्वदच्या दशकाच्या अखेरीस त्याने उटी येथे स्थलांतर केले. साउथकडील सिनेमांमध्ये तो प्रचंड गाजला. उटी, म्हैसूर, कोईमतुर येथे त्याने हॉटेल व्यवसाय सुरू केले. शिक्षण संस्था उभारल्या. चित्रपट आणि टीव्ही कलाकारांच्या पडत्या काळात त्यांना मदत व्हावी म्हणून CINTA स्थापली.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील पडद्यावरील त्याची अदाकारी रसिकांना आजही आठवते. क्लास पब्लिकसाठी तो जरी नसला तरी मास पब्लिकसाठी तो एक नंबरचा हिरो होता. मिथुन चक्रवर्ती (Mithun) आता राजकारणात देखील उतरला आहे. इथेही तो नक्की यशस्वी होईल कारण संघर्ष त्याच्या रक्तातच आहे. त्याचा ‘कोई शक?’ हा डायलॉग पब्लिकला प्रचंड आवडायचा !