मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘या’ चित्रपटामधील राजेशची भूमिका अमिताभला करायची होती ?
ऋषिकेश मुखर्जी यांचा नमक हराम १९ नोव्हेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला. मागच्या वर्षी या सिनेमाने पन्नास वर्षे पूर्ण केली. एक अभिजात चित्रपट म्हणून आजही रसिकांच्या स्मरणात आहे. सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका. हे दोघे यापूर्वी ऋषिकेश मुखर्जी यांच्याच ‘आनंद’ या चित्रपटात एकत्र आले होते. ‘नमक हराम’ हा चित्रपट त्यावेळी रंगभूमीवर गाजत असलेल्या वसंत कानिटकर यांच्या बेईमान या मराठी नाटकावर आधारित होता. (Movie)
अर्थात या नाटकाचे मूळ ‘बेकेट’ या पाश्चात्य कलाकृतीत होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विकी या उद्योगपतीची तर राजेश खन्ना यांनी सोमू या गरीब कामगाराची भूमिका केली होती. ऋषिकेश मुखर्जी यांनी सुरुवातीला दोघांनाही बोलावून कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय घ्यायला सांगितला. त्या काळात चित्रपटात जी व्यक्तिरेखा मरते त्या व्यक्तिरेखेला रसिकांची मोठी सहानुभूती मिळते असा ट्रेंड होता.
त्यामुळे अर्थातच राजेश खन्नाने सोमूची भूमिका निवडली आणि अमिताभ बच्चन यांच्या वाट्याला विकीची भूमिका आली. चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना अमिताभ बच्चन यांना कायम असे वाटायचे की, ऋषिदांनी या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलला पाहिजे आणि राजेश खन्नाच्या ऐवजी त्यांच्या व्यक्तिरेखेला मृत्यू दाखवला पाहिजे. त्या पद्धतीने ते ऋषिदांकडे संदेश देखील देत होते. पण ऋषिदा आपल्या कथा, पटकथा, संवाद या प्लॉटवर अगदी परफेक्ट असायचे. त्यात फारसा बदल कधी ते करायचे नाही. (Movie)
चित्रपटाचे चित्रीकरण संपत आले आणि शेवटचा शॉट घ्यायचा होता. एक दिवस अमिताभ बच्चन सेटवर पोहोचले तेव्हा त्यांनी राजेश खन्नाचा फोटोला हार घातल्याचे दिसले. त्यांच्या लक्षात आले की, आज कुठल्या प्रसंगाचे चित्रीकरण होणार आहे आणि ते प्रचंड नाराज झाले. त्यांना शेवटपर्यंत असं वाटत होतं की, ऋषिदा क्लायमॅक्स मध्ये बदल करतील आणि राजेश ऐवजी त्यांच्या व्यक्तिरेखेला चित्रपटात मारतील पण तसं काही घडलं नाही. अमिताभ बच्चन खूप नाराज झाले आणि आपल्या मेकअप रूम मध्ये जाऊन बसले. खूप वेळ झाला. शूटिंगला अमिताभ बच्चन येत नाही हे पाहून ऋषिकेश मुखर्जी यांनी त्यांच्या असिस्टंट नितीन मुकेश यांना अमिताभकडे पाठवले.
अमिताभ बच्चन यांनी आतून दार उघडलेच नाही शेवटी ऋषिदा तिथे गेले आणि त्यांनी विचारले,” अमित ये क्या मजाक है? दरवाजा खोलो.” तेव्हा अमिताभ आतूनच म्हणाला,” लेकीन दादा वो फोटो…” त्यावर ऋषीला म्हणाले,” मैने तुम्हे पहले ही कहा था. मै कोई क्लायमॅक्स चेंज करने वाला नाही. जो है वैसा ही रहेगा. अगर तुम काम करना नही चाहते तो मै वो फोटो निकाल दूंगा और फिल्म भी बंद कर दूंगा!.” ऋषीदा यांना एवढे रागावलेले अमिताभ पहिल्यांदाच पाहत होता. अर्थात ही मात्र लागू पडली अमिताभ बच्चन बाहेर आला आणि त्याने तो शॉट ओके केला. चित्रपट पूर्ण झाला. प्रदर्शित झाला आणि चमत्कार झाला !
==========
हे देखील वाचा : महेश भट यांनी आईच्या वेदना रुपेरी पडद्यावर मांडल्या !
==========
राजेश खन्नाचा चित्रपटाच्या शेवटी मृत्यू असून देखील अमिताभ बच्चन यांची भूमिका रसिकांना जास्त आवडली. चित्रपटात जेव्हा तो कामगारांच्या वस्तीमध्ये जाऊन जोरात विचारतो “ कोण माय का लाल है जिसने मेरे सोमू के हात उठाया वो सामने आये…” त्यांच्या डोळ्यातील त्वेष, अंगार रसिकांना खूप आवडला आणि राजेश खन्नाच्या ऐवजी अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. राजेश खन्नाच्या लव्हर बॉय चा इथेच डाऊन फॉल सुरू झाला आणि अमिताभच्या अँग्री यंग मॅन इमेज इथेच जन्म झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना एकही गाणे नव्हते त्यांची नायिका होती सिम्मी गरेवाल. ती एकदा अमिताभला चित्रपटात म्हणते,”तुम्हारे चिल्लाने मे रोने की आवाज आती है” यातून अमिताभची सिनेमातील व्यक्तिरेखा आणखी स्पष्ट होते. अशा प्रकारे जी भूमिका अमिताभ बच्चन यांना नको वाटत होती त्याच भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने स्टार बनवले !