‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
दिलीपकुमारचे दुर्दैवाने पडद्यावर न आलेले हे दोन चित्रपट
आज ११ डिसेंबर. महानायक, अभिनयाचे आदर्श दिलीपकुमार (Dilipkumar) यांचा जन्म दिवस. खरं तर जन्मशताब्दी. यानिमित्त तुम्हा वाचकांना काही वेगळे सांगावेसे वाटत असतानाच मला प्रामुख्याने दिलीपकुमारची भूमिका असलेले दोन चित्रपट आठवले. ‘चाणक्य’ आणि ‘कलिंगा’. दिलीपकुमारच्या निस्सीम भक्तांना ‘दुर्दैवाने पडद्यावर न आलेले’ हे दोन्ही चित्रपट आठवले असतीलच.
चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत अगदी फक्त घोषणा आणि दणदणीत मुहूर्त झाला यापासून ते अगदी पूर्ण होऊनही पडद्यावर न आलेल्या चित्रपटांची संख्या अगणित आहे. तोही एक फ्लॅशबॅक आहे. तोही एक चित्रपटाच्या इतिहासाचा एक भाग आहे. खरं तर जेवढे चित्रपट प्रदर्शित होतात त्यापेक्षा जास्त निर्मितीच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आणि कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बंद पडत असतातच. त्यात पैसा,वेळ,शक्ती,स्वप्ने आशा अपेक्षा कायमची डब्यात गेली याची कधीच मोजदाद होऊ शकत नाही. त्याबरोबरच अनेक चांगल्या थीम (कथा कल्पना), अनेकांच्या आशा अपेक्षा (हा चित्रपट आपल्या करियरला लिफ्ट देईल) हे सगळेच फोल ठरत असते. त्याची तर अजिबातच मोजदाद होऊ शकत नाही.
तात्पर्य, असंख्य चित्रपट पडद्यावर यायचे राहून जाते. त्यातीलच दिलीपकुमारच्या (Dilipkumar) दोन विशेष लक्षवेधक चित्रपटांवर हा फोकस.
‘चाणक्य’ दिलीपकुमारने (Dilipkumar) कधीही भारंभार चित्रपटात भूमिका साकारली नाही, खूपच विचारपूर्वक चित्रपट निवडणे ही आपली खासियत कायमच जपली (कधी काही चित्रपट फसेलेही हा भाग वेगळा) आणि कधीही आपल्या कामाची घाई केली नाही. त्याच वेळेस दिलीपकुमारच्या बंद पडलेल्या चित्रपटांचीही संख्या आणि त्याच्या गोष्टी खूप. अगदी त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकलेल्या ‘कलिंगा’ (१९९१) ची तर तब्बल पंचाण्णव टक्के प्रगती होऊनही तो चित्रपट दुर्दैवाने डब्यात गेला.
अन्यथा, दिलीपकुमारच्या (Dilipkumar) दिग्दर्शनाची शैली पाहायला मिळाली असती. दिलीपकुमारने मेहबूब खान, के. असिफ, अमिया चक्रवर्ती, बिमल रॉय, बी. आर. चोप्रा, रमेश सिप्पी, यश चोप्रा अशा दर्जेदार दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारलीय त्यामुळेच तर त्या दिग्दर्शकांकडून दिलीपकुमारनी काय आत्मसात केले, काय शिकता आले याचा प्रत्यय आला असता. दिलीपकुमारची भूमिका असलेले अनेक चित्रपट ( के. बापय्या दिग्दर्शित ‘रास्ता ‘ वगैरे.
‘रास्ता’ मध्ये दिलीपकुमार, अनुपम खेर, जितेंद्र व श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मेहबूब स्टुडिओतील ‘रास्ता’च्या मुहूर्ताच्या शूटिंग रिपोर्टींगची आठवण आजही माझ्या मनात कायम आहे. दिलीपकुमार व अनुपम खेर यांच्यावर एका भव्य दिव्य सेटवर मुहूर्त दृश्य रंगले होते. तेवढीच त्या चित्रपटाची प्रगती ) निर्मितीवस्थेत बंद पडले. पण त्यातील बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘चाणक्य’ खूप वेगळा आणि महत्वाचा चित्रपटही त्याच वाटेने जायला नको होता. निर्माता आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’ (१९५७), ‘दास्तान’ (१९७२), तसेच त्यांनी निर्मिलेला आणि रवि चोप्रा दिग्दर्शित ‘मजदूर’ (१९८३) या चित्रपटात दिलीपकुमारची भूमिका आहे.
