Manoj Bajpayee : पहिल्यांदाच भैय्याजी दिसणार हॉरर-कॉमेडी चित्रपटात!

संगीतकार एन दत्ता यांच्या कारकिर्दीला अचानक ब्रेक लागला ?
कधी कधी काही अनपेक्षित घटना आयुष्यातील मोठ्या करिअरच्या संधी अक्षरशः मोडून टाकतात. असाच काहीसा अनुभव संगीतकार एन दत्ता यांना देखील आला होता. संगीतकार एन दत्ता म्हणजे दत्ता नाईक (Datta Naik). आपला मराठी माणूस,अतिशय गुणी संगीतकार. त्याची बरीचशी सांगितिक कारकीर्द संगीतकार सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून गेली. स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांना बी आर चोप्रा यांचे बी आर फिल्म्स हे मोठे बॅनर मिळाले.
धूल का फूल, साधना आणि धर्मपुत्र हे त्यांचे या चित्र संस्थेतील चित्रपट संगीतामुळे आज देखील रसिकांच्या लक्षात आहेत. ‘साधना’(१९५८) या चित्रपटातील ‘औरत ने जनम दिया मरदो को…’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे आज देखील एक cult क्लासिक म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे ‘धूल का फूल’ या चित्रपटातील सर्व गाणी. विशेषत: यातील देखील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘तू मेरे प्यार का फूल है…’ हे हळुवार गाणे अतिशय अप्रतिम बनले होते.

आपल्या पु ल देशपांडे यांचे ते अतिशय लाडकं गाणं होतं. एन दत्ता अतिशय नजाकतीने चित्रपटाला संगीत देत. ‘धर्मपुत्र’ या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं ‘मै जब भी अकेली होती हुं तुम चुपके से आ जाते हो’ हे तब्बल पाच कडव्यांचे गाणे एन.दत्ता यांनी फार सुंदर रित्या स्वरबद्ध केले होते. ‘साधना’ चित्रपटातील ‘कहो जी तुम क्या क्या खरीदोगे यहां तो हर चीज बिकती है’ आणि ‘आज क्यू हमसे पर्दा है’ ही कव्वाली त्या काळात खूप गाजली होती. त्याचप्रमाणे ‘धूल का फूल’ या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘तेरे प्यार का आसरा चाहता हु’ हे गाणे कॉलेज तरुणांचे लाडके गाणे बनले होते. (Datta Naik)
पन्नासच्या दशकाच्या अखेरीस एन दत्ता यांची कारकीर्द अगदी बहरात आली होती. टॉपच्या संगीतकारांमध्ये ते जाऊन बसणार होते. याच काळात त्यांना बी आर चोप्रा यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट मिळाला. हा सिनेमा म्हणजे त्यांच्यासाठी मोठी पर्वणी होती. मोठ्या उत्साहात त्यांनी या चित्रपटाच्या संगीतावर काम करायला सुरुवात केली. असे म्हणतात की ‘आप आये तो खयालो मे दिल ए नाशाद आया…’ या गाण्याची एक चाल त्यांनी बनवली होती. परंतु या काळात एक दुर्दैवी घटना घडली. एन दत्ता (Datta Naik) यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. तब्बल सहा महिने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर पुढचे सहा महिने त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. एवढा मोठा काळ निर्माता दिग्दर्शक बी आर चोप्रा थांबणे शक्यच नव्हते कारण त्यांच्यावर देखील फायनान्सर आणि वितरकांचे मोठे प्रेशर होते. त्यामुळे बी आर चोप्रा यांनी ‘गुमराह’ या चित्रपटासाठी संगीतकार रवी यांची निवड केली. रवि यांनी ‘गुमराह’ या चित्रपटातील गाणी अतिशय अप्रतिम बनवली. चित्रपट सुपर डुपर हिट झाला. साहजिकच पुढचा मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’ रवि यांच्याकडेच केला. (Datta Naik)
दरम्यानच्या काळात एन दत्ता (Datta Naik) यांची तब्येत सुधारल्यामुळे पुन्हा ते चित्रपटाच्या दुनियेत आले परंतु आता काळ पूर्णतः बदलून गेला होता. या मायानगरीचा हाच नियम आहे इथे उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. एन दत्ता यांना आता चित्रपट मिळणे अवघड झाले. हिंदी सिनेमातील त्यांच्या संगीताचा प्रवास खंडीत झाला. खरं तर अतिशय गुणी, अभ्यासू आणि दर्जेदार संगीत देणारा हा संगीतकार पण एका आजाराने करीअर च्या शिखरावर जाता असताना बाजूला फेकला गेला. साहीर लुधियानवी सोबत त्यांची चांगली जोडी जमली होती. साहीर सोबत सर्वाधिक २० सिनेमे करणारे एन दत्ता हे एकमेव संगीतकार होते.
============
हे देखील वाचा : राज कपूरने मानधन न घेता यांच्या चित्रपटात भूमिका केली !
===========
साठच्या दशकाच्या मध्या पासून त्यांनी काही मराठी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशील का, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, सूर तेच छेडता गीत उमटले नवे, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, निळे गगन निळी धरा, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई… ही त्यांची मराठी चित्रपट गीते त्या मराठी सिनेमाला यशस्वी करून गेली. पण जी जादू आणि जी झेप त्यांना हिंदीत दाखवायची होती ती त्यांना दाखवता आली नाही. एकाच महिन्यात जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक असावा हा दुर्दैवी योग एन दत्ता यांच्या आयुष्यात देखील लावा १२ डिसेंबर १९२७ रोजी जन्मलेले दत्ता नाईक ३० डिसेंबर १९८७ या दिवशी वयाच्या अवघ्या साठाव्या वर्षी देवा घरी गेले! जाताना कदाचित म्हटले असतील ‘अश्को ने जो पाया है वो गीतो मे दिया है….’