दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मुमताजमुळे पहलाज निहलानी यांनी दिली जंगी पार्टी
आयुष्यात कधी कधी मनासारखी गोष्ट करायला मिळाल्यानंतर इतका आनंद होतो की, त्या गोष्टीमुळे आपल्याला फायदा होत आहे की तोटा होतो आहे या गोष्टी चक्क गौण ठरतात असाच काहीसा प्रकार हिंदी चित्रपट निर्माते पहलाज निहलानी आणि यांच्याबाबत झाला होता. वाचकांना नक्कीच ठावूक असेल पहलाज निहलानी बॉलीवूड मधील एक यशस्वी निर्माते आहेत. त्यांची एवढीच ओळख नाही ; तर चित्रपट सेंसार बोर्डाचे ते चेअर पर्सन देखील होते. तसेच काही टीव्ही मालिकांचे देखील त्यांनी निर्मिती केली होती. आजचा किस्सा थोडासा वेगळा आहे. पहलाज निहलानी हे हिंदी सिनेमात येण्यापूर्वी पासूनच अभिनेत्री मुमताजचे खूप मोठे फॅन होते. त्यांना मुमताजला घेऊन एक चित्रपट निर्माण करायचा होता. पण ते हिंदी चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वीच मुमताजने मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न करून चित्रपट संन्यास घेतला होता. निर्माते पहलाज निहलानी यांना खूप वाईट वाटलं होतं. त्यांची एक मनीषा होती दिल की, तमन्ना होती एखादा तरी मुमताजला घेऊन एक चित्रपट निर्माण करणे. पण ती अधुरीच राहिली का ?
कधी कधी अनपेक्षितपणे काही गोष्टी घडून येतात. तशीच गोष्ट पहलाज निहलानी यांच्याबाबत घडली. ते १९८२ साली हिंदी चित्रपट सृष्टीत आले आणि त्यांचा पहिला चित्रपट ‘हथकडी’ हा यावर्षी प्रदर्शित झाला. (आशा भोसले यांनी गायलेलं ‘डिस्को स्टेशन’ हे गाणं या सिनेमात होते) यानंतर त्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले. अभिनेता गोविंदाला नायक म्हणून एस्टाब्लिश करणारा ‘हत्या’ तसेच चंकी पांडेला स्टार बनवणारा’आग ही आग’ हे चित्रपट त्यांनीच निर्माण केले होते. त्यांच्या मनात मात्र मुमताजला घेऊन चित्रपट बनवण्याची इच्छा कायम होती आणि तो योग अनपेक्षितपणे जुळून आला. चित्रपट संन्यास घेतल्यानंतर बारा वर्षांनी मुमताजने कमबॅक करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने अभिनेता शत्रुघन सिन्हा यांच्या जवळ हा विषय बोलून दाखवला.
पहलाज निहलानी यांना जेव्हा मुमताज कमबॅक करणार आहे हे कळाले ताबडतोब त्यांनी लंडन गाठले. तिला गळ घालून आपल्या चित्रपटात घेतले. मुमताज, शत्रुघ्न सिन्हा, विश्वजीतचा मुलगा प्रसेन जीत या (चा हा पहिलाच चित्रपट होता) आणि मधुश्री यांना घेऊन त्याने चित्रपट बनवला. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले होते. मुमताज तब्बल १४ वर्षानंतर हिंदी सिनेमात पुनरागमन करत होती. ही एक मोठी ब्रेकिंग न्यूज झाली होती. सर्वजण या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. कारण सत्तरच्या दशकामध्ये मुमताज एक आघाडीचे अभिनेत्री होती आणि राजेश खन्ना सोबत तिने हिट सिनेमाची एक मोठी रांगच लावली होती. त्याकाळात तिने दिलीप कुमार पासून अमिताभ बच्चन पर्यंत सर्व अभिनेत्यांसोबत नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. तिचा फार मोठा चाहता वर्ग भारतामध्ये मौजूद होता. या सर्व पार्श्वभूमीवर ‘आंधीया’ या चित्रपटाची मार्केटमध्ये खूप हवा झाली होती. पण दुर्दैवाने मुमताजचा हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला. कारण लोकांना रोमँटिक इमेज मधली मुमताज पाहिजे होती तिथे मात्र ती कॅरेक्टर रोल मध्ये होती. लोकांना तिचे वाढलेलं वय आवडलं नाही आणि त्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. चित्रपट साफ झोपला.
==========
हे देखील वाचा : ‘या’ कारणामुळे मुमताजने मर्सिडीजची चावी अमिताभला दिली !
==========
पण निर्माते पहलाज निहलानी मात्र बेहद खुश होते. त्यांनी या अपयशाची देखील जंगी पार्टी केली. त्यांच्या दृष्टीने मुमताजला घेऊन चित्रपट बनवण्याचा त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो त्यांनी पूर्ण केला होता! भलेही त्या चित्रपटाला यश मिळाले नसले तरी त्यांच्या दृष्टीने ती फार मोठी अचिव्हमेंट होती. त्यांनी त्या पार्टीतच मुमताजला घेऊन पुढच्या एका सिनेमाची अनाउन्समेंट केली! पण मुमताज ने प्रेक्षकांचा कौल स्वीकारला होता तिने पहलाज निहलानी यांना नम्र नकार दिला. मुमताज चा हा कमबॅक केलेला चित्रपट दुर्दैवाने तिच्या सेकंड इनिंगचा पहिलाच आणि शेवटचा चित्रपट ठरला. मुमताज अलीकडे भारतात आली होती. त्यावेळेला तिने पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा दिला !