‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
दारासिंगच्या स्टंटपटाची ‘स्टोरी’च वेगळी
दारासिंगची उघड्या निधड्या पिळदार बळकट छातीचे पडदाभर भरभरुन दर्शन प्रदर्शन घडवणारा “फौलाद” ( रिलीज ६ डिसेंबर १९६३) हा त्या काळातील चक्क आजचा तोंडात सिगारेट असणारा, केस वाढलेला, दाढीत चेहरा हरवलेला, चेहऱ्यावर मग्रूरी असलेला असा ‘ॲनिमल’च (अर्थात रणबीर कपूर) असं म्हटल्याचं चित्रपट रसिकांच्या मागच्या पिढीच्या मला नेमकं काय खोचकपणे म्हणायचयं हे लक्षात येईल. (Dara Singh)
आजची डिजिटल पिढी एव्हाना गुगलवर गेलीही असेल पण तेथे असं काही भारी सापडायचं नाही. प्रत्येक काळासोबत चित्रपटात टाकत टाकत नवं रुपडं घेत घेत प्रवास करत पुढे जात असतो. एकेकाळी ‘तुफान’ (१९६८) हे दारासिंगच्या स्टंटपटाचे नाव होते. कालांतराने अमिताभ बच्चनच्या मनमोहन देसाईच्या चित्रपटाचे नाव ‘तुफान’ (१९८९) होते. दारासिंगच्या दे मार चित्रपटांना मुख्य प्रवाहातील चित्रपटगृहात स्थान मिळत नसे. त्यांचं मेन थिएटर मध्य मुंबईतील पिला हाऊस एरियातील गुलशन, निशात, ताज ( ‘फौलाद ‘चे मेन थिएटर हेच होते), न्यू रोशन, दौलत, राॅयल आणि जवळचीच मोती, सुपर अशी चित्रपटगृहे असते. पोस्टरभर फायटींग आणि षोडशी नायिका असे. दिग्दर्शकाला असं काॅम्बिनेशन कसं बरं सुचे हे समजत नसे. जे काही असेल ते पण हा सुपर हिट फाॅर्मुला होता.
सत्तरच्या दशकात ‘फायटींगलाही ॲक्टींग लागते’ यावर शिक्कामोर्तब झाले. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे हॅन्डसम हिरो जबरा फायटींग करतात हा अभिनय दाद देण्यासारखा झाला. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान व शस्त्र यांची रुपेरी पडद्यावर जणू महायुतीच दिसते. पठाण, जवान, कांतारा, केकेआर, केजीएफ (पहिला व दुसरा), टायगर ३ असं करत करत ‘ॲनिमल’ पर्यंत रुपेरी पडद्यावरचा विध्वंस वाढला. ‘फौलाद ‘च्या प्रदर्शनास साठ वर्ष होत असताना ही सगळी स्थित्यंतरे एका फ्लॅशबॅकचा विषयच. (Dara Singh)
चित्रपटाच्या अभ्यासक्रमात स्टंटपटांना अजिबात महत्व नसेलही पण साठच्या दशकात अशा मारधाड पिक्चर्सची जबरा क्रेझ होती. त्यांची नावे भन्नाट, स्टोरी नाट्यमय, गीत संगीत नृत्याचा तडका जबरा, पोस्टरभर ॲक्शन, त्यांचं रिलीज ताज वा निशातसारख्या थिएटर्सना, त्यांचा हुकमी प्रेक्षकवर्ग हा पडद्यावरच्या जगात हरवून हरखून जाणारा. सेन्सॉर प्रमाणपत्र, दारासिंगच्या धिप्पाड एन्ट्रीला हमखास टाळ्या नि शिट्ट्या देणारा, सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या बसक्या खुर्चीत बसून पडद्यावरच्या दारासिंगला प्रोत्साहन देणारा, चिअर्स करणारा. हा पब्लिक ‘चित्रपटात कुठे बरे दिग्दर्शक दिसला?’, ‘काय भारी शाॅट लावला होता?’, ‘मेंदू कुरतवणारा शाॅट होता’ असं काहीही पाहत नसे. डोक्याला कसलाही शाॅट न लावता हे पिक्चर्स एन्जाॅय केले जात. मुख्य प्रवाहातील थेटरात ते मॅटीनी शोला येत. मी गिरगावातील गल्ली चित्रपटात दारासिंग, मुमताज, रंधवा यांचे स्टंटपट एन्जाॅय करीत असे. साऊंड सिस्टीम नीट नसेल तर तोंडाने आवाज काढत असू, ढिश्यॅव दिश्यॅव, ढिश्यूम ढिश्यूम. काय ते भारी दिवस होते हो. (Dara Singh)
दारासिंगच्या स्टंटपटाचे प्रगती पुस्तक सांगायचे तर, किंगकाॅग ‘(१९६२) ते ‘फौलाद के दुश्मन’ (१९६८) असं पण कायमचाच ठसा उमटलाय. रुस्तम ए बगदाद, आवारा अब्दुल्ला, सॅमसन, आया तुफान, ऑन्धी और तुफान, रुस्तम ए हिंद, बाॅक्सर, टारझन कम टू दिल्ली, शेरदिल, राका, सात समुंदर पार, लुटेरा, दादा, डंका, तुफान वगैरे वगैरे. या प्रत्येक पिक्चरमध्ये ‘स्टोरी’ आहे. पण ती काहीही असली तरी अडत नसे. पिक्चरमध्ये भरपूर मसाला आहे एवढं पुरेसे असे.(Dara Singh)
‘फौलाद ‘ची गोष्ट मुल्कराज बाकरी व फारुख कैसर यांची. चित्रपटाची निर्मिती विनोद जोशी व रजनी देसाई यांची. दिग्दर्शन मोहम्मद हुसैन यांचे. संगीत जी. एस. कोहली यांचे आणि चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेली ओ मतवाले साजना, यहां तो कांटे मौत से जिंदगी, याद तेरी आयेगी ही गाणी लोकप्रिय होती. चित्रपटात अमर ( दारासिंग) आणि राजकुमारी पद्मा ( मुमताज) यांची योगायोगाने खच्चून भरलेली प्रेमकथा. चित्रपटात रंधवा, मिनू मुमताज, श्यामकुमार, रत्नमाला, परवीन पाॅल, कमल मेहरा, रणधीर इत्यादींच्याही भूमिका. ब्राॅडवे पिक्चर्स बॅनरच्या या चित्रपटाचे छायाचित्रणकार सुलेमान व अनंत वड्डेकर यांचे तर संकलन के. बी. भडसावळे यांचे.(Dara Singh)
===========
हे देखील वाचा : दक्षिणेकडील दिग्दर्शकांचा हिंदीत वाढता तडका…
===========
दारासिंगच्या मारधाड पिक्चर्सचं आपलं एक व्यक्तिमत्व होतं आणि त्याच चौकटीत वा फ्रेममध्ये ते पिक्चर्स एन्जाॅय केले तरच ते मस्त टाईमपास करत. अशा अनेक स्टंटपटात नायिका साकारुनही मुमताजने अनेकांच्या नाकावर टिच्चून आपली गुणवत्ता, सौंदर्य व मेहनत या गुणांवर मेन स्ट्रीममधील चित्रपटात आपली ओळख निर्माण केली हेदेखील वैशिष्ट्यपूर्ण.