यातील ‘नया दौर’ या चित्रपटाच्या यशाबद्दल असणारी साशंकता प्रेक्षकांच्या प्रतिसादाने दूर झाली. या चित्रपटाच्या थीममध्ये मनोरंजनाचा काहीच घटक नसल्याने (तो माहितीपट आहे असे म्हणतच) काही दिग्दर्शकांनी ही थीम नाकारली. पण बी. आर. चोप्रानी हीच थीम अतिशय कौशल्याने साकारली आणि यश मिळवले. या चित्रपटात वैजयंतीमाला, अजित, चांद उस्मानी, जीवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर साहीर यांच्या गीताना ओ. पी. नय्यर यांचे संगीत आहे. या चित्रपटातील यह देश है वीर जवानो का, मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया, जब उडे उडे झुल्फे तेरी ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. पण या चित्रपटासारखे यश ‘दास्तान’ आणि ‘मजदूर’ या चित्रपटांना मिळाले नाही. ‘दास्तान’मध्ये दिलीपकुमारची दुहेरी भूमिका आहे. या चित्रपटामुळे शर्मिला टागोरची दिलीपकुमारची नायिका बनण्याची इच्छा पूर्ण झाली. पण खलनायिकेच्या भूमिकेतील बिंदू जास्त प्रभावी ठरली. (Dilipkumar)
बी. आर. चोप्रानी कालांतराने निर्माण केलेला ‘बागबान’ (अमिताभ बच्चन व हेमा मालिनी) ते दिलीपकुमारला मध्यरात्री भूमिका देऊन दिग्दर्शित करु इच्छित होते. अनेक वर्षांपासूनचे त्यांचे ते स्वप्न होते. तसेच त्यांचे स्वप्न होते, ‘चाणक्य ‘ हा चित्रपट होता. अशा भव्य महत्वाकांक्षी चित्रपटाचे पहिले पाऊल असते ते व्यक्तिरेखेनुसार फोटो सेशन.
मेहबूब स्टुडिओत अख्खा दिवस त्यासाठी वेळ घेण्यात आला. एक फ्लोअर राखून ठेवण्यात आला. ख्यातनाम मेकअपमन पंढरीदादा जूकर यांनी व्यक्तिरेखेचे स्वरूप, दिलीपकुमारचे व्यक्तिमत्व, मेकअपचे कौशल्य आणि दिग्दर्शकाच्या अपेक्षा या सगळ्याचा विचार करुन हे फोटो सेशन असल्याने ते खूपच प्रभावी ठरले. त्या काळात अशा प्रकारचे एक्स्युलिव्हज कव्हरेज प्रामुख्याने स्क्रीन साप्ताहिकात प्रसिद्ध होई आणि मग ती बातमी सगळीकडे पसरत असे. १९७८ सालची ही गोष्ट आहे. दिलीपकुमारची (Dilipkumar) अगदी वेगळी भूमिका अशीच यानिमित्ताने चर्चा रंगली.
दिलीपकुमार प्रत्येक चित्रपट खूपच विचारपूर्वक स्वीकारतो असे असल्याने तर त्यानी हा चित्रपट सहजासहजी साईन केला नसावा असेही वाटले. अशा मोठ्या चित्रपटाची अशी घोषणा झाल्यावर प्रत्यक्षात चित्रीकरण काही महिन्यांनी सुरु होत असे त्यामुळे या चित्रपटाबाबतही अगदी तसेच वाटले. पण अनेक महिने उलटून गेल्यावरही या चित्रपटाबाबत काहीच प्रगती होत नसल्याचे पाहून हळूहळू लक्षात येऊ लागले की या चित्रपटाची प्रगती फक्त आणि फक्त या फोटोसेशनपुरतीच आहे. आणि त्यामुळे अस्सल चित्रपट रसिक निराश होत गेला. या चित्रपटामुळे काही वेगळे पाहायला मिळेल अशीच अपेक्षा होती, ती जर अशी दुरावत जातेय असे लक्षात येताच वाईट वाटणारच. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचाही हा क्लासिक चित्रपट ठरला असता. पण ते होणे दुर्दैवाने राहून गेले आणि या चित्रपटाचे अस्तित्व फक्त या फोटोसेशनपुरतेच राहिले. गंमत म्हणजे या चित्रपटातील ‘चित्रगुप्त ‘ धर्मेंद्र साकारणार होता अशीही मग चर्चा रंगली. एकाद्या ‘बंद ‘.पडलेल्या चित्रपटाची चर्चा कायम होत राहते हेदेखील एक यशच म्हणायचं.
‘कलिंगा’ची आठवण मुहूर्तापुरती…
हिंदी चित्रपटसृष्टीचे जग म्हणजे, जो भी करो शानसे करो अशा वृत्तीचे, हा फंडा मी शूटिंग रिपोर्टींग, फिल्मी पार्टीत, ग्लॅमरस प्रीमियर यात अनेकदा लाईव्ह अनुभवलाय. म्हणून माझ्या या क्षेत्रातील आठवणी खूपच वेगळ्या. त्यातलाच एक फंडा, जंगी/झगमगाटी/बहुचर्चित मुहूर्तांचा,
मोठा चित्रपट, त्याहीपेक्षा त्याचा मोठा मुहूर्त अशा आठवणी खूपच आणि भारीही, असाच एक मुहूर्त ‘कलिंगा ‘चा! ( माझ्या लक्षात आहे तारीख २० एप्रिल १९९१)
त्याचे आमंत्रण हाती आले तेव्हा सर्वाधिक लक्षवेधक गोष्ट होती, दिग्दर्शक दिलीपकुमार (Dilipkumar). धक धक वाढली हो माझी. त्याचे समकालीन राज कपूर, गुरुदत्त, देव आनंद आपापल्या शैलीनुसार केव्हाच दिग्दर्शक झालेले. आणि सातत्यही ठेवलेले. राज कपूर तर अधिकच बहुरंगी/बहुरुपी. गुरुदत्त कमालीचा संवेदनशील. देव आनंद स्टाईलीश व आत्मकेंद्रित. दिलीपकुमार दिग्दर्शनात अधिकृतरित्या उशिराच आला तरी ‘गंगा जमुना’ची निर्मिती करताना त्याने दिग्दर्शक नीतिन बोस यांना अनेक सूचना दिल्या, नंतरच्या काळात तर अनेक चित्रपटांसाठी दिग्दर्शनात ढवळाढवळ केली असे मागील पिढी जुन्या आठवणीत जात रंगवून सांगे. त्यात खरंच काही तथ्य होते का ? कदाचित, एकाद्या दृश्यावर आपण दिग्दर्शकाशी सखोल चर्चा करावी असे दिलीपकुमारला वाटले असेल आणि नेमका त्याचा वेगळा अर्थ काढलाही असेल. पिक्चरच्या जगात जे दिसते तेच पाहिलं जाते असे नाही. त्याचे अनेक अर्थ अनर्थ सोयीने काढले जातात, असो. चित्रपटाच्या जगाच्या कथा आणि दंतकथा अनेकदा एकच.
‘कलिंगा’चा निर्माता सुधाकर बोकाडे असल्याने जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमधील चित्रपटाचा मुहूर्त आणि पार्टी जंगीच होणार अशी असलेली अपेक्षा खरीच ठरली. त्यात पुन्हा दिलीपकुमार दिग्दर्शनात, त्यामुळे तर अधिकच उंची गाठली गेली. मला आठवतय, अतिशय भव्य सेटस, नौशाद यांच्या हस्ते मुहूर्त क्लॅप, मुहूर्त दृश्यात जोरदार संवाद, प्रचंड टाळ्या, मग गले लगाना, उंची द्रव्य पदार्थ, शाकाहार मांसाहार यांची प्रचंड चंगळ, किंमती नि हवी तेवढी स्काॅच… जे जे फिल्मी पार्टीत सहजच असते ते सगळेच…यावेळच्या दोन गोष्टी खूपच आवडल्या आणि म्हणूनच लक्षात राहिल्या.
==============
हे देखील वाचा : दारासिंगच्या स्टंटपटाची ‘स्टोरी’च वेगळी
==============
एक म्हणजे, दिलीपकुमारने (Dilipkumar) जुन्या पिढीतील आपल्यासोबत भूमिका साकारलेल्या अनेक कलाकारांना आमंत्रित केले होते, आणि मुहूर्त दृश्यातून मोकळे होताच तो संपूर्ण पार्टीभर फिरला आणि आम्हा सिनेपत्रकारांसह अनेकांना भेटत शुभेच्छा स्वीकारल्या. खूपच इम्प्रेस झालो हो. माझ्या अशा सोनेरी चंदेरी रुपेरी खूपच. त्या पंचतारांकित हाॅटेलचा स्वीमिंग पूल आणि बॅक्वेन्ट हाॅल अशी अगदी ही विस्तृत, शानदार, ऐसपैस, ग्लॅमरस पार्टी होती, म्हणून दिलीपकुमारने आवरते घेतले असे अजिबात नाही, हे विशेष उल्लेखनीय.
‘कलिंगा’मध्ये दिलीपकुमारसह (Dilipkumar) सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, राज बब्बर, शिल्पा शिरोडकर, राज किरण इत्यादींच्या भूमिका होत्या. आता होत्याच म्हणायचे, कारण जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेला हा चित्रपट कायमचा डब्यात गेलाय हे सर्वज्ञात आहे. तसे न होता, तो पडद्यावर येऊन दिग्दर्शक दिलीपकुमार म्हणून त्याने काय केले हे पाह्यची संधी मिळाली असती. ते जास्त महत्वाचे आहे. एक अद्भुत विक्रम होता होता राहिला. एक अविस्मरणीय चित्रपट अनुभवणे राहून गेले. चित्रपटाच्या इतिहासात एक अलौकिक नोंद व्हायचे राहून गेले. कारण, आठवणीत राहणारे फिल्मी मुहूर्त तसे खूपच आहेत, हा वेगळा होता हे नक्कीच. दिलीपकुमार हा कदापि न संपणारा असा अलौकिक, चौफेर, बहुस्तरीय प्रवास. खूपच शिकण्यासारखे असा अभिनेता व व्यक्तिमत्त्व. त्या वाटचालीत हे दोन वेगळे चित्रपट.