मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘या’ चित्रपटातील आनंदची भूमिका राजकपूर यांना द्यायची होती…
गोल्डन इरा मधील चित्रपटांच्या मेकिंगच्या गोष्टी आज देखील आपल्याला ऐकायला, वाचायला आवडतात. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ (१९७१) या सिनेमाने भारतातील तमाम प्रेक्षकांचे डोळे ओले केले. आज पन्नास वर्षाहून अधिक कालावधी जरी उलटला असला तरी आनंद हा चित्रपट पाहून हळवा झाला नाही असा एकही प्रेक्षक मला अजून सापडला नाही ! या चित्रपटात ‘आनंद’ ची भूमिका राजेश खन्ना यांनी तर बाबूमोशायची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती.
खरं तर ‘बाबूमोशाय’ या नावाने राज कपूर ऋषिकेश मुखर्जी यांना संबोधित असे. ऋषिकेश मुखर्जी आणि राजकपूर यांची फार जुनी मैत्री होती. राजकपूर यांच्या बऱ्याच चित्रपटाचे संकलन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले तर १९५९ साली आलेल्या राज कपूरच्या ‘अनाडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील ऋषिकेश मुखर्जी यांनीच केले होते. ऋषिकेश मुखर्जी यांच्या डोक्यात ‘आनंद’ या चित्रपटाचा विषय खूप आधीपासून होता. त्यांना या चित्रपटातील ‘आनंद’ची भूमिका राजकपूर यांनाच द्यायची होती.
परंतु दोघेही आपापल्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे हा योग जुळून आला नाही. साठच्या दशकाच्या मध्यावर राज कपूर एकदा खूप आजारी पडले. तेव्हा त्यांना भेटायला ऋषिकेश मुखर्जी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी आपल्या मित्राला बघून ऋषिदा खूपच हळवे झाले होत आणि राज कपूर “आपण या आजारातून काय वाचत नाही” अशी निर्वाणीची भाषा करत होते. परंतु ऋषिकेश मुखर्जी यांनी त्यांना समजून सांगितले,”तुम्ही लवकर बरे होऊन पुन्हा एकदा चित्रपट निर्मिती कराल !” राज कपूर त्या आजारातून बरे झाले ऋषिकेश मुखर्जी मात्र या प्रसंगामुळे खूपच हेलावून गेले. ‘राज कपूरला घेऊन आपण आनंद हा चित्रपट बनवू शकत नाही कारण या चित्रपटांमध्ये आनंद चा मृत्यू दाखला आहे. राज कपूरचा मृत्यू आपण पडद्यावर देखील सहन करू शकणार नाही’ असे त्यांना वाटले. त्यामुळे आता त्यांनी या भूमिकेसाठी अन्य पात्रांचा विचार सुरु केला.
बंगाली अभिनेते उत्तम कुमार आणि सौमित्र चटर्जी यांना अनुक्रमे आनंद आणि बाबूमोशाय यांची भूमिका देण्याचा त्यांनी विचार केला. परंतु दोघेही बंगालमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी नम्र नकार कळवला. नंतर ऋषिकेश मुखर्जी यांनी मेहमूद आणि किशोर कुमार यांना या भूमिका देण्याचा विचार केला. पण ते देखील जमले नाही. त्या काळात या भूमिकेसाठी शशी कपूर यांचे देखील नाव घेतले जायचे. किशोर कुमार याची संधी या चित्रपटातून कशी गेली याचा एक किस्सा सांगण्यात येतो.
त्या काळात किशोर कुमारने एका बंगाली कंत्राटदाराकडून बंगालमध्ये काही शो केले होते. परंतु त्या कंत्राट दाराने किशोर कुमार चे पेमेंट न केल्यामुळे तमाम बंगाली लोकांवर त्यांचा राग होता. आणि आपल्या नौकराला त्यांनी आपल्या बंगल्यामध्ये कुठल्याही बंगाली व्यक्तीला येवू द्यायचे नाही असा दम दिला होता. जेव्हा ऋषिकेश मुखर्जी किशोर कुमार यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेले त्यावेळेला त्या नोकराने त्यांना बंगाली व्यक्तीला आत घ्यायचे नाही असा मालकाचा निरोप असल्यामुळे त्यांना बाहेरच्या बाहेर हाकलून लावले!! अशा पद्धतीने किशोर कुमारचा पत्ता कट झाला. अर्थात हे असंच झालं होतं का हे माहिती नाही. परंतु जुन्या मासिकामध्ये अशा पद्धतीचा मजकूर वाचल्याचे स्मरते.
‘आनंद’ या चित्रपटात योगेश यांनी खूप सुंदर गाणी लिहिली होती. गंमत म्हणजे एका गाण्याची सिच्युएशन संगीतकार सलील चौधरी आणि दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्याकडून योगेश आणि गुलजार यांना सांगितली गेली. दोघांनी आपापल्या पद्धतीने त्या सिच्युएशन वर गाणे लिहिले परंतु गुलजार यांचे गाणे सिलेक्ट केले गेले! हे गाणे होते ‘ना जिया लागेना…’ योगेश अर्थातच नाराज झाले. परंतु त्यांना ऋषिकेश मुखर्जी यांनी एक वेगळे गाणे लिहायला सांगितले आणि त्यांनी ते गाणे लिहिले ‘जिंदगी कैसे पहेली हाय…’ हे गाणे चित्रपटात टायटल चालू असताना टाकायचे ठरले होते.
=============
हे देखील वाचा : राज कपूरने मानधन न घेता यांच्या चित्रपटात भूमिका केली !
============
पण राजेश खन्ना ने त्याला विरोध केला तो म्हणाला,” हे गाणे माझ्यावर चित्रित करा कारण हे गाणे अतिशय सुंदर होते आणि टायटल चालू असताना ची गाणी प्रेक्षकांच्या फारशी लक्षात राहत नाहीत.” असे त्यांनी ऋषिकेश मुखर्जीला समजावून सांगितले. ऋषिकेश मुखर्जी यांनी त्याच्यासाठी एक सिच्युएशन क्रिएट केली पण तो राजेश खन्नाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांच्यावर ते गाणे चित्रित जरी झाले असले तरी गाणे बॅकग्राऊंडला वाजत असते आणि जुहूच्या बीचवर राजेश खन्ना हातात फुगे घेऊन जाताना दाखवला आहे. आनंद या चित्रपटाबद्दल खूप काही लिहिता येऊ शकते प्रेक्षकांच्या अतिशय जवळचा हा चित्रपट असल्यामुळे त्याबद्दलची प्रत्येक बातमी प्रत्येक लेख हा प्रेक्षकांना वाचकांना वाचायला आवडत असतो.