दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बॉलीवूडमध्ये हॉरर मूव्हीजची सुरुवात करणारा ‘महल’
भारतीय सिनेमाच्या इतिहासात गूढ कथांवर आधारीत भयपट निर्माण करण्याचे श्रेय बॉम्बे टॉकीजच्या १९४९ साली आलेल्या ‘महल’ या सिनेमाला जाते. त्यापूर्वी देखील काहींनी तसे प्रयत्न केले होते पण यशाची कमान उभारली ती ’महल’नेच ! या सिनेमाचे दिग्दर्शक होते कमाल अमरोही. त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या सिनेमाची कथा त्यांचीच होती ती त्यांना कशी सुचली ? (Horror Movie)
अमरोही त्यापूर्वी कथा पटकथाकार म्हणून लोकप्रिय होतेच एकदा असेच भटकंती करत ते म्हैसूरच्या जंगलात गेले, रात्र बरीच झाली होती. तिथे एका पडक्या जुन्या वास्तूत त्यांनी मुक्काम करायचे ठरवले.सकाळी तिथला म्हातारा नोकर ’चाय भिजवा दू साहब’ म्हणत उठवायला आला. त्यांच्या डोळ्यावर झोपेची धुंदी होतीच. थोड्याच वेळात एक घागरा-चोळी परिधान केलेली मुलगी तोंडावर घूंघट घेवून पायातील पैंजणाचा आवाज करीत आली व म्हणाले ’सरकार, चाय !’ आणि गायब झाली.अमरोही जागे झाले पण त्यांना ती मुलगी दिसेना की म्हातारा नोकर.त्यांनी सर्व वास्तू धुंडाळली पण कित्येक वर्ष तिथं कुणी राहिल्याच्या पाऊल खुणा नव्हत्या ! अमरोहींना या गूढ नाट्यावर सिनेमा बनविण्याची उर्मी सुचली.
त्यांना नुसते स्क्रिप्ट लिहायचे नव्हते तर तो सिनेमा दिग्दर्शित करायचा होता. कारण ही कथा त्यांच्या स्वानुभावावर आधारीत होती. ते तडक बॉम्बे टॉकीजच्या अशोक कुमार यांना भेटले. त्यांना कथा आवडली पण दिग्दर्शनाचा काहीही अनुभव नसलेल्या अमरोहींबाबत ते सांशक होते. त्यावेळी सावक वाच्छा जे साऊंड रेकॉर्डीस्ट होते त्यांच्या शी चर्चा केली. बॉम्बे टॉकीज त्यावेळी आर्थिक डबघाईला आली होती. दोघांनी रिस्क घ्यायचे ठरवले. सिनेमाच्या तयारीला सारे युनिट लागले. नायिकेच्या भूमिकेसाठी आधी सुरैयाचा विचार झाला पण नंतर मधुबाला या सोळा वर्षीय अभिनेत्रीला निवडले गेले. (Horror Movie)
सिनेमातील गूढ वातावरण, मोठे ठोक्याचे घड्याळ, काळे मांजर, बागेतील हलणारा झोपाळा हे सारं भारतीय प्रेक्षकांना नवीन होतं. खेमचंद प्रकाश यांचे संगीत जबरदस्त होते. ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवली. ध्वनीमुद्रणाचे तंत्र तेव्हा एवढे विकसित नव्हते.तरी मध्यभागी मायक्रोफोन ठेवून दूरवर उभे राहून चालत चालत मायक्रोफोनकडे येत ’खामोश है निगाहे’ गात मध्यभागी आल्यावर मुख्य गाण्याची सुरूवात होते हे असे गाऊन घेण्याची आयडीया अमरोहींची होती ! यातील रहस्यमय भयप्रद वातावरण आणखी गहिरं करण्याचे काम जर्मन छायाचित्रकार जोसेफ ने केले.
यातील ’मुश्कील है बहुत मुश्कील चाहत का भूला देना’ हे संपूर्ण गाणं सलग एका टेकमध्ये चित्रित केलं होतं. नक्षब यांची गाणी होती. या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. या सिनेमापासून ध्वनीमुद्रिकेवर पहिल्यांदाच गाणार्या कलावंताचे नाव येवू लागले. ही फार महत्वाची गोष्ट होती. गायिका लता मंगेशकर यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला. या सिनेमात ‘घबराके जो हम सर को टकराये तो अच्छा (राजकुमारी) ये रात फिर न आयेगी जवानी बीत जायेगी (जोहराबाई अंबालावाला) एक तीर चला दिल पे लगा (राजकुमारी) ही गाणी देखील मस्त जमून आली होती. १४ ऑक्टोबर १९४९ साली मुंबईच्या रॉक्सी या चित्रपट गृहात ’महल’ झळकला. याच वर्षी आर के चा ’बरसात’ आणि मेहबूबचा ’अंदाज’देखील प्रदर्शित झाले होते. महल हिंदी सिनेमातील माईल स्टोन सिनेमा ठरला. (Horror Movie)
================
हे देखील वाचा : रागात लिहिलेले गाणे आज पन्नास वर्षानंतरही लोकप्रिय…
================
‘महल’ हा चित्रपट ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूटच्या दहा सर्वोत्कृष्ट रोमँटिक हॉरर चित्रपटांच्या यादीत आला तर स्कूपव्हूप संस्थेच्या एका नोंदीत ‘१४ भारतीय भयपट तुम्ही एकट्याने पाहू शकत नाही’ असा अभिप्राय दिला ! या सिनेमाने बॉम्बे टॉकीजचा कोसळता आर्थिक डोलारा सांभाळायला थोडीशी मदत झाली. महल या चित्रपटाचे संकलक होते बिमल रॉय. त्यांना देखील या कथेचा प्लॉट एवढा आवडला की त्यांनी याच टाईपचा ‘मधुमती’ नावाचा चित्रपट १९५८ साली दिग्दर्शित केला. या सिनेमामुळे बॉलीवूडमध्ये भयपटांची सुरुवात झाली !