दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ग्लोबल युगात ‘हा’ चित्रपट ठरला अगदीच ‘सर्वसाधारण’
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर चित्रपटाबद्दलचे आकर्षण आणि समज बदलत जाते. चित्रपट प्रेक्षक घडण्यातील हा एक फंडा. सत्तरच्या दशकातील माझ्या शालेय पिढीला “फक्त प्रौढांसाठी” पिक्चरचं रस्त्यावर लागलेले पोस्टर अथवा होर्डींग्स पाहतानाही आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागे. लपूनछपून पाहत असू चक्क. अशा पिक्चर्सची वृत्तपत्रातील जाहिरातही जास्त ‘हाॅट’ नसे. पिक्चरच्या डिझाईनखाली दिलेलं ‘फक्त प्रौढांसाठी’ मात्र कुतूहल चालवणारे असे. आजच्या डिजिटल युगाच्या तुलनेत पन्नास वर्षांपूर्वी ताकभात वा वरणभाताचे वातावरण असे. साधं आयुष्य मजेत चाले.
पोस्टरवर ठळक ‘ए’ला जणू प्रतिष्ठा देण्याचे श्रेय बी. आर. इशारा, राम दयाल, फिरोझ चिनाॅय, मुकुल दत्त या दिग्दर्शकांकडे जाई. त्यांनी ‘धाडसी थीमवर’ पिक्चर पडद्यावर आणण्याचा जणू ध्यास घेतलेला. मिडियातून अशा ‘धाडसी चित्रपटा’वर भले मोठ मोठे लेख प्रसिद्ध करताना अशा पिक्चरमधले फोटो मात्र ‘लक्षवेधक’ असे प्रसिद्ध होत. म्हणून तर महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय कुटुंबात अशी मासिके शक्यतो घरी आणलीच जात नसत. त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कौटुंबिक वातावरण संयमी, सकारात्मक, सभ्य होते. पाल्यांनी कोणते चित्रपट पहावेत याचे निर्णय पालक घेत आणि चित्रपट पाहायला एकत्र जात. खुद्द अशा पिक्चर्सचे तारणहार प्रत्येकवेळी धाडसी ‘स्टोरी’ आणणार कुठून? विदेशी चित्रपट आणि इंग्लिश कथा कादंबरी हे ‘अनधिकृत’ सोर्स. त्याचे जमेल तसे हिंदीकरण करायचे. असाच जेम्स हेडलीच्या ‘टायगर बाय द टेल’ या कादंबरीवर बेतलेला फिरोझ चिनाॅय दिग्दर्शित ‘कश्मकश’ (रिलीज २६ ऑक्टोबर १९७३) च्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत असतानाच असं वाटत, आजच्या ग्लोबल युगात या चित्रपटाची थीम अगदीच ‘सर्वसाधारण’ वाटण्याची शक्यता आहे. (Kashmakash)
कथासूत्र काय ? सतीश गुप्ता (फिरोझ खान) व सीता गुप्ता (रेखा) हे पती पत्नी सुखात जगत असतानाच आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी सीता गुप्ता बाहेरगावी गेली असतानाच सतीशचा गुलछबू मित्र मनमोहन (रमेश देव) सतीशला सुनिताचा (पद्मा खन्ना) डान्स पाहायला घेऊन जातो. सतिशही हौशीच असतो. सतीश सुनिताकडे आकर्षित होतो. सुनिताचे तिचा मित्र जाॅनीशी (रणजीत) भांडण झालेले असते. जाॅनीला सुनिता सतीशला भेटते हे आवडत नसते. आय एस. जोहर सतिश व सुनिताचे चोरुन फोटो काढतो. सतिशला ब्लॅकमेल करु लागतो आणि एके दिवशी सुनिताचा खून होतो. इन्स्पेक्टर सिन्हा (शत्रुघ्न सिन्हा) याच्याकडे या प्रकरणाचा तपास येतो. खरा खुनी कोण ? सतीश, जाॅनी की, राना चौधरी (रेहमान) ? याभोवतीची रहस्यरंजक थीम म्हणजे हा चित्रपट. यातच रितु गुप्ता (आशा सचदेव) ही एक व्यक्तीरेखा आहे. ती सतिशची बहिण आणि इन्स्पेक्टर सिन्हाची प्रेयसी.(Kashmakash)
साठ व सत्तरच्या दशकात ‘मर्डर मिस्ट्री’वरचे चित्रपट अनेक आले.( तिसरी मंझिल, अनहोनी, धुंद, परदे के पीछे, खेल खेल मे वगैरे बरेच) ज्याचा अख्ख्या पिक्चरभर संशय येत नाही तोच नेमका खूनी ठरतो हे त्यातील काॅमन सूत्र. पब्लिकही पिक्चर एन्जाॅय करताना ‘हा खूनी असेल की तो’ असा सतत ‘डोक्याला शाॅट ‘ लावत असे आणि अखेरीस खरा खूनी समजताच अनेकदा तरी डोक्याला हात लावी..’कश्मकश’ ही असाच. त्या काळात तो फार धाडसी चित्रपट मानला गेला. सतीश भटनागर व राम कमलानी यांची पटकथा गडबडली होती. त्यामुळेच दिग्दर्शकही मांडणीत पकड घट्ट करु शकला नाही. फिरोझ खान ‘लेडी किलर’ हीरो म्हणून आपली इमेज कायम ठेवण्यासाठी आपल्या शर्टाची बटणे उघडी ठेवून आपल्या केसाळ छातीचे दर्शन घडवत असे.
रेखा देखील आपल्या मोहक मादक आकर्षक रुपालाच महत्व देत होती. सुरुवातीला तिने ‘एस्टॅब्लिज’ होण्यासाठी भरभर चित्रपट साईन केले त्यातलाच हा एक. शत्रुघ्न सिन्हाची डायलॉगबाजी पाहायला पब्लिक उत्सुक असे. रणजीतच्या कामाची मात्र तात्कालिक समिक्षकांनी भरपूर तारीफ केली. चित्रपटाचे छायाचित्रण रामचंद्र यांचे तर संकलन बाबुभाई ठक्कर यांचे. गीते इंदिवर, वर्मा मलिक व माया गोविंद यांची तर संगीत कल्याणजी आनंदजीचे..यातील किशोरकुमारने गायलेले जितना जरुरी मन का रिश्ता, लता मंगेशकर यांनी गायलेले कबसे मिलन की आग लगी है ही गाणी लोकप्रिय ठरली. पण चक्क शत्रुघ्न सिन्हा आशा भोसले यांच्यासोबत मेरे पीछे है दीवाने गायला. (तुम्ही हे गाणे कधी ऐकले का?) शत्रुघ्न सिन्हा आणि आशा सचदेव एकमेकांची छेडछाड करीत हे प्रेमगीत साकारतात.(Kashmakash)
=========
हे देखील वाचा : अमिताभचा ‘सौदागर’ पन्नाशीचा झाला…
=========
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टीत ‘कश्मकश ‘ला साधारण यश प्राप्त झाले हेही काही कमी नाही. या चित्रपटाचे निर्माते शंकर बी. सी. हे त्या काळातील मोठेच चित्रपट वितरक. डिलक्स पिक्चर ही त्यांची वितरण संस्था. मला आठवतय कालांतराने मी मिडियात आल्यावर नाझ चित्रपटगृह इमारतीत पाचव्या मजल्यावर त्यांचे प्रशस्त, चकाचक ऑफिस होते. ‘कश्मकश ‘ प्रदर्शित करताना त्यांनी छान वातावरण निर्मिती केली होती. तीच तेवढी त्यांना फळली